चला, ‘संपर्क’ खेळू या!

66

श्री. अमित शहा यांचे लक्ष्य लोकसभेतील किमान ३५० जागांचे व तेही स्वबळावर जिंकण्याचे आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल. देशात पेट्रोलचा भडका उडून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत व शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरू आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात व शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

भारतीय जनता पक्षाने एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत. एनडीएतील घटक पक्षांना श्री. शहा भेटणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत? व ते नेमके आताच म्हणजे पोटनिवडणुकांत भाजपची धूळधाण उडाल्यावरच का भेटत आहेत, हासुद्धा प्रश्नच आहे. २०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे ‘स्व’बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत. शिवसेनेसारखे पक्ष हे कायम जनसंपर्क, जनाधार यावरच वाटचाल करीत असतात व त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी, लढण्यासाठी कोणत्याही ‘पोस्टर बॉय’ची गरज नसते. गरजेनुसार पोस्टरवरची चित्रे बदलायची व मते मागायची हे धंदे आम्ही केले नाहीत. आता पालघर निवडणुकीचेच पहा… या निवडणुकीत भाजपच्या पोस्टरवरून मोदी, शहा अनेक ठिकाणी गायब झाले व त्या जागी स्व. चिंतामण वनगांचे फोटो आले. चिंतामण वनगा यांच्या कुटुंबीयांनी त्यास आक्षेप घेऊनही भाजपवाले मोदींच्या नावाने नव्हे तर वनगांच्या नावाने मते मागत राहिले; पण काँग्रेसचे गावीत यांचा विजय होताच भाजपवाले आनंदाने नाचू लागले व विजयाच्या

पोस्टरवरून वनगा गेले

पुन्हा मोदी, शहा आले. त्यामुळे कधी कुणाशी संपर्क ठेवायचा व तोडायचा याची ‘व्यापारी गणिते’ ठरलेली असतात. आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांनी भाजपशी संपर्क तोडला आहे. त्यामुळे श्री. शहा यांच्या संपर्क अभियानात नायडू भेटीचाही समावेश आहे काय? चंद्राबाबू नसतील तर आंध्रात जगनमोहन रेड्डी संपर्कासाठी तयार आहेतच. खरेतर सध्या सगळ्यात मोठा संपर्क घोटाळा बिहारात सुरू आहे. नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड व भाजपचे संयुक्त सरकार बिहारात आले; पण या दोघांमध्ये दुसरा, तिसरा मधुचंद्र संपत आल्याचे दिसत आहे. नितीश कुमार यांचे सहकारी के.सी. त्यागी यांनीच कुरबुरीस तोंड फोडले असून भाजपला मित्रांची फिकीर नाही, असे त्यांनी सांगितले. याच वेळी नितीश कुमार यांनीही ‘नोटाबंदीमुळे नक्की देशाचा काय फायदा झाला?’ असा प्रश्न उपस्थित केला आहेच. सुरुवातीला नितीश कुमार हे ‘नोटाबंदी’चे वकील होते व नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार संपेल, काळा पैसा बाहेर येईल, अशा स्वप्नरंजनात होते. त्याच स्वप्नावस्थेत त्यांनी भाजपशी गांधर्व विवाह करून नवा ‘संपर्क’ निर्माण केला. आता ते स्वप्नातून जागे झाले आहेत. या गांधर्व विवाहानंतर बिहारात नितीश कुमार यांचा जनाधार खचू लागला आहे. लालू यादव यांना तुरुंगात पाठवल्याने बिहारचे मैदान मोकळे होईल हा त्यांचा भ्रमही तुटला. बिहारमधील सर्वच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांत भाजप-जेडीयू आघाडीचा पराभव झाला आहे व लालू यादव जिंकले आहेत. त्यातच आता

बिहारात जागावाटपावरून

दयु आणि भाजपचे वाजले आहे. बिहारातील निवडणुका मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढायच्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यावरून दोघांत खणाखणी सुरू झाली आहे. नितीश कुमार यांचा चेहरा आगामी निवडणुकीत चालणार नाही. त्यामुळे मोदीच पोस्टरवर हवेत हा भाजपचा आग्रह जेडीयूवाले मानायला तयार नाहीत. त्यामुळे बिहारात संपर्क घोटाळा सुरू झाला आहे. अर्थात भाजपबरोबर जाणे म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र जनाधाराचा स्वतःहून गळा घोटण्यासारखे आहे, असे वाटणारे अनेक जण आहेत. तिकडे राजस्थान, मध्य प्रदेशातही सत्ताबदलाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही सत्ताबदल अटळ आहे. श्री. अमित शहा यांचे लक्ष्य लोकसभेतील किमान ३५० जागांचे व तेही स्वबळावर जिंकण्याचे आहे. ३५० जागा भाजपास मिळतील तेव्हाच अयोध्येत राम मंदिर उभारू, असा विडा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल. देशात पेट्रोलचा भडका उडून महागाईचा वणवा पेटला आहे, शेतकरी संपावर आहेत व शेतकऱ्यांशी सरकारचा संपर्क तुटल्याने संप मोडून काढण्याचे काम सुरू आहे. पालघर साम, दाम, दंड, भेदाने जिंकले तसे साम, दाम, दंड, भेद वापरून शेतकरी संप मोडून काढू असेच जणू सुरू आहे. अशा परिस्थितीत मोदी जगात व शहा देशात संपर्क मोहीम राबवत आहेत. त्यांच्या संपर्क कलेचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

आपली प्रतिक्रिया द्या