मुद्दा: मुंबईवरील नागरी सुविधांचा ताण

>>पुरुषोत्तम कृ.आठलेकर

दरवर्षी पावसाळा आला की नालेसफाई, तुंबणारे पाणी, विस्कळीत होणारे जनजीवन आणि सर्व सामान्यांना सोसाव्या लागणार्‍या यातना यावरून महापालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागते. आणि जो उठतो तो  महापालिकेवर तोंडसुख घ्यायला सुरुवात करतो. परंतु महापालिकेच्या दृष्टीने विचार केलाय का, वास्तविकता तपासली गेली आहे का, तिची निर्णय प्रक्रिया, राज्य शासनाचा निर्णय, तिच्या अखत्यारीतील स्वतंत्र महामंडळे, त्यांची निर्णय प्रक्रिया व सर्वांचे अधिकार या सर्वात महापालिकेची भूमिका या सर्व प्रश्नांची उत्तरे कोणी अंतर्मुख होऊन शोधलीत काय?. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महानगरपालिका जगामध्ये आज अव्वलस्थानी आहे. एखाद्या राज्याचे आर्थिक बजेट असते तेवढा या महापालिकेचा आर्थिक डोलारा आहे. लोकसंख्येच्या दृष्टीनेसुद्धा हे शहर जगामध्ये पाचव्या स्थानी आहे. आज जवळपास चार कोटींच्या घरात लोकसंख्या गेली असून सर्व समस्यांचे मूळ तेच आहे. मूलभूत सुविधांचा विचार करता पाणीपुरवठा करण्याची क्षमता आणि पाण्याची मागणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत भरून काढण्यासाठी प्रचंड प्रमाणावर ताण पडत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसर्‍या क्रमांकाचे दाटीवाटीचे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे.

मुंबई हे एक बेट असून त्याचा भौगोलिकदृष्टय़ा व सीमारेषेच्या माध्यमातून विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. आज उंच उंच टॉवर्स साकारत असताना भूगर्भागाचासुद्धा विचार होणे आवश्यक आहे. आज अनेक ठिकाणी रस्ते खचल्याची ताजी उदाहरणे व दुर्घटना अनुभवत आहोत. अनधिकृत झोपड्यांना राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे त्यांच्या अतिरिक्त सेवा-सुविधांचा भार मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे. लोकसंख्या वाढली की स्वाभाविकच कचर्‍याचे प्रमाण वाढते. आज जवळपास दैनंदिन ८००० मे. टन एवढा कचरा गोळा होतो त्याचे योग्य पद्धतीने विघटन व विल्हेवाट लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ व त्यांची मानसिकता कोणी विचारात घेतली काय?. आज घर, रस्ते, पाणी या मूलभूत सेवा-सुविधांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा नाण्याच्या दोन्ही बाजूनी विचार करणे गरजेचे आहे. मी कर भरला म्हणजे माझी जबाबदारी संपली असा विचार करून चालत नाही. रस्त्यावर खोदकाम केवळ महापालिकाच करत नाही, तर शासकीय यंत्रणेतील अनेक यंत्रणा काम करीत असतात उदा. महानगर गॅस, एमटीएनएल, एमएआरडी, मेट्रो इ. तरी पण त्यांचे खापर महापालिकेच्या डोक्यावर मारले जाते. रस्त्यावरील खोदकामे, समुद्रात टाकलेली भर, अशावेळी जेव्हा समुद्राला भरती असते. मुसळधार पाऊस पडत असतो तेव्हा पाणी स्वाभाविकच उथळ भागात साठणार. हे होऊ नये याबाबत दुमतच नाही किंवा महापालिकेत सत्ता कोणाची असो. योग्य त्या सेवा-सुविधा मिळाल्याच पाहिजेत, परंतु जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते, शासकीय यंत्रणा हतबल ठरतात, तेव्हा केवळ मुंबई महानगरपालिकेला दोष देऊन चालणार नाही. मुंबई महानगरपालिकेचा एक लौकिक आहे तिच्या प्रति मुंबईकरांचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे नाते आहे. तेव्हा भौगोलिक सीमा, वाढणारे लोंढे आणि पालिका यंत्रणांवर पडणारा प्रचंड ताण लक्षात घेता राजकीय सत्तेचे राजकारण न करता मुंबई महानगरपालिकेला खुल्या दिलाने सहकार्य करायला हवे.