आजचा अग्रलेख : रोखपालांचे करायचे काय?

3

बेकायदेशीरपणे साठवलेला हा पैसा म्हणजे वेगळ्या प्रकारचा दहशतवादच आहे आणि हा दहशतवाद लोकशाहीला सुरुंग लावत आहे. ममता बॅनर्जी प्रचारासाठी बांगलादेशातील कलाकार आणतात, इतरत्र पैशांचे पेटारे सापडतात. अशावेळी तामीळनाडूतील ‘वेल्लोर’ मतदारसंघातील एखाद्दुसरी लोकसभा निवडणूक रद्द करून काय होणार? अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल आणला, तो लोकपालही निवडणुकीतील ‘रोखपालां’चे रोकडा प्रताप पाहून हतबल झाला असेल.

निवडणुका हा आता पैशांचा खेळ झाला आहे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांची गंगोत्री म्हणजे आपल्या निवडणुका असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत असत. दुसऱया टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत, पण दोन दिवसांत देशभरात प्रमुख राजकीय पक्षांच्या ठिकाणांवर धाडी पडल्या असून मोठी रोकड जप्त केल्याचा दावा केला जात आहे. तामीळनाडूत डीएमके पक्षाच्या नेत्या कनिमोझी यांच्या निवासस्थानी धाड घातली. आयकर विभागाचे अधिकारी ‘द्रमुक’ ताईच्या घरात घुसले व हात हलवत परतले असा दावा त्या पक्षाचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी केला. विरोध करणाऱयांवर अशा धाडी टाकून सरकारी यंत्रणा दबाव टाकत आहे, हा लोकशाहीचा खून आहे, असा आरोप द्रमुक अध्यक्षांनी केला. तामीळनाडूत अण्णा द्रमुक पक्षाचे सरकार असून भारतीय जनता पक्ष त्या पक्षाशी युती करून निवडणुका लढवत आहे. तामीळनाडूच्या निवडणुकीत पैशांचे वाटप हा प्रकार नवीन नाही. मतदारांच्या घरी टीव्ही, फ्रीज, सोन्याचे दागिने पोहोचविण्याचे सामुदायिक प्रयोगही तिथे होत असतात. मतदारांना भ्रष्ट करायचे हे प्रकार तिथे अनेकदा घडले आहेत. मतदार अशा प्रकारांना एकदा चटावले की मग भ्रष्ट उमेदवारांना निवडणूक लढवणे सोपे जाते. तामीळनाडूमधील ‘वेल्लोर’ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक तर

राष्ट्रपतींच्या हुकमाने

आता रद्दच केली गेली आहे. तिथे म्हणे पैशांचे जोरदार वाटप झाले. त्यामुळे निवडणूक सरळ मार्गाने होणार नाही अशी भीती आपल्या निवडणूक आयोगास वाटत आहे. तामीळनाडू, कर्नाटकात पैशांचे वाटप हे प्रकार नवीन आहेत काय? असा प्रश्न तेथील मतदारांनी विचारला आहे. गरिबी हटविण्याचा हंगाम म्हणजे निवडणुका. सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुका होतच राहाव्यात असे देशातील मतदारांना वाटत राहते. या काळात सर्वच पक्ष आपापल्या कुवतीनुसार गरिबी हटविण्याचा प्रयत्न करीत असतात. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या खास माणसांवर धाडी घातल्या व शंभरेक कोटी रुपयांचे गठ्ठे पकडले. या सर्व गुलाबी नोटा होत्या. महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत 211 कोटी रुपयांची रोकड जप्त केली गेली. भ्रष्ट पैशांची ही गंगा उगम कुठून पावते व जाते कुठे हे रहस्य राहिलेले नाही. ‘हमाम में सब नंगे’ त्यातलाच हा प्रकार असला तरी प्रत्येक नागडा दुसऱयाकडे बोटे दाखवून नाचत आहे. नोटाबंदीनंतर काळ्या पैशांच्या उगमस्थानावर हल्ला होईल. सगळ्यात पहिला कश्मीरातील दहशतवाद थांबेल, दहशतवाद्यांना जो अर्थपुरवठा होत आहे त्याची मुळेच नोटाबंदीमुळे उखडली जातील असे सांगितले गेले. शिवाय ‘नोटाबंदी’मुळे निवडणुकीत

काळा पैसा व वारेमाप ‘रोकड’

फडफडणार नाही ही सरकारची भूमिका होती. या दोन्ही विषयांवर येणाऱया नव्या सरकारला पुन्हा कठोर पावले उचलावी लागतील. नक्षलवादी, दहशतवादी यांच्याकडे आजही काळ्या पैशांचा ओघ आहे. त्याचा वापर करूनच रक्ताचे सडे पाडले जात आहेत. पैसा हा काळा की पांढरा या भानगडीत कोणी पडणार नाही, पण बेकायदेशीरपणे साठवलेला हा पैसा म्हणजे वेगळ्या प्रकारचा दहशतवादच आहे आणि हा दहशतवाद लोकशाहीला सुरुंग लावत आहे. कर्नाटकात पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरमधून एक मोठा पेटारा उतरवला व इनोव्हा गाडीत ठेवून तो पेटारा पुढे गेला. ‘‘त्या पेटाऱयात काय होते?’’ असा प्रश्न काँग्रेस व इतरांनी विचारावा ही गंमत आहे. त्यात काय असायचे ते असेल. आम्ही म्हणतो, त्या पेटाऱयात चिंचोके असतील, पण असे आरोप-प्रत्यारोप करून गंगा स्वच्छ होणार आहे काय? जगातील सगळ्यात मोठय़ा लोकशाहीस सुरुंग लागले आहेत. ममता बॅनर्जी प्रचारासाठी बांगलादेशातील कलाकार आणतात, इतरत्र पैशांचे पेटारे सापडतात. अशावेळी तामीळनाडूतील ‘वेल्लोर’ मतदारसंघातील एखाद्दुसरी लोकसभा निवडणूक रद्द करून काय होणार? अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल आणला, तो लोकपालही निवडणुकीतील ‘रोखपालां’चे रोकडा प्रताप पाहून हतबल झाला असेल.