शेअर बाजारातील हाहाकार!

जगभरातील शेअर बाजारातील स्थित्यंतराचा सर्वच बाजारावर परिणाम होतो हे खरे असले तरी नेमके बजेटचे भाषण सुरू असतानाच आपल्याकडील शेअर बाजाराला गळती लागली आणि भांडवली लाभावरील कराच्या घोषणेनंतरच बाजार हेलकावे खाऊ लागला हे कसे विसरता येईल? मागील चार दिवसांत शेअर बाजार गडगडल्याने जे १० लाख कोटी रुपये हवेत विरले त्यात सर्वसामान्य मध्यमवर्गीय, नोकरदार, नवगुंतवणूकदार यांचेही कष्टाचे हजारो कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील सध्याचा हाहाकार गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडणारा आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यापासून घसरणीला लागलेल्या शेअर बाजाराचे गडगडणे अजूनही सुरूच आहे. ही घसरण सामान्य नाही. मोठी उलथापालथ म्हणावी असा जबर फटका शेअर बाजाराला बसला आहे. बजेट सादर झाल्यापासून गेल्या चार दिवसांत कोलमडलेल्या शेअर बाजाराने गुंतवणूकदारांचे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १० लाख कोटी रुपये गिळंकृत केले आहेत. मंगळवारी तर बाजार उघडल्याबरोबर निर्देशांक १२०० अंकांनी कोसळला आणि काही सेकंदातच गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले. शेअर्सचे भाव झपाट्याने कोसळत आहेत. आणखी नुकसान नको या भयाने छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर्स विकण्याचा सपाटा सुरू केला आहे. संभ्रम, घबराट आणि दहशतीने शेअर बाजारावर कब्जा केल्याने कोलाहल आणखी वाढला आहे. शेअर बाजारातील दीर्घकालीन लाभाच्या योजनांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीवर १० टक्के कर लागू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात झाल्याच्या क्षणापासूनच शेअर बाजाराची पडझड सुरू झाली. अर्थात, केंद्र सरकार आणि अर्थ खात्याचे अधिकारी यांना ते मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार जागतिक शेअर बाजारातील घसरण आणि घडामोडींमुळेच मुंबईचा शेअर बाजार कोसळला आहे, मात्र त्यांचा हा युक्तिवाद तकलादू आहे. कारण जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांतील शेअर बाजाराच्या निर्देशांकात जेमतेम १ ते २ टक्के

घसरण
झाली आहे. जपानचा शेअर बाजार ४.६ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा दोन टक्क्यांनी कोसळला आहे. याउलट आपल्याकडील शेअर बाजारात तब्बल साडेतीन टक्क्यांनी निर्देशांक घटला आहे. दीर्घकालीन भांडवली लाभावर सरकारने लादलेल्या ‘एलटीसीजी’ करामुळेच बाजार गडगडला हे स्पष्ट आहे. या कराच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत ४०० अब्ज रुपयांचा महसूल मिळेल असे अर्थखात्याचे वरिष्ठ अधिकारी एकीकडे सांगतात आणि दुसरीकडे शेअर बाजाराच्या घसरणीला १० टक्क्यांचा नवा कर कारणीभूत नाही असा युक्तिवाद करतात. हा बनावच नव्हे तर शुद्ध फसवणूक आहे. जगभरातील शेअर बाजार एकमेकांशी निगडित असतात. त्यांच्यातील स्थित्यंतराचा एकूणच जगभरातील बाजारावर परिणाम होतो हे खरे असले तरी नेमके बजेटचे भाषण सुरू असतानाच आपल्याकडील शेअर बाजाराला गळती लागली आणि भांडवली लाभावरील कराच्या घोषणेनंतरच बाजार हेलकावे खाऊ लागला हे कसे विसरता येईल? मागच्या सहा-सात वर्षांतील शेअर बाजाराची ही सर्वात मोठी घसरण आहे. एक काळ असा होता की, शेअर बाजार म्हणजे अतिश्रीमंत आणि उच्चमध्यमवर्गीयांचेच क्षेत्र असे मानले जात होते, मात्र अलीकडच्या काळात सर्वसामान्य लोक, नोकरदार, कर्मचारी असे कमी उत्पन्न गटातील मध्यमवर्गीयही शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले. बँका आणि शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करून

पुरेसा लाभ मिळत नसल्यामुळेच
र्वसामान्य लोक शेअर बाजाराकडे वळले तर तिथेही मध्यमवर्गीयांना मिळणाऱ्या नफ्यावर सरकारची वक्रदृष्टी पडली. गुंतवणुकीतून उत्तम लाभ मिळवून देणारी एकही सरकारी योजना डोळ्यांसमोर नसल्यामुळेच मध्यमवगींय लोक शेअर बाजाराकडे वळले हे कसे नाकारता येईल? बँका आणि रिकरिंग डिपॉझिटच्या तुलनेत चांगली ‘वाढ’ मिळत असल्यामुळेच शेअर्स खरेदी करण्याबरोबरच ‘एसआयपी’ आणि ‘म्युच्युअल’ फंडात मध्यमवर्गीयांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली. म्हणूनच नोटाबंदीनंतर देशातील उद्योगांपासून सर्वच क्षेत्रांत प्रचंड मंदी आली असतानाही शेअर बाजार मात्र उसळी मारून रोज नवनवे विक्रम स्थापन करत होता. मात्र आता सलग सहा सत्र बाजाराची घसरण सुरूच आहे आणि ती थांबणार कधी याचे उत्तर आज तरी कोणाकडे नाही. ऊर्जा, बँका, रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स धडाधड कोसळले. चार दिवसांत होत्याचे नव्हते झाले. मागची पाच-सहा वर्षे शिस्तीने जी गुंतवणूक केली ती तासागणिक बुडताना दिसू लागली. मागील चार दिवसांत शेअर बाजार गडगडल्याने जे १० लाख कोटी रुपये हवेत विरले त्यात सर्वसामान्य मध्यमवर्गीय, नोकरदार, नवगुंतवणूकदार यांचेही कष्टाचे हजारो कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील सध्याचा हाहाकार गुंतवणूकदारांचे कंबरडे मोडणारा आहे. बाजार कधी सावरेल तेही सांगता येत नाही. त्यामुळे गुंतवणूक काढून घेणे किंवा डोळ्यांदेखत आटत चाललेली रक्कम हताशपणे पाहणे याशिवाय कुठलाही पर्याय गुंतवणूकदारांसमोर सध्या तरी दिसत नाही!

  • D.P.Godbole,

    शेअर बाजारात गेल्या काही महिन्यात अभूतपूर्व उसळण दिसून येत होती त्याला हर्षद मेहता सारखे उलाढाली करणारे सटोडिये कारणीभूत नव्हते असे मानणे हा भाबडेपणा असू शकेल.त्यावेळी देखील त्याचे नाव प्रथम कधी झळकत नसे.वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या बुडीत जाऊ लागल्यावरच हे हळूहळू उघडकीला आले.आणि अर्थाशात्री म्हणून नावाजले गेलेले आपले भूतपूर्व पंतप्रधान हे बहुधा त्या काळात रिझर्व्ह बँकेची सूत्रे सांभाळत होते आणि त्या बँकेला देखील असे काही घडते आहे त्याचा पत्ता देखील लागला नव्हता असे आठवते. म्हणूनच सेबी संस्था स्थापन झाली.(२) सामान्य गुंतवणूक दारांचे लाखो कोटी रुपये बुडाले हे म्हणणे देखील अर्ध सत्य आहे कारण असा गुंतवणूकदार रोजच्यारोज शेअर खरेदी/विक्री करून नफा/तोटा झेलत नसतो.