‘अल्पवयीन’ विकृती

वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच समाजापुढे उभे राहिले आहे. त्यात सोशल मीडियाचा भडीमार आगीत तेल ओतत आहे. त्यातूनच परीक्षा टळावी यासाठी शाळेत काहीतरी ‘भयंकर’ घडवावे असा विकृत विचार अकरावीतील विद्यार्थ्याच्या डोक्यात वळवळतो आणि चिमुरड्या प्रद्युम्नची हत्या करून थंड डोक्याने तो तडीसही नेला जातो. सीबीआयच्या या नवीन खुलाशाने समाजजीवनातील हे धक्कादायक वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. उद्या न्यायालयात काय निकाल लागायचा तो लागेलच. खरा प्रश्न समाजातील अनियंत्रित होत चाललेल्या ‘अल्पवयीन’ विकृतीचे आव्हान कसे पेलायचे हा आहे.

गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या प्रद्युम्न ठाकूर या चिमुरड्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयने त्याच शाळेत अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. परीक्षा टळावी यासाठी शाळेत काहीतरी भयंकर घडवावे म्हणून या मुलाने प्रद्युम्नची निर्घृण हत्या केली, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयचा हा नवीन खुलासा धक्कादायक असला तरी त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढण्याची चिन्हे आहेत. ७ सप्टेंबर रोजी प्रद्युम्नची शाळेच्या स्वच्छतागृहात हत्या झाली होती. हत्येसाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला होता. त्यानंतर लगेच गुरुग्राम पोलिसांनी एकमेव संशयित म्हणून अशोककुमार याला अटक केली होती. मात्र सीबीआयने आता अकरावीतील एका मुलाकडे संशयित म्हणून बोट दाखवले आहे. शिवाय अशोककुमारच्या सहभागाचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, असे सांगत सीबीआयने त्याला सोडून दिले आहे. तथापि त्याच्यावर ‘संशय’ कायम आहे असेही म्हटले आहे. असे जर असेल तर प्रद्युम्न हत्या प्रकरणही दिल्लीच्या आरुषी तलवार हत्या प्रकरणाच्या मार्गावर आहे असेच म्हणावे लागेल. काही वर्षांपूर्वी आरुषी तलवार आणि त्यांच्या कुटुंबाकडे काम करणाऱया हेमराज नावाच्या नोकराचा खून झाला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आधी तीन आरोपींना अटक केली होती. मात्र

आरोपपत्रच दाखल न झाल्याने

ते तिघेही कायद्याच्या कचाट्यातून सुटले होते. पुढे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे आल्यावर सीबीआयने डॉ. राजेश आणि नुपूर तलवार या आरुषीच्या आईवडिलांनाच आरोपी केल्याने खळबळ माजली होती. त्यांची तुरुंगातही रवानगी झाली होती. मात्र गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे आरुषीची हत्या नेमकी कोणी केली, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. प्रद्युम्न ठाकूर हत्याप्रकरणीही गुरुग्राम पोलिसांनी अटक केलेला अशोककुमार आणि सीबीआयने ताब्यात घेतलेला अकरावीतील विद्यार्थी असे दोन ‘संशयित’ झाले आहेत. पुन्हा अशोककुमारविरुद्ध पुरावे नाहीत, पण ‘संशय’ कायम आहे, असे सीबीआयचे म्हणणे आहे तर अशोककुमारच्या अटकेबाबत गुरुग्राम पोलीस ठाम आहेत. म्हणजे एक हत्या आणि दोन तपास यंत्रणांचे दोन निष्कर्ष, ही स्थिती आरुषी प्रकरणासारखीच आहे. अर्थात प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा अद्यापि व्हायचा आहे. साक्षीपुरावे व्हायचे आहेत. त्यामुळे तपास यंत्रणांच्या निष्कर्षातील तफावतीबाबत आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. मात्र ज्या क्षुल्लक कारणासाठी चिमुरड्या प्रद्युम्नची हत्या झाली हे सगळेच भयंकर आहे. माणुसकी आणि मानवी संवेदना बोथट झाल्याचा तसेच तरुणांमधील विकृत मानसिकतेने परिसीमा गाठल्याचा एक पुरावा आहे.

स्वार्थापुढे एखाद्याचा जीव

ध्याच्या जगात कवडीमोल ठरत आहे. क्षुल्लक वाद किंवा किरकोळ भांडण कधी जीवघेणे ठरेल याचा नेम राहिलेला नाही. या विकृतीचे लोण शाळकरी मुलांपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यातून कधी मित्र मित्राचे खंडणीसाठी अपहरण करून हत्या करतात, कधी वर्गमैत्रिणीवर सामूहिक बलात्कार करतात तर कधी किरकोळ वादातून विद्यार्थ्याचा बळी घेतला जातो. वाढणारा स्वार्थ आणि कमी होणारी संवेदनशीलता हे एक आव्हानच समाजापुढे उभे राहिले आहे. त्यात सोशल मीडियाचा भडीमार आगीत तेल ओतत आहे. त्यातूनच परीक्षा टळावी यासाठी शाळेत काहीतरी ‘भयंकर’ घडवावे असा विकृत विचार अकरावीतील विद्यार्थ्याच्या डोक्यात वळवळतो आणि चिमुरड्या प्रद्युम्नची हत्या करून तेवढ्याच थंड डोक्याने तो तडीसही नेला जातो. सीबीआयच्या या नवीन खुलाशाने समाजजीवनातील हे धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. अपेक्षा इतकीच की, आरुषी प्रकरणाप्रमाणे प्रद्युम्न हत्या प्रकरणाचे होऊ नये. अन्यथा हत्या झाली, अटका झाल्या, पण प्रद्युम्नला मारले कुणी हा प्रश्न अनुत्तरितच राहील. अर्थात उद्या न्यायालयात काय निकाल लागायचा तो लागेलच. खरा प्रश्न समाजातील अनियंत्रित होत चाललेल्या ‘अल्पवयीन’ विकृतीचे आव्हान कसे पेलायचे हा आहे आणि त्याचे ठोस उत्तर सध्या ना सरकारकडे आहे ना समाजाकडे.