‘कीर्ति’वंत!

2

बालगंधर्वांच्या गळ्यातून बाहेर पडणाऱ्या स्वर्गीय सुरांवर महाराष्ट्राच्या चार पिढय़ा पोसलेल्या आहेत, पण बालगंधर्वांनी गाजवलेल्या संगीत रंगभूमीचे जतन करण्यात शिलेदार कुटुंबीयांचे तेवढेच मोलाचे योगदान आहे. त्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार म्हणून आम्ही कीर्ती शिलेदारांकडे पाहतो. म्हणूनच कीर्ती शिलेदार या ९८ व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा झाल्याचा आनंद आम्हाला होत आहे.महाराष्ट्राच्या राजधानीतील हे नाटय़संमेलन ‘कीर्ति’वंत व वैभवशाली ठरो!

बालगंधर्वांच्या संगीत रंगभूमीची पताका आजपर्यंत कुणी फडकत  ठेवली असेल तर ती कीर्ती शिलेदार यांनीच. म्हणूनच ९८ व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी कीर्ती शिलेदार यांची झालेली निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची व आनंदाची बाब आहे. येत्या जून महिन्यात मुंबई शहरात नाट्यसंमेलन होईल व अध्यक्षपदी रंगभूमीची प्रामाणिक सेवा केलेली ‘शिलेदार’ व्यक्ती विराजमान होईल. याचा समस्त मराठी बांधवांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. हल्ली कोणीही सोम्या-गोम्या उठतो व अखिल भारतीय साहित्य संमेलन किंवा नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करतो. त्यामुळे या संमेलनाचे तेज गेल्या काही वर्षांपासून काळवंडून गेले. कीर्ती शिलेदारांच्या निवडीने मुंबईतील अखिल भारतीय नाट्य संमेलनास सुवर्णझळाळी प्राप्त होणार आहे. कीर्ती शिलेदार या संगीत रंगभूमीवर किमान पाच दशके पताका फडकवीत आहेत.संगीत रंगभूमीचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. त्यांचे वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांनी संगीत नाटकासाठी आपले आयुष्य वेचले. शिलेदार दांपत्य संगीत कार्यक्रमांसाठी गावोगाव फिरत असे. संगीत नाटकांसाठी त्यांनी ‘मराठी रंगभूमी नाटक कंपनी’ स्थापन केली होती. वयाच्या बाराव्या वर्षी कीर्ती शिलेदार या कंपनीत अधिकृतपणे सामील झाल्या आणि तेथून त्यांचा संगीत रंगभूमीचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. पैसा,प्रसिद्धी, संपत्ती यांचा जराही

मोह न ठेवता

शिलेदार कुटुंबाने मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचे प्रयोग अखंड   सुरू ठेवले. महाराष्ट्रातील मोठी शहरेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, कोलकाता आदी मोठय़ा शहरांमध्येही त्यांनी संगीत नाटकांचे महोत्सव आयोजित केले आणि मराठी संगीत रंगभूमीच्या वैभवशाली वारशाचे संवर्धन केले. हाच वारसा कीर्ती शिलेदारांनी पुढे नेला व पडझडीच्या काळातही त्या संगीत रंगभूमीशी एकनिष्ठ राहिल्या. मराठी रंगभूमीवर बालगंधर्वांनी बादशाही वैभवाने पाच तपे राज्य केलेले आहे. बालगंधर्वांच्या गळय़ातून बाहेर पडणाऱ्या स्वर्गीय सुरांवर महाराष्ट्राच्या चार पिढय़ा पोसलेल्या आहेत, पण बालगंधर्वांनी गाजवलेल्या संगीत रंगभूमीचे जतन करण्यात शिलेदार कुटुंबीयांचे तेवढेच मोलाचे योगदान आहे. त्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार म्हणून आम्ही कीर्ती शिलेदारांकडे पाहतो. महाराष्ट्र नाटकवेडा आहे, पण आजची पिढी नाटकांपासून लांब जात आहे काय? ‘‘मखमली पडद्यावर फुटलाइटस् पडले आहेत. ऑर्गन-तबला-सारंगी एकजीव झाली आहे आणि पडद्यामागून ‘नमन नटवरा’, ‘प्रभुपदास नमित दास’, ‘धीरवीर पुरुषपदा’, ‘सौख्यसुधा वितरि’ अशांसारख्या नांदीचे स्वर सुरू झाले आहेत. धूप दरवळतो आहे.रंग-गंध आणि नाद यांचं ते संमोहन मराठी प्रेक्षागाराला निराळय़ा सूरलोकात घेऊन गेले आहे. हे नुसतं आठवून मराठी माणूस वेडा होतो,’’ असे पु.लं.नी एके ठिकाणी म्हटले ते खरे आहे. तो रंग, गंध आणि नाद जपणारी

शेवटची ‘शिलेदार’

म्हणून महाराष्ट्र कीर्ती शिलेदारांकडे पाहतो. त्यांची भूमिका असलेल्या  अनेक संगीत नाटकांचे चार हजारांहून जास्त प्रयोग झाले आहेत. बालगंधर्वांच्या सुवर्णयुगाची आठवण यावी अशा तल्लीनतेने गायलेल्या त्यांच्या असंख्य गीतांना व नाटय़पदांना रसिकांनी मानवंदना दिली आहे. ‘संगीत कान्होपात्रा’सह अनेक जुन्या नाटकांचा ठेवा त्यांनी फक्त जतन केला नाही, तर नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. ‘संगीत शाकुंतल’, ‘मानापमान’, ‘संशयकल्लोळ’, ‘मृच्छकटिक’ अशा विविध नाटकांतून त्यांनी आपली वैशिष्टय़पूर्ण ओळख निर्माण केली. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये जनरल कौन्सिलच्या सदस्या म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. आज रंगभूमीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. रंगभूमीवर नाटकीपणा वाढला आहे. प्रेक्षकांना ‘नाटक’ पाहण्यासाठी विविध मार्गाने खेचावे लागते. रंगभूमीवरील आपुलकी संपून केवळ एक स्पर्धेचे स्वरूप आले आहे. ‘सौभद्र’, ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’पासून‘मानापमान’, ‘स्वयंवर’, ‘मदनाची मंजिरी’, ‘पंडितराज जगन्नाथ’पर्यंत नामांकित संगीत नाटके रंगभूमीवर अवतीर्ण झाली. संगीत हाच या नाटकांचा प्राण व चैतन्य होते. मराठी रंगभूमीस लोकप्रिय करण्याचे काम संगीत नाटक व त्यातील शिलेदारांनी केले. म्हणूनच कीर्ती शिलेदार या ९८व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा झाल्याचा आनंद आम्हाला होत आहे. महाराष्ट्राच्या राजधानीतील हे नाट्यसंमेलन ‘कीर्ति’वंत व वैभवशाली ठरो!