बेकरी दुर्घटनेचा धडा

24

आगीचा धोका, अग्निशमन उपाय आणि अशा आपत्तीप्रसंगी सुटकेचे मार्ग याबाबत आपल्याकडे सर्वच पातळ्यांवर कमालीची बेफिकिरी आणि उदासीनता दिसते. ती पुण्यातील बेकरी दुर्घटनेने पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. ही बेफिकीरी आणि उदासीनता याबाबत जाकरूक होण्याचा विचार यंत्रणा आणि लोकांच्या मनाला शिवला तरी तो पुण्यातील बेकरी दुर्घटनेचा धडा म्हणता येऊ शकेल.

बेकरी दुर्घटनेचा धडा
पुण्यातील बेकरी दुर्घटनेने सहा कामगारांचे बळी घेतले. कळत- नकळत होणारी बेफिकिरीदेखील कशी जीवघेणी ठरते याचा धडा या दुर्घटनेने पुन्हा दिला आहे. खरे म्हणजे काम संपले की कामगार रात्री धंद्याच्या ठिकाणीच पोटमाळ्यावर अथवा इतरत्र झोपणार आणि मालक बाहेरून कुलूप लावून निघून जाणार, हा तसा अनेक छोट्या व्यावसायिकांचा नेहमीचा शिरस्ता असतो. एरवी त्यात कुठलीही अडचण अथवा समस्या येत नसल्याने तो बिनबोभाट सुरू राहतो. साहजिकच त्यातील जोखीम आणि धोके याचा विचार कुणीच करीत नाही. प्रामुख्याने मोठ्या शहरात जागेची अडचण, निवार्‍याचा प्रश्‍न, न परवडणारे घरभाडे, तुटपुंजा पगार, महागाई असे अनेक पैलूदेखील व्यवसायाच्या ठिकाणीच राहण्याच्या ‘सोयी’ला आहेत. पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील ‘बेक्स अ‍ॅण्ड केक्स’ या दुर्घटनाग्रस्त बेकरीतील मृत कामगारही अशाच अपरिहार्य परिस्थितीमुळे बेकरीच्या पोटमाळ्यावरच रात्री मुक्काम करीत असावेत. मालक आणि कामगारांसाठी हा सोयीचा भाग असला तरी गुरुवारच्या आगीमुळे ही सोय वेळप्रसंगी कशी जीवघेणी ठरू शकते हेच दिसून आले आहे. बाहेरून कुलूप असल्याने आग लागल्यानंतरही संधी असूनही ना कामगार बाहेर पडू शकले ना त्यांच्या किंकाळ्या बाहेर ऐकू येऊ शकल्या. एकमेकांना मिठ्या मारलेले त्यांचे संपूर्ण जळालेले मृतदेह म्हणजे जणू जिवाच्या आकांताने सुटकेसाठी केलेली धडपड फोल ठरल्याचीच भीषण जाणीव करून देणारे होते! याच वर्षी मुंबईतील एका मेडिकल स्टोअरला लागलेली आग अशीच वरच्या भागात राहणार्‍या दुकान मालकाच्या कुटुंबातील काही जणांच्या जीवावर बेतली होती. आगीचा धोका, अग्निशमन उपाय आणि अशा आपत्तीप्रसंगी सुटकेचे मार्ग याबाबत आपल्याकडे सर्वच पातळ्यांवर कमालीची बेफिकिरी आणि उदासीनता दिसते. ती पुण्यातील बेकरी दुर्घटनेने पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. ही बेफिकीरी आणि उदासीनता याबाबत जाकरूक होण्याचा विचार यंत्रणा आणि लोकांच्या मनाला शिवला तरी तो पुण्यातील बेकरी दुर्घटनेचा धडा म्हणता येऊ शकेल.

लोकल वाहतुकीचा गोंधळ
उपनगरी रेल्वे सेवेचा कारभार सुधारण्याच्या तुतार्‍या रेल्वेच्या प्रत्येक कार्यक्रमात फुंकल्या जातात. मात्र वारंवार होणारे अपघात, डबे घसरण्याच्या घटना यामुळे सध्या तरी या तुतार्‍या म्हणजे गाजराचीच पुंगी ठरल्या आहेत. गुरुवारी विठ्ठलवाडी स्थानकाजवळ भल्या पहाटे लोकलचे पाच डबे रुळावरून घसरले आणि मध्य रेल्वेचे नेहमीप्रमाणे तीन तेरा वाजले. भल्या सकाळीच हा प्रकार घडल्याने नोकरीवर जाणार्‍या लाखो प्रवाशांचेही वेळापत्रक लटकले. या लोकल अपघातात कोणी जखमी वा मृत झाले नाही हे सुर्दैव असले तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे ‘दुर्दैव’ काही टळले नाही. तब्बल अकरा तास ‘लोकलहाल’ सहन करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. एकदम पाच डबे घसरल्याने रुळांचे तसेच स्लीपर्सचे नुकसान झाले, म्हणून हा जास्त वेळ दुरुस्तीसाठी लागला, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. ते खरेही असेल; पण अनेकांना त्यामुळे कामावरच जाता आले नाही, अनेकांना प्रचंड हालअपेष्टा सहन करीत उशिरा कामाचे ठिकाण गाठावे लागले त्याचे समर्थन कसे होणार? उपनगरी रेल्वे, त्यातील प्रचंड गर्दी, वारंवार विस्कळीत होणारी वाहतूक, त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल या मुंबईकरांसाठी अनपेक्षित घटना नाहीत. मध्य रेल्वेचा गोंधळ प्रवाशांच्या अंगवळणी पडला आहे. वास्तविक ज्या भागात गुरुवारी रुळावरून डबे घसरले त्या रेल्वे मार्गाची तपासणी २२ नोव्हेंबरला करण्यात आली होती. अल्ट्रासॉनिक पद्धतीने तपासणी करून रुळांना भेगा पडल्या आहेत का, तडे गेले आहेत का हे पाहिले जाते. तरीही गुरुवारचा अपघात घडलाच. अपघात ठरवून होत नाही हे मान्य केले तरी लोकल अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. ते कधी कमी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. उपनगरी रेल्वे सेवा सुधारण्याच्या घोषणा कशा पोकळ आहेत यावरच गुरुवारच्या ‘लोकल घसरणी’ने शिक्कामोर्तब केले आहे. मध्य रेल्वेच्या कारभाराचा तमाशा आणि लोकल वाहतुकीचा गोंधळ हा मागील पानावरून पुढे सुरू राहणार असाच त्याचा अर्थ. तो सहन करीत आला दिवस ढकलण्याशिवाय मुंबईकरांकडे दुसरा पर्याय तरी कुठे आहे?

आपली प्रतिक्रिया द्या