भाजपातील ‘तिसरा’ आदमी!

ईशान्येकडील ‘त्रिपुरी’ पौर्णिमा

ईशान्येकडील काही राज्यांत भाजपची सरकारे आहेत, पण ती सरळसोट मार्गाने आलेली नाहीत. त्रिपुरा हे राज्य अपवाद ठरले. भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे आतापर्यंत देशाला व जगाला माहीत होती. १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ईशान्येमध्ये साजऱ्या झालेल्या ‘त्रिपुरी’ पौर्णिमेचे हेच महत्त्व आहे. ‘तिसऱ्या’ आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे!

हिंदुस्थानच्या सीमेवरील ईशान्येकडील राज्यांना कमालीचे महत्त्व  आहे. हिंदुस्थानच्या सात बहिणी म्हणजे ‘सेव्हन सिस्टर्स’ असा उल्लेख या राज्यांचा होत असला तरी गेल्या पाच-सहा दशकांत या सात बहिणी कायम अंधारात आणि उपेक्षित राहिल्या. हिंदुस्थानच्या जडणघडणीत या सात बहिणींना कधीच मानाचे पान मिळाले नाही. मेघालयाचे पूर्णो संगमा हे लोकसभेचे सभापती झाले. देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेली ईशान्येकडील राज्यांतील ही पहिली व्यक्ती होती. या राज्यांत सरकारे येत राहिली, पडत राहिली. उर्वरित देशाच्या खिजगणतीतही ही राज्ये नसावीत अशीच आजपर्यंत एकूण स्थिती होती. मात्र आता ईशान्येकडील त्रिपुरा, नागालॅण्ड आणि मेघालय राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ईशान्य हिंदुस्थानची देशभरात चर्चा झाली. या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत व या राज्यांवर भारतीय जनता पक्षाने विजयी पताका फडकवून डाव्यांसह इतरांचे गड उद्ध्वस्त केले आहेत. नागालॅण्डमध्ये भारतीय जनता पक्षाने जवळ जवळ बहुमत प्राप्त केलेच आहे. मेघालयात भाजपला मोठे यश मिळाले नसले तरी काँग्रेसची कोंडी करण्यात तो पक्ष यशस्वी झाला आहे. काँग्रेस २१ जागा मिळवून मोठा पक्ष म्हणून उभा राहिला, पण येथे

‘गोव्या’ची किंवा मणिपूरचीच पुनरावृत्ती

होईल असे दिसते. अर्थात या सगळ्यांत भाजपच्या शिरपेचात मानाचा ‘तुरा’ खोवला आहे तो त्रिपुरातील देदीप्यमान अशा विजयाने. त्रिपुरातील २०-२५ वर्षांची डाव्यांची राजवट साफ उद्ध्वस्त करून भाजपने तिथे संपूर्ण बहुमत मिळवले आहे. ‘त्रिपुरा’तील भाजप विजय हा उत्तर प्रदेश व गुजरात विजयापेक्षा मोठा आहे. उत्तर प्रदेश व गुजरातसारख्या राज्यांत भाजपचा पाया व कळस मजबूत आहे. जमिनीची मशागत वर्षानुवर्षे सुरूच आहे. राममंदिरापासून गोध्रा, तीन तलाकसारख्या विषयांची फोडणी अधूनमधून सुरूच असते, पण त्रिपुरातील विजय हा वाळवंटातून ‘केशरा’चे पंचवीस मण पीक काढल्यासारखे आहे. २०-२५ वर्षांची डाव्यांची सत्ता व स्वच्छ प्रतिमेचे ढोल पिटणारे माणिक सरकार यांचे सरकार उलथवून टाकणे सोपे नव्हते, पण ईशान्य भाजपची जी त्रिपुरी पौर्णिमा फुलली आहे त्यामागे सुनील देवधर व त्यांच्या टीमची किती अफाट मेहनत होती हे आता उघड झाले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून मराठी सुभेदार  सुनील देवधर यांनी त्रिपुरातील बंजर जमिनीत जे पेरले ते आता उगवले. फक्त सभा, भाषणे किंवा थापेबाजी करून मिळवलेला हा विजय नाही. देवधर व त्यांचे संघ विचाराचे कार्यकर्ते त्रिपुरात ठाण मांडून बसले. त्यांनी हल्ले व संकटांशी सामना केला. त्रिपुरात भाजपचा एक तरी आमदार निवडून येईल काय, असे

प्रश्नचिन्ह असताना

तिथे भाजपचे सरकार आणले. ‘नागालॅण्ड’मध्ये व मेघालयात भाजपने विजयासाठी झोकून दिले. त्रिपुरात देवधर एकाकी होते. तेव्हा मोठा विजय ‘त्रिपुरा’चा आहे. ईशान्येकडील राज्यांकडे काँग्रेसने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. विकासाच्या नावाखाली पाण्यासारखा पैसा ओतला, पण जे गंगाशुद्धीकरण मोहिमेचे झाले ते ईशान्येत विकासकामांचे झाले. मणिपूर कायम अशांत असते आणि कश्मीरपेक्षाही जास्त हिंसाचार तेथे होत असतो. तिथे आता भाजपचे राज्य आहे. अरुणाचलातही भाजपने सत्ता घेतली आहे. अरुणाचल चीनच्या डोळय़ांत सदैव खुपत असते व नागालॅण्डमध्ये फुटीरतावाद्यांचे सुरुंग अधूनमधून फुटत असतात. आता नागालॅण्ड व त्रिपुरात केशरी रंगाची उधळण झाली. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या सत्तापरिवर्तनास महत्त्व आहे. ईशान्येकडील काही राज्यांत भाजपची सरकारे आहेत, पण ती सरळसोट मार्गाने आलेली नाहीत. त्रिपुरा हे राज्य अपवाद ठरले. भारतीय जनता पक्षाला विजय प्राप्त करून देणारी फक्त दोनच माणसे आतापर्यंत देशाला व जगाला माहीत होती. १० कोटी सदस्य संख्या असलेल्या या पक्षात विजय प्राप्त करून देणारे फक्त दोघेच नसून ‘तिसरा’ आदमीसुद्धा आहे. ईशान्येमध्ये साजऱ्या झालेल्या ‘त्रिपुरी’ पौर्णिमेचे हेच महत्त्व आहे. ‘तिसऱ्या’आदमीचे आम्हाला कौतुक आणि अभिमान आहे!

  • Kashinath Narahari Patwekar

    Nirmal manane, nirbhal ase abhinandan karayala pahije to manacha mothepana jhala asatA/disala asata. Lihilele abhinandan ha zulamacha ram ram vatato ani disato.