सूर्याच्या दिशेने…!

‘पार्कर सोलर प्रोब’ हा ‘नासा’चा ‘हनुमान’ ३१ जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावतो का, सूर्याच्या दिशेने घेतलेली त्याची झेप यशस्वी होते का, तो सूर्याच्या प्रभावळीत प्रवेश करतो का आणि माणसाला पडलेली असंख्य ‘सौर कोडी’ सुटण्यास त्याची मदत होते का, हे भविष्यातच समजू शकेल. तूर्त सूर्याच्या दिशेने आणखी ‘उड्डाण’ सज्ज आहे इतकेच म्हणता येईल.

पवनसुत हनुमान जन्म झाल्या झाल्या सूर्याच्या दिशेने झेपावला होता त्याची कथा आपल्याकडे सर्वश्रुत आहे. मात्र आता सूर्याच्या दिशेने एक यान खरोखर झेप घेण्यास सज्ज झाले आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने त्याची जय्यत तयारी केली असून त्यांचे सूर्य अभियान अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे यान या मोहिमेसाठी सज्ज केले जात आहे. फ्लोरिडा येथील केनेडी अंतरिक्ष केंद्रातून या वर्षी ३१ जुलै रोजी ते सूर्यबिंबाच्या दिशेने झेपावेल. अर्थात इतर अवकाश यानांप्रमाणे ते सूर्यावर प्रत्यक्ष उतरवणे शक्य नसल्याने ते सूर्याच्या शक्य तेवढे जवळ पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. सूर्याच्या प्रभावळीत आतापर्यंत कुठलीही मानवनिर्मित गोष्ट पोहोचू शकलेली नाही. मात्र हे यान त्यात प्रवेश करेल असा विश्वास ‘नासा’ला आहे. हे अभियान यशस्वी झाले तर सूर्य आणि विश्वाच्या अनेक गूढ प्रश्नांची उकल होण्यास मदत होउै शकेल. अर्थात हा सगळा जर तरचा प्रश्न आहे. ‘पार्कर सोलर प्रोब’च्या माध्यमातून या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा ‘नासा’चा प्रयत्न आहे. गूढरम्य अंतराळाचा शोध घेण्याची मानवी जिज्ञासा जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत असे प्रयत्न होतच राहतील. पुरातन काळी आपल्या ऋषीमुनींनीही हा

शोध घेण्याचा प्रयत्न
केलाच होता. आधुनिक काळात आपण मंगळावर स्वारी करण्यात यशस्वी झालो आहोत आणि चांद्रयानाची आपली तयारी सुरू आहे. ‘नासा’सारखी संस्था अर्थातच या सर्व संशोधनात आणि अभियानात अग्रेसर आहे. नासाचे सूर्य अभियान हे माणसाच्या अंतराळ जिज्ञासेचा एक मोठा आविष्कार असेल. ही जिज्ञासा आता एवढी विस्तारली आहे की, मंगळ आणि चंद्रावरील मानवी वसाहतीची, अंतराळ पर्यटनाची मोठमोठी स्वप्ने पाहिली जात आहेत. सूर्यमालेचा, तिच्यातील उपग्रहांचा शोध घेता घेता आपल्या आकाशगंगेबाहेरही डोकावण्याचा प्रयत्न सर्वच प्रगत देशांतील वैज्ञानिक करीत आहेत. चंद्र आणि मंगळावर तर अवकाशयाने पोहोचलीच आहेत. अंतराळात कायमची अंतरिक्ष स्थानकेही कार्यरत आहेत. अंतराळ प्रयोगशाळादेखील आहेतच. सर्वच देश वेगवेगळ्य़ा कारणांसाठी अंतराळात छोटेमोठे उपग्रह सोडत आहेत. आपल्या ‘इस्रो’ या अंतराळ संशोधन संस्थेने गेल्या वर्षी एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला होता. ज्या ज्या देशांना शक्य आहे ते सर्वच अंतराळ मोहिमा राबवीत आहेत. त्यामुळे पृथ्वीवर जसा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसाच प्रश्न

अंतराळातील कचऱ्याचाही
निर्माण झाला आहे. अनेक अयशस्वी ठरलेले, आयुष्य संपलेले उपग्रह, त्यांचे सुटे भाग अंतराळात फिरत आहेत. मात्र म्हणून विश्वाचा शोध घेण्याची आणि विश्वनिर्मितीच्या मुळाशी पोहोचण्याची मानवी जिज्ञासा कमी झालेली नाही. सुमारे ४६० कोटी वर्षे वय असलेला सूर्य हा तर आपल्या पृथ्वीचा, पृथ्वीवरील जीवसृष्टीचा कर्ताकरविताच. तब्बल सहा हजार क्लेव्हीन एवढे प्रचंड तापमान असलेला हा तप्त गोळाच आपल्या जीवसृष्टीचा आधार आहे. तरीही सूर्यावर उत्पन्न होणारी ऊर्जा, तिचे सूर्यकिरणांच्या माध्यमातून पृथ्वीपर्यंत पोहोचणे, त्याचे पृथ्वीवरील जीवसृष्टी आणि वातावरणावर होणारे परिणाम, सौरज्वालांची उत्पत्ती, सौरडागांचे चक्र असे अनेक प्रश्न माणसासाठी आजही अनुत्तरीत आहेत. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे यान या अनुत्तरित प्रश्नांचा गुंता सोडविण्यासाठी, किमान तो सैल करण्यासाठी मदत करेल ही नासाची अपेक्षा आहे. मारुती स्तोत्रात समर्थ रामदास स्वामींनी हनुमान सूर्याच्या दिशेने झेपावला त्याचे वर्णन ‘आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा’ असे केले आहे. ‘पार्कर सोलर प्रोब’ हा ‘नासा’चा ‘हनुमान’ ३१ जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावतो का, सूर्याच्या दिशेने घेतलेली त्याची झेप यशस्वी होते का, तो सूर्याच्या प्रभावळीत प्रवेश करतो का आणि माणसाला पडलेली असंख्य ‘सौर कोडी’ सुटण्यास त्याची मदत होते का, हे भविष्यातच समजू शकेल. तूर्त सूर्याच्या दिशेने आणखी ‘उड्डाण’ सज्ज आहे इतकेच म्हणता येईल.