बेइमान कोण?

बेनामी इस्टेटींची गोळाबेरीज करत सर्जिकल स्ट्राइक करण्याआधी कश्मीर खोर्‍यांतील हिंदू पंडितांच्या बेनामी नव्हे तर कायदेशीर इस्टेटी परत मिळवून देण्यासाठी सरकार एखादा सर्जिकल स्ट्राइक करणार आहे काय? बेनामी व इनामी इस्टेटींच्या घोळात कश्मिरी पंडितांच्या इस्टेटीचा बट्ट्याबोळ होऊ नये. मोदी यांनी बेइमानांच्या विरोधात जो हल्लाबोल सुरू केला आहे तो मस्त व अभिनंदनास पात्र आहे. मोदी यांचे कौतुक तरी किती करावे? करावे तेवढे थोडेच!!

बेइमान कोण?
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. त्यामुळेच ते ज्या जनता कार्यक्रमात जातील तेथे समोरच्या बाजूने फक्त ‘मोदीऽऽ मोदीऽऽ’ अशाच घोषणा ऐकू येतात. हे सर्व घोषणाबाज लोक विद्यार्थी परिषदेचे असल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केला होता. (आम्ही त्याच्याशी सहमत नाही.) अर्थात प. बंगाल, बिहार, केरळ विधानसभा निवडणुकांतही जाहीर सभांतून अशा गर्जना झाल्याच होत्या. तेथे निकाल वेगळे लागले तरी मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच राहिली व ‘नोटाबंदी’नंतर त्यांची लोकप्रियता सातव्या अस्मानावर पोहोचली असल्याचे भाजप प्रचारकांचे म्हणणे आहे. ‘नोटाबंदी’नंतर पंतप्रधानांनी बेनामी इस्टेटींवर सर्जिकल स्ट्राइक करण्याचा मनोदय जाहीर केला आहे व त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. बेइमान लोकांना अजिबात सोडणार नाही, त्यांच्या पापाचा घडा भरलाच म्हणून समजा, असा ठोसा पंतप्रधान मोदी यांनी लगावला आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ‘नोटाबंदी’ केली व आता
बेनामी संपत्ती शोधण्याची
मोहीम उघडून मोदी यांनी राष्ट्रभक्तीचा दाखलाच दिला आहे. अनेक नेते, उद्योजक, व्यापारी, अंडरवर्ल्डचे लोक, परदेशांत ये-जा करणारे अनिवासी हिंदुस्थानी ‘कर’ चुकवून मालमत्तांत गुंतवणूक करतात, ही बेइमानीच आहे. पण आपल्या देशात ‘बेइमान’ कोणास म्हणावे याबाबत आजही संभ्रमच दिसत आहे. धनदांडग्यांनी विदेशात दडवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी यांनी ‘नोटाबंदी’चा सर्जिकल स्ट्राइक केला. पण सत्य असे की, विदेशातून दमडाही परत आला नाही. स्वदेशातल्या भांडवलदार, धनदांडग्यांचे नोटाबंदीनंतर एक नया पैशाचे नुकसान झाले नाही; पण सामान्य जनता मात्र या सर्व प्रकरणात होरपळून निघाली आहे. आता बेनामी संपत्तीबाबत सरकारने नक्की काय करायचे ठरवले आहे? नोटाबंदीप्रमाणे ‘बेनामी संपत्ती’बाबतच्या कठोर पावलांखाली पुन्हा एकदा गरीब आणि मध्यमवर्गीय चिरडले जाऊ नयेत. खरे बेनामी संपत्तीवाले सर्व काही कायद्याच्या चौकटीत बसून राहतील नामानिराळे आणि सामान्य जनतेच्या अंगावर बर्‍यापैकी कपडे, चड्डी-बनियन दिसतेय ती बेनामी संपत्ती म्हणून भररस्यात उतरवली जाईल, असे होऊ नये. धनदांडगे व काळा बाजारवाले यांचे कंबरडे मोडण्याची गर्जना करीत ज्या लाथा उचलल्या जातात त्या लाथा सामान्यांच्याच कंबरड्यात बसतात. ‘नोटाबंदी’नंतर एकतरी काळा पैसेवाला जेलात खडी फोडायला गेला आहे काय? याचे उत्तर द्या. बेनामी प्रॉपर्टी कायदा झाल्यावर काय व्हायचे ते होईल. पण या निर्णयाची बोंब सुटताच सर्वत्र बेनामीवाल्यांनी त्यांच्या इस्टेटी
चोवीस तासात ‘पवित्र’
करून घेतल्या असतील, जसे ‘नोटाबंदी’ घोषणेनंतर शेकडो- कोटी रुपयांबाबत घडले. कायद्याच्या पळवाटा व भगदाडे जणू या लक्ष्मीपुत्रांसाठीच ठेवली आहेत. बाकी सामान्य जनतेने त्याच कायद्याच्या टाचेखाली चिरडायचे ही सध्या रीतच बनली आहे. उरी हल्ल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा शब्द खमंग ढोकळ्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या जिभेवर तरंगतो आहे. पण ‘सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकड्यांचे कंबरडे साफ मोडले व आता त्यांची बोलतीच बंद झाली,’ अशा विजयी आरोळ्या ठोकणार्‍यांना नंतरच्या पाक प्रतिहल्ल्यानंतर जणू मानसिक मूर्च्छाच आली. सर्जिकल स्ट्राइकनंतरही पाकिस्तानची दहशतवादी मस्ती कायम असून त्यानंतरही आपले पन्नासच्या वर जवान पाक हल्ल्यात शहीद झाले आहेत. यास दुर्दैवच म्हणावे लागेल! त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकच्या तुतार्‍या फुंकणे बंद झाले असले तरी राजकीय सर्जिकल स्ट्राइकच्या पिपाण्या रोज नव्याने वाजत आहेत. अर्थात राजकारणात हे असे घडायचेच. सीमेवरील जवानांचे प्राण वाचवता येत नसतील तर बेइमान नक्की कोण? हा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. बेनामी इस्टेटींची गोळाबेरीज करत सर्जिकल स्ट्राइक करण्याआधी कश्मीर खोर्‍यांतील हिंदू पंडितांच्या बेनामी नव्हे तर कायदेशीर इस्टेटी परत मिळवून देण्यासाठी सरकार एखादा सर्जिकल स्ट्राइक करणार आहे काय? बेनामी व इनामी इस्टेटींच्या घोळात कश्मिरी पंडितांच्या इस्टेटीचा बट्ट्याबोळ होऊ नये. मोदी यांनी बेइमानांच्या विरोधात जो हल्लाबोल सुरू केला आहे तो मस्त व अभिनंदनास पात्र आहे. मोदी यांचे कौतुक तरी किती करावे? करावे तेवढे थोडेच!!