गुड मॉर्निंग नरेंद्रभाई!

मोदींनी तंबी दिल्यावर सगळे राँग नंबरवाले कामास लागले व ‘नमो ऍप’ सुरू करण्यासाठी धावपळ करू लागले. कदाचित पुढच्या २४ तासांत सगळय़ांचेच ‘नमो ऍप’ सुरू होतील व मोदींना ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्यासाठी स्पर्धा सुरू होईल, पण खुद्द घरातच डिजिटल इंडियाचा हा असा बोजवारा उडालेला दिसला. भाजप खासदारांचे ‘नमो ऍप’ सुरू व्हायचे तेव्हा होतील, पण आम्ही मात्र मोदींना ‘गुड मॉर्निंग’ म्हणत आहोत. आमच्या ‘जनता ऍप’वरून. ‘गुड मॉर्निंग नरेंद्रभाई!’

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे देशाचे अनभिषिक्त ‘नेते’आहेत. नववर्षाची सुरुवात आम्ही त्यांना ‘राम राम’ करून करीत आहोत. देशाची सूत्रं हिंदुत्ववाद्यांच्या हाती असल्याने ‘गुड मॉर्निंग’ म्हणणे बरोबर नाही, पण भाजप अंतर्गत ‘गुड मॉर्निंग’ हा वादाचा विषय सध्या बनला आहे. हा वाद ‘जी.एस.टी.’ किंवा ‘नोटाबंदी’प्रमाणे जटील नाही. तसा सोपा आहे. पंतप्रधान हे शिस्तीचे भोक्ते आहेत. मोदी सकाळी उठतात व भाजपच्या खासदारांना ‘गुड मॉर्निंग’करणारा संदेश ‘नमो ऍप’वर पाठवतात, पण पाच-दहा खासदार सोडले तर पंतप्रधानांच्या ‘गुड मॉर्निंग’ला कुणीच प्रतिसाद देत नाही. भाजप खासदारांनी मोबाईलवर ‘नमो ऍप’ डाऊनलोड करून घेतले. हा पक्षाचा आदेश असेलही, पण त्या ‘नमो ऍप’वर संदेश देण्यासाठी पंतप्रधानांना झगडावे लागत आहे. ‘गुड मॉर्निंग’बरोबर ‘नमो जी’ म्हणजे पंतप्रधान राष्ट्रहिताचा एक संदेशही भाजप खासदारांना देत असतात, पण खासदार हा संदेश वाचून प्रतिक्रिया देण्याची ‘तकलीफ’ घेत नाहीत. पक्षाचे खासदारच जर पंतप्रधानांच्या बाबतीत इतक्या बेफिकिरीने वागू लागले तर देशाला शिस्त कशी लावायची? भाजपची चिंतन शिबिरे अधूनमधून होत असतात, पण या चिंतन शिबिरातील ‘धडे’ मूळच्या संघप्रेमींना पचत असले तरी जे बाहेरून आले आहेत त्यांना चिंतन शिबिरात व शिस्तीच्या बाराखडीत फारसा रस दिसत नाही. नाना पटोले यांनी तर बंडाचा झेंडा फडकवीत खासदारकीचाच राजीनामा दिला. नागपूरच्या चिंतन शिबिरास आशीष देशमुखांसारख्या मूळच्या काँग्रेजी आमदारांनी दांडी मारली. दिल्लीतील भाजप खासदार उदित राज यांनी स्वतःचे वेगळे चिंतन सुरू केले आहे. खरं तर

ज्या ध्येयधोरणांसाठी

भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती तो पक्ष व विचारांचा झेंडा आज फडकतो आहे काय? भारतीय जनता पक्षात जनसंघाचा विचार आहे, पण जनसंघावर मात करणारे बाहेरच्यांचे आक्रमण वाढले आहे व त्या जनसंघीयांपेक्षा ‘बाटगे’च विचारांच्या जोरबैठका मारू लागले आहेत. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षांपेक्षा मेहबुबा मुफ्ती किंवा नितीशकुमारांचे ‘विचार’ प्रिय वाटत आहेत, हा चिंतनाचा विषय आहे. अनेक ‘टाकाऊ’ काँग्रेस, सपा किंवा बसपावाले पक्षात घुसल्याने अनेकांची घुसमट होत आहे व हेच घुसखोर पंतप्रधानांना गुड मॉर्निंग करीत नसावेत अशी आमची चिंता आहे. अर्थात कधी कधी ‘बाटगा’ही जोरात बांग देतो. तसेही घडू शकते. गुजरातमधील निकाल हे भाजपसाठी चिंतन करण्यासारखेच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची ‘मन की बात’ ही सगळय़ांसाठीच अस्वस्थ करणारी आहे. मोदींनी ‘डिजिटल इंडिया’चा नारा सुरुवातीलाच दिला आहे. संपूर्ण देश त्यांना डिजिटल करायचा आहे. गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे अर्जही ‘डिजिटल’ पद्धतीने म्हणजे ऑनलाइन भरायला लावून गोंधळ उडवला, पण खुद्द भाजपचे लोकप्रतिनिधी ‘डिजिटल’ क्रांतीचे शिलेदार व्हायला तयार नाहीत. खासदारांच्या बैठकीत मोदी अनेकदा नाराजी व्यक्त करीत आले. मागच्या एका बैठकीत मोदी यांनी खासदारांना झापले, ‘‘तुम्ही स्वतःला समजता काय? इथे तुम्ही आणि मी कोणीच नाही आहोत. जो काही आहे तो भाजप आहे. संसदेत उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला सांगावे लागते का? मी तुम्हाला २०१९ साली बघून घेईन.’’ पंतप्रधानांनी

इतकी कानउघाडणी करूनही

लोकप्रतिनिधी बेफिकीर असतील तर बात गंभीर आहे. भारतीय  जनता पक्षाचा ‘आयटी’ सेल सगळय़ात जास्त कामसू आहे व त्यांच्या ‘आयटी’ फौजाच सोशल मीडियावर लढे देत असतात. राहुल गांधी यांनीही सांगितले आहे की, ‘‘मला मूर्ख ठरविण्यासाठी भाजपचे हजारावर पगारी नोकर काम करीत आहेत.’’ सत्य काय ते ज्याचे त्यालाच माहीत. अनेक ठिकाणी निवडणुकांचे खरे व संपूर्ण निकाल येण्याआधीच पंतप्रधानांचे अभिनंदनाचे व कौतुकाचे संदेश सोशल मीडियावर पोहोचलेले असतात. इतकी तत्परता असूनही भाजपच्या दिव्याखाली अंधार असावा याचे दुःख पंतप्रधानांना आहे. पंतप्रधान कार्यालयाने ‘नमो ऍप’वर खासदार, मंत्री व मुख्यमंत्र्यांचे वेगवेगळे ग्रुप बनवले. या ग्रुपवर पंतप्रधान थेट संदेश पाठवून संवाद साधू शकतात. याच ग्रुपवर पंतप्रधान ‘कोंबडे’ आरवण्याआधी ‘गुड मॉर्निंग’चा संदेश पाठवत असतात, पण यापैकी अनेकांचे ‘ऍप’ बंदच पडल्याचे आता समोर आले आहे. ‘आयटी’ सेलचे कामसू कार्यकर्ते शोध घेऊ लागले तेव्हा लक्षात आले की, मोठीच गडबड आहे. भाजप खासदार व मंत्र्यांचे फोन नंबर तपासले तर समजले की, किमान ४०-४५ टक्के खासदारांचे नंबरच बदलले होते. १९ राज्यांतील मुख्यमंत्र्यांपैकी १३ जणांचे नंबर बदलले होते. त्यामुळे ‘मोदीं’चे संदेश ‘राँग नंबर’ला पोहोचत होते व ‘गुड मॉर्निंग’ला प्रतिसाद मिळत नव्हता. आता मोदींनी तंबी दिल्यावर हे सगळे राँग नंबरवाले कामास लागले व ‘नमो ऍप’ सुरू करण्यासाठी धावपळ करू लागले. कदाचित पुढच्या २४ तासांत सगळय़ांचेच ‘नमो ऍप’ सुरू होतील व मोदींना ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्यासाठी स्पर्धा सुरू होईल, पण खुद्द घरातच डिजिटल इंडियाचा हा असा बोजवारा उडालेला दिसला. भाजप खासदारांचे ‘नमो ऍप’ सुरू व्हायचे तेव्हा होतील, पण आम्ही मात्र मोदींना ‘गुड मॉर्निंग’ म्हणत आहोत. आमच्या ‘जनता ऍप’वरून. ‘गुड मॉर्निंग नरेंद्रभाई!’

  • Vicky

    Sanajy Raut and Shivsena bhrkatat chalali ahe as distay…kahi pn bolat astat..hindutv hindutv…balasahebch great hote ani rahtil baki kon anhi disat ata

  • mahendrapadalkar

    संजय राऊतांना हल्ली दररोज आधी नरेंद्र मोदी मग भाजप यांच्या नावाने बोट मोडल्या शिवाय करमत नाही. कुठल्याही सर्व सामान्य संपादक तर जाऊद्या पण सुमार दर्जाचे वार्ताहर सुद्धा बरे लिहीतील.
    बर प्रत्येक दिवस नोटाबंदि वर आगपाखड केल्याशिवाय त्यांना शौचास होत नसावे. एका विषयावर अती झाल्यावर किळस येते. अर्थात बौद्धिक दिवाळखोरी रोज जाहिर करायची ठरवले असल्यास काय होणार.
    नशीब नोटाबंदि मुळे पाकिस्तान ला मदत देण्यास ट्रंप नी नकार दिला असा शोध राऊताने लावला नाही.