आजचा अग्रलेख : सतरंजीखालच्या हालचाली

61

लोकशाहीत प्रत्येकालाच काही ना काही तरी व्हायचे आहे. त्यासाठी संधी व अस्थिरतेची वाट पाहणारे आजही आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘रालोआ’स बहुमत मिळू नये व त्या परिस्थितीत नवी खिचडी पकवावी, संसद त्रिशंकू राहावी म्हणजे आपलेच घोडे पुढे दामटवता येईल. त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांची वेदना समजून घेतली पाहिजे. नितीशकुमार हे ‘सेक्युलर’ असल्यामुळे त्यांनी पाण्यात देव घातले नसावेत व राबडीदेवी काय बोलल्या याकडेही दुर्लक्ष केले असावे हे आम्ही मानतो, पण सतरंजीखाली काहीतरी रोमांचक हालचाली सुरू आहेत एवढे मात्र नक्की!

लालू यादव यांच्या पत्नी श्रीमती राबडीदेवी यासुद्धा एखाद्या वक्तव्याने सनसनाटी निर्माण करू शकतात हे राजकारणातील आश्चर्यच मानावे लागेल. राबडीदेवी या बिहारच्या माजी मुख्यमंत्री म्हणून कुणालाच आठवत नाहीत. तेव्हा आणि आजही त्या फक्त लालू यादवांची ‘चूल व मूल सांभाळणाऱया पत्नी’ म्हणूनच परिचित आहेत. राबडी व लालू हे एक आदर्श जोडपे असून त्यांना एकंदरीत 9 मुलं आहेत. ‘हम दो हमारे नऊ’ इतकी भारी कामगिरी असूनही या जोडप्याने आदर्श संसार केला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राबडीदेवी यांची राजभवनातील विशेष वहीत सही करण्याची मारामार होती, पण लालूंना तुरुंगात जायचे होते. त्यामुळे आपल्या खुर्चीवर त्यांनी राबडीदेवी यांना विराजमान केले. राबडीदेवींचे मुख्यमंत्रीपद व त्यांचा राजकारणातील वावर कधीच कोणी गांभीर्याने घेतला नाही. बाई मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना लालू हेच तुरुंगातून राज्यकारभार हाकीत होते. त्यामुळे राबडीदेवी यांनी आता प्रशांत किशोर व नितीशकुमार यांच्याविषयी जे गौप्यस्फोट केले आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. प्रशांत किशोर यांचा हवाला देत राबडीदेवी यांनी सांगितले की, ‘भाजपबरोबर गेलेले नितीशकुमार हे पुन्हा लालू यादव यांच्या बरोबर महाआघाडीत येऊ इच्छित होते. नितीशकुमार यांचे सांगणे असे होते की, त्यांना स्वतःला महागठबंधनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे. नितीशकुमार यांचा ‘पीके’ म्हणजे प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून

असाही संदेश होता

की, ते 2020 सालात लालूपुत्र तेजस्वी यास बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छितात. याबाबत चर्चा करण्यासाठी श्रीमान प्रशांत किशोर हे लालू यादवांना पाचवेळा भेटले.’ राबडीदेवी यांच्या या दाव्याने नक्कीच खळबळ उडवली आहे व पंतप्रधानपदाच्या अनेक संभाव्य उमेदवारांना विचार करायला भाग पाडले आहे. ‘गोपालगंज ते रायसीना’ असे लालू यादवांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे. लालूंचे आत्मचरित्र हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे मसालेदार व चटपटीत असायलाच हवे. त्या आत्मचरित्रातील नितीशकुमार यांच्याविषयीची ही फोडणी जरा जास्तच झणझणीत पडलेली दिसते. बिहारच्या राजकारणातील ऐन निवडणुकीत या फोडणीने अनेकांना घाम फोडला आहे. आत्मचरित्र म्हणजे गोपनीय चर्चा फोडून विश्वासार्हतेला तडे देण्याचाच हा प्रकार आहे. नितीशकुमार व लालू यादव यांनी एकत्र येऊन विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यांच्या पराभवासाठी प्रत्यक्ष मोदी व त्यांचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ बिहारात उतरले. बिहारात भाजपला सत्ता मिळावी म्हणून आर्थिक ‘पॅकेज’च्या घोषणा केल्या. इतके करूनही बिहारच्या जनतेने भाजपला नाकारले व लालू यादव-नितीशकुमार यांच्या ‘युती’स प्रचंड बहुमत दिले. लालू यादवांच्या पक्षाला जास्त जागा मिळूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केले. तेच नितीशकुमार पुढच्या काही महिन्यांत भाजपास जाऊन मिळाले हे सत्य आहे, पण आता बिहारच्या राजकीय कथानकात जे ‘ट्विस्ट’ आले ते मजेदार आहे. भाजपाला सोडून

नितीशबाबूंना पुन्हा लालूंबरोबर

यायचे होते व हे सर्व नवे समीकरण जुळवताना नितीशबाबूंची नजर दिल्लीतील सर्वोच्च पदावर असल्याचा हा स्फोट आहे. त्यासाठी जुळवाजुळव करण्याकरिता नितीशकुमारांचे दूत म्हणून प्रशांत किशोर लालूंना पाचवेळा भेटल्याची स्फोटक माहिती समोर आली आहे. अर्थात प्रशांत किशोर यांनी अशा भेटीगाठीचा साफ इन्कार केला म्हणून हा विषय संपला असे म्हणता येणार नाही. आज नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठामपणे उभा राहील असा नेता भाजपात नाही आणि पंतप्रधानपदाचा दावेदारही त्यांच्या पक्षात कुणी दिसत नाही, पण हे केव्हा? भारतीय जनता पक्ष स्वतः 270-272 जागा मिळवू शकला तर! आम्ही देशाच्या स्थैर्यासाठी त्यांना शुभेच्छा देत आहोत, पण हिंदुस्थानचे राजकारण व लोकशाही इतकी चंचल ‘बात’ जगात दुसरी नाही. त्यामुळे नितीशकुमार यांच्यासारख्या नेत्यांच्या आशा-आकांक्षा व महत्त्वाकांक्षांना पालवी फुटली तर आश्चर्य वाटायला नको. अर्थात ती वेळ येईल असे आज तरी आम्हाला वाटत नाही. लोकशाहीत प्रत्येकालाच काही ना काही तरी व्हायचे आहे. त्यासाठी संधी व अस्थिरतेची वाट पाहणारे आजही आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘रालोआ’स बहुमत मिळू नये व त्या परिस्थितीत नवी खिचडी पकवावी, संसद त्रिशंकू राहावी म्हणजे आपलेच घोडे पुढे दामटवता येईल. त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांची वेदना समजून घेतली पाहिजे. नितीशकुमार हे ‘सेक्युलर’ असल्यामुळे त्यांनी पाण्यात देव घातले नसावेत व राबडीदेवी काय बोलल्या याकडेही दुर्लक्ष केले असावे हे आम्ही मानतो, पण सतरंजीखाली काहीतरी रोमांचक हालचाली सुरू आहेत एवढे मात्र नक्की!

आपली प्रतिक्रिया द्या