संकल्प पूर्ण होवोत!

मावळत्या वर्षाचा ताळेबंद मांडणे आणि नवीन वर्षाचे अंदाजपत्रक आखणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत. आशाआकांक्षा आणि निराशा यांचीच ती गोळाबेरीज असते. वर्षाच्या शेवटच्या दिवशी ती करायची, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यात नवीन उत्साहाची भर घालायची आणि ‘नवीन वर्षाचे स्वागत’ असे म्हणून जुन्या वर्षात न सुटलेली आणि नव्या वर्षात येणारी गणिते सोडविण्याच्या प्रयत्नाला लागायचे. प्रत्येक नवीन वर्षाचा पहिला दिवस हाच संकल्प घेऊन उजाडतो. याही वर्षी तो तसाच उजाडला. या वर्षात तरी सामान्य जनतेचे अनेक संकल्प पूर्ण होवोत हीच अपेक्षा!

उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणाच्या साक्षीने नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. उगवणारा दिवस नेहमीच नवीन आशाआकांक्षा घेऊन येणारा असतो. फक्त आजचा दिवस नववर्षाचा पहिला दिवस असल्याने मावळत्या वर्षातील लाभ-हानीचा विचार डोक्यात ठेवून नव्या स्वप्नांची, अपेक्षांची मांडणी केली जाईल इतकेच. मुंबईचा विचार केला तर कमला मिल कंपाऊंडमधील भीषण अग्नितांडवाचे सावट नव्या वर्षाच्या स्वागतावर राहिले. या दुर्घटनेने प्रशासकीय बेपर्वाईची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली. निदान नवीन वर्षात तरी अशी बेपर्वाई आणि बेफिकिरी दाखवली जाणार नाही याची काळजी सर्वच यंत्रणांनी घ्यायला हवी. खरे म्हणजे ‘२०१७ आणि खतरा’ अशी धोक्याची घंटा या वर्षाने अनेक बाबतीत वाजवली. देशातील १९ राज्ये स्वबळावर आणि मित्रपक्षांच्या मदतीने ताब्यात घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांना गुजरात विधानसभा निवडणुकीने घाम फोडला आणि ‘भविष्यातील खतऱ्यां’ची जाणीव करून दिली ती मावळत्या वर्षानेच. देशभरात अवघी चार राज्ये हातात असलेल्या काँग्रेसला, त्यातही राहुल गांधींच्या नेतृत्वाला ‘नवसंजीवनी’ दिली तीदेखील याच महिन्याने. मागील काही वर्षांपासून लांबलेला राहुल यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राज्याभिषेक सरत्या महिन्याच्या साक्षीनेच झाला. या वर्षात महाराष्ट्रासह देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संरक्षण

अक्षरशः घुसळून

निघाले. २०१६ संपता संपता नोटाबंदीचा तडाखा जनतेला आणि अर्थव्यवस्थेला बसला होता. २०१७ मध्ये जीएसटीची कुऱहाड अर्थव्यवस्थेवर पडली. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या लाखोंच्या  शिस्तबद्ध मोर्चांनी महाराष्ट्राचे, तर पाटीदार समाजाच्या आंदोलनाने गुजरातचे समाजजीवन घुसळून निघाले. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शेतकरी कर्जमाफीची घोषणा करायला भाग पाडणारी ऐतिहासिक शेतकरी संपाची वज्रमूठ उगारली गेली ती याच वर्षात. अर्थात या कर्जमाफीची लागलेली ऑनलाइन वाट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बोंडअळीने उद्ध्वस्त झालेला कापूस उत्पादक, विषारी कीटकनाशकांच्या फवारणीने घेतलेले विदर्भातील शेतकऱ्यांचे बळी, २९ ऑगस्टला मुंबईला बसलेला ‘२६ जुलै’च्या भयंकर स्मृती जागा करणारा पावसाचा तडाखा, २९ सप्टेंबरची २३ निरपराध्यांचा जीव घेणारी एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरी आणि आता कमला मिल कंपाऊंडमधील अग्नितांडव. अशा भयंकर दुर्घटनांचे गडद सावट महाराष्ट्रावर राहिले. रुळावरून रेल्वे घसरण्याचे देशात वाढलेले प्रमाण, रोहिंग्या मुसलमानांच्या घुसखोरीचा प्रश्न, सीमेवर होणारा पाकडय़ांचा गोळीबार आणि कश्मीरमधील दहशतवादी हल्ले ‘मागील पानावरून पुढे’ याही वर्षी सुरूच राहिले. आमच्या लष्कराच्या धडक मोहिमेत अनेक दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांचा जरूर खात्मा झाला, पण तरीही वर्षाच्या शेवटच्या दिवशी

कश्मीरमधील पुलवामा

येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला झाला आणि आपले पाच जवान शहीद झालेच. तिकडे डोकलाम मुद्दय़ावरून चीन आणि हिंदुस्थान यांच्यात ‘तुटेपर्यंत ताणला गेलेला तणाव’ निर्माण झाला तो मावळत्या वर्षातच. देशाला नवे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने नवे राष्ट्राध्यक्ष तर जपानचे पंतप्रधान म्हणून शिन्जो आबे यांची फेरनिवड ही याच वर्षाची देणगी. तब्बल १०४ उपग्रहांचे अंतरिक्षात यशस्वी प्रक्षेपण हा ‘इस्रो’च्या शिरपेचात आणखी एक तुरा याच वर्षात रोवला गेला. तोंडी तलाकसारख्या अमानवी प्रथांमुळे पिचलेल्या मुस्लिम महिलांना लोकसभेत मंजूर झालेल्या तलाकबंदी विधेयकाच्या रूपात आशेचा किरण आणि स्वहक्काचा आधार दिला तोदेखील २०१७ नेच. मावळत्या वर्षाचा ताळेबंद मांडणे आणि नवीन वर्षाचे अंदाजपत्रक आखणे म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत. आशाआकांक्षा आणि निराशा यांचीच ती गोळाबेरीज असते. वर्षाच्या शेवटच्या दिवशी ती करायची, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यात नवीन उत्साहाची भर घालायची आणि ‘नवीन वर्षाचे स्वागत’ असे म्हणून जुन्या वर्षात न सुटलेली आणि नव्या वर्षात येणारी गणिते सोडविण्याच्या प्रयत्नाला लागायचे. प्रत्येक नवीन वर्षाचा पहिला दिवस हाच संकल्प घेऊन उजाडतो. याही वर्षी तो तसाच उजाडला. या वर्षात तरी सामान्य जनतेचे अनेक संकल्प पूर्ण होवोत हीच अपेक्षा!