लोकांनी आपला ऐवज सुरक्षित ठेवायचा तरी कुठे?

वैभव मोहन पाटील

वी मुंबईत गेल्या महिन्यात पोलीस यंत्रणांसह सर्वांनाच चक्रावून सोडणारा बँक दरोडा पडला. जुईनगर परिसरातील बँक ऑफ बडोदा शाखेतील ‘लॉकर रूम’मध्ये हा दरोडा टाकण्यात आला ज्यात जवळपास पावणेतीन कोटींच्या मालमत्तेची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या बँकेची शाखा असलेल्या इमारतीतीलच एका भाड्याने घेतलेल्या गाळ्यातून बॅंकेच्या लॉकर रूमपर्यंत भुयारी मार्ग काढण्यात आला व २७ लॉकर्समधील कोट्यवधीचा ऐवज लुटण्यात आला, ज्यात सोने, चांदी व रोख रकमेचा समावेश होता. खरेतर जुईनगर-नेरुळ हा परिसर सर्वसामान्य लोकांच्या वास्तव्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बँकेतील बहुतांशी खातेधारक सर्वसामान्यच आहेत. लॉकर्समधील सर्व मालमत्ता लुटून नेल्याने त्या कुटुंबीयांवर आभाळच कोसळले आहे. मात्र लॉकरमध्ये गोपनीयरीत्या ठेवलेले पैसे व दागिन्यांची संख्या सांगायची कुणा व कशी अशी अवस्था या खातेधारकांची झाली आहे.

शहरातील वाढत्या घरफोड्या, लुटीचे प्रकार व चोरीच्या घटना लक्षात घेता अनेक जण बँकेतील लॉकरमध्ये आपल्याकडील मौल्यवान वस्तू ठेवण्यास प्राधान्य देतात. सोने, चांदी, हिरे यांसह रोख रक्कमही लॉकरमध्ये कडीकुलूपबंद करून ठेवतात. ही पद्धत खरेतर आजवर अत्यंत सुरक्षित पद्धत म्हणून ओळखली जात होती. मात्र इथे दरोडेखोरांनी लॉकर रूममध्येच घरफोडी करून सुरक्षेच्या सर्व सीमा भेदल्या आहेत. लॉकरमध्येदेखील मालमत्ता सुरक्षित राहात नसेल तर आता लोकांनी आपली संपत्ती ठेवायची कुठे हा मोठा यक्षप्रश्न लोकांसमोर उभा राहिलेला आहे. गेल्या काही वर्षांत चोरी-दरोड्याच्या जुन्या अनेक पद्धती हद्दपार झालेल्या असून चोर नववव्या क्लृप्त्या शॉर्टकट पैसे कमावण्याच्या हेतूने वापरताना दिसत आहेत. नवी मुंबईतील घटनेने मात्र सर्वांनाच अंतर्मुख केलेले असून अनेक प्रश्न तपास यंत्रणांसमोर उभे केलेले आहेत.

घरफोडी करण्यासाठी एखाद्या घराची व बँकेची रेकी करण्याचा प्रकार सर्रास घडताना दिसतो. त्यानुसार सोयीच्या वेळेत त्या घरात गुपचूप किंवा जबरदस्तीने घुसून लूट करण्याचे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहेत. नवी मुंबईतच एका व्यापाऱ्याच्या घरात काही दिवसांपूर्वीच असाच एक दरोडा टाकण्यात आला होता, त्यातदेखील करोडो रुपयांची लूट केली गेली. एखाद्या स्थळाची पूर्ण पाहणी करून, तेथे दरोड्यातून प्राप्त होणाऱ्या संपत्तीचीदेखील माहिती मिळवली जाते व पूर्ण नियोजनबद्ध व पद्धतशीरपणे लूट केली जाते. आजकाल ऑनलाइन बँकिंगमुळे रोखीचे व्यवहार खूप कमी झालेले आहेत. बहुतांशी व्यवहार हे इसीएस, आरटीजीएस, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून केले जातात. त्यामुळे पूर्वी सर्रास घडणारे पाकिटमारीचे वा रस्त्यावरील लुटीचे प्रकार कमी प्रमाणात होताना दिसत आहेत. मात्र क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यासारखे ऑनलाईन व्यवहार आता लुटारूंच्या रडारवर आहेत.

देशी आंतरदेशीय हॅकर्सच्या माध्यमातून अनेक ऑनलाइन दरोडे पडल्याच्या व त्यातून कोट्यवधींची माया परस्पर हडप केल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. कालमानानुसार चोरीच्या व घरफोडीच्या घटनांमध्ये आधुनिक पद्धती वापरात आणल्या जात असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. ऑनलाइन बँकिंगमध्ये फसवणूक होत असल्याच्या तक्रारीदेखील सातत्याने होताना दिसत आहेत. सायबर क्राईमचा तपास करणाऱ्या यंत्रणांच्या मर्यादा आता हे गुन्हे करणाऱ्यांनी ओळखल्या आहेत असेच म्हणावे लागेल. २०१५ मध्ये तर कुलाब्यातील पोलीस महासंचालकांच्या कार्यालयजवळीलच एक एटीएम हॅक करून अनेक पोलिसांचा एटीएम डाटा चोरून त्याद्वारे खरेदीही चोरांनी केल्याचे निदर्शनास आले होते. यावरून पोलीसही या हॅकर्सच्या नजरेतून सुटू शकले नसल्याचे स्पष्ट होते. या वर्षी मार्च महिन्यात धारावी येथील बँक ऑफ इंडियाच्या एका एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनमधून दीड कोटींची लूट करण्यात आली. याच वर्षी जूनमध्ये नागपाडा येथील एका एटीएममधून हॅकर्सनी २० लाख रुपये लुटून नेले. गेल्या वर्षभराच्या आत तब्बल एक हजारांच्या वर घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातील बऱयाचशा घटनांचा अद्याप तपास लागणे बाकी आहे.

दरोड्याच्या निरनिराळ्या वापरल्या जाणाऱ्या पद्धती व ऑनलाइन आर्थिक व्यवहारांवरदेखील पडत असलेले दरोडे आज चिंतेची बाब आहे. नागरिकांनी याबाबतीत अत्यंत सावधता बाळगणे गरजेचे आहे. घरफोडी करावयाच्या ठिकाणी आजूबाजूला रेकी करणाऱ्या व घरफोडीच्या उद्देशाने घर घेऊन राहणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून हालचाली वेळीच ओळखता आल्या पाहिजेत. एटीएममधून पैसे काढताना आजूबाजूचे निरीक्षण गरजेचे आहे. बहुतांशी एटीएम सेंटरच्या बाहेर आज सुरक्षारक्षक आढळत नाहीत. या परिस्थितीचा फायदा चोर उठवताना दिसत आहेत. त्यामुळे छुपा कॅमेरा व इतर पद्धती वापरून आपल्या कार्डवरील माहिती चोरीला न जाण्याची दक्षता नागरिकांनी घ्यायला हवी. आपण राहात असलेला आजूबाजूचा परिसर व शेजारीपाजारी यांची व्यवस्थित माहिती आपल्याला असणे तितकेच गरजेचे आहे.

नवी मुंबईतील बँकेवर भुयारामार्गे घडलेली चोरीची घटना भविष्यातील या चोरांच्या वाटचालीच्या पाऊलखुणा दर्शवणारी आहे. पाचपन्नास फूट भुयार खोदून कुणालाही खबर लागू न देता लॉकरवर दरोडा घालण्याची घटना सुन्न करणारी आहे. बँकेसारख्या जागा जर लोकांना आपला ऐवज ठेवण्यासाठी सुरक्षित नसतील व सातत्याने भरवस्तीत दिवस रात्र घरफोडीच्या घटना घडत असतील तर लोकांनी आपला पैसा व दागदागिने सुरक्षित ठेवायचे तरी कुठे?