आभाळमाया – संकल्प आणि विकल्प?

माणसाच्या अवकाशभरारीने गेल्या साठ वर्षांत विलक्षण गतिमानता साध्य केली आहे. काही लाख किलोमीटर अंतरावरचा चंद्र म्हणजे काहीच वाटू नये. इतक्या दूरच्या वैश्विक गोष्टींचे नित्यनवीन शोध लागतायत. काही वर्षांपूर्वी पृथ्वीसारखा एखादा ग्रह दूरच्या दीर्घिकेत सापडल्याच्या बातम्या यायच्या तेव्हा विलक्षण आश्चर्य वाटायचं. आता ‘दुसरी’ सूर्यमालाच सापडल्याचं वृत्त आहे. असाच एक आपल्या सूर्यासारख्या तारा आणि त्याच्याभोवती आपल्यासारखीच ग्रहमाला!

इतकं सिद्ध झालं की, पुढचा नेहमीचाच प्रश्न येतो मग ‘त्या’ सूर्याच्या’ ग्रहमालेत एखादी ‘पृथ्वी’ असली तर तिथे ‘आपल्यासारखं कोणी असेल? आता एवढ्या विराट विश्वात आपण आहोत आणि स्वतःचा बुद्धिमान वगैरे समजत आहोत तर असं आणखी कोणीतरी, कुठेतरी असण्याची शक्यता कशी नाकारणार? एका सूर्यमालेतल्या एका पृथ्वीवर जर जीवसृष्टी प्रकट होऊन प्रगत स्वरूप घेऊ शकते तर इतरत्र असेच कोणीतरी बुद्धिमान सजीव नसतील कशावरून? हा प्रश्न वैज्ञानिकांना सुखावणारा वाटतो तितकाच धास्तावणाराही वाटतो. ‘त्या’ कोणा जीवाशी लवकरात लवकर संपर्क साधण्याची अनिवार ओढ एका बाजूला आणि ‘ते’ फारच उपद्व्यापी आणि विनाशक असले तर पृथ्वीचं भवितव्य काय ही धास्ती दुसऱ्या बाजूला अशा दोलायमान स्थितीत वैज्ञानिक जग आहे.

बरं, असं कोणीतरी स्पेसमध्ये राहत असेल असं पृथ्वीवरच्या किती जणांना वाटतं तर जवळपास जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचा कौल ‘एलियन असणारच’ असा आहे. चोवीस देशांतल्या सत्तेचाळीस टक्के लोकांनी दुसऱ्या ग्रहमालेतील प्रगत सजीवाच्या अस्तित्वाविषयी होकारार्थी कौल दिलेला आहे.

मग ‘त्या’ कोणाशी आपण संपर्क करावा का? १९७४ मध्येच हर्क्युलस तारकासमूहाकडे एक रेडिओ-संदेश पाठवून आपण संभाव्य परग्रहवासीयांशी संपर्क साधण्याचा संकल्प केलेलाच आहे. ज्यांना असे परग्रहवासी आहेत असं वाटतं त्यापैकी साठ टक्के लोकांचं मत असं आहे की, काहीतरी करून आपण ‘त्यांच्याशी’ संपर्क साधायलाच हवा!

आणि उरलेल्यांचा ‘एलियन’च्या अस्तित्वावर विश्वास असला तरी ‘त्यांची संगत नको रे बाप्पा’ असं ठाम मत आहे. त्यामध्ये प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचाही समावेश असल्याचं म्हटलं जातं. शतकभरात आपली पृथ्वी प्रदूषण आणि इतर अनेक ‘दूषणां’मुळे माणसाला राहण्यालायक उरणार नाही असंही हॉकिंग यांनी एकदा म्हटलं. कदाचित माणसाची हा ग्रह उजाड करण्याची गती आणि केवळ हव्यासाधारित ‘प्रगती’ पाहून त्यांनी उद्वेगाने तसं म्हटलं असेल. आता आपणच (म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या) पृथ्वीवर राहू शकणार नसतील तर ‘परग्रहवासीयांच्या’ शोधाची खटपट कशाला असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

त्यातला एक संभाव्य धोका या मंडळींना दिसतो तो असा की, ‘ते’ कोणीतरीसुद्धा कनवाळू-कृपाळू असतील कशावरून? समजा ते आपल्यापेक्षा प्रगत असले तर पृथ्वीवासीयांना वेठीस धरतील. मग मुळात त्यांना आमंत्रणच कशाला द्या! त्यापेक्षा आपला ग्रह स्वच्छ, प्रदूषणरहित करून समस्त सजीवांसह वनस्पती, प्राण्यांसह ‘विचारी’ मानवजात येथे सुखाने नांदू शकते.

प्रश्न ‘विचारी’ असण्याचाच आहे. गेल्या शंभर-दीडशे वर्षांत प्रगतीच्या नावाखाली जो सर्वंकष अविचार सुरू आहे, त्याबद्दल वैज्ञानिकांना चिंता वाटते. आपला ग्रह आपण आधी सुरक्षित ठेवला पाहिजे याविषयी जागतिक मत तयार करायला हवं. पृथ्वीवरच येत्या शतकभरात काय काय नैसर्गिक उत्पात होऊ घातलेत याची जाणीव आणि त्यासंबंधीची उपाययोजना यांचा विचार केला पाहिजे, तरच पृथ्वीवरचा माणूस नावाचा प्राणी ‘विचारशील’ आहे असं म्हणता येईल. परग्रहावर कोणीतरी ‘आहेच’ असं म्हणणाऱ्यांत रशियन लोक आघाडीवर आहेत. डच लोकांचा मात्र या गृहितकावर फारसा विश्वास नाही… नव्या वर्षात अशा ‘कोणाशी’ संपर्क होतो का ते बघायचं… बाकी पुढे काय घडेल (बिघडेल) ते खरं!