खासगी रुग्णालयांची नफेखोरी

  • मनोहर विश्वासराव

खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर शासनाने वेळीच औषध शोधले पाहिजे. सरकारने वेळीच खासगी रुग्णालयांविरोधात कठोर पाऊल उचलले असते तर खासगी रुग्णालयांची अरेरावी वाढली नसती. रुग्णालय म्हणजे जेथे रुग्णांना नवजीवन मिळते, पण अशा पवित्र वास्तूतच रुग्णांचे जीवन हिसकावून घेतले जात असेल तर त्याबद्दल एक चुकीची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होऊ शकते याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे.

खासगी रुग्णालयांमधील उपचार सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असल्यामुळे लोकांना सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांचा खूप मोठा आधार असतो. पण सरकारी व पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. तेव्हा चांगल्या सोयी व उपचारासाठी नाईलाजाने लोकांना खासगी रुग्णालयाचा पर्याय निवडावा लागतो. पण आता खासगी रुग्णालयांतही रुग्णांच्याच जिवाशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

नुकताच दिल्लीच्या शालिमार बाग परिसरातील मॅक्स या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी डॉक्टरी पेशाला कलंकित करणारा प्रकार घडला. या रुग्णालयात एका महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला, पण त्यापैकी एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. डॉक्टरांनी दुसरे मुलंही मृत पावल्याचे घोषित करून दोन्ही बालकांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवले. बालकांचे मृतदेह घेऊन सदर कुटुंब रुग्णालयाबाहेर पडले तेव्हा सीलबंद पाकिटात बालकाची हालचाल सुरू झाली तेव्हा रुग्णालयाचा खरा चेहरा समोर आला. कुटुंबीयांनी बालकाला नजीकच्या एका रुग्णालयात दाखल केले व डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बालकाला पुन्हा नवजीवन मिळाले. रुग्णालयाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पण या सर्व घटनेचा जाब विचारण्यासाठी वृत्तवाहिन्या रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा रुग्णालय प्रशासनाच्या अरेरावीला पत्रकारांना सामोरे जावे लागले. झाल्या प्रकाराची माफी मागणे तर दूरच, उलट महिलेच्या नातेवाईकांना रुग्णालय प्रशासनाने धक्काबुक्की करत अरेरावीची भाषा वापरली. सुदैवाने बंद पाकिटात बालकाची हालचाल झाल्यामुळे त्याचा जीव वाचवता आला. बालके जिवंत असताना डॉक्टरांनी त्यांना कोणत्या आधारावर मृत ठरवले?

डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप समजले जाते, पण डॉक्टरच जर सैतानासारखे वागत असतील तर डॉक्टर पेशाचा अर्थच काय राहिला? जीवनदान देणारे डॉक्टरचे हातच जर रुग्णांचे जीव घेत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. रुग्णालय प्रशासनच रुग्णांशी अरेरावी करत असेल तर याला रुग्णालय म्हणावे का, असा सवालच उपस्थित होतो. पण दोषी डॉक्टरांवर कारवाई झाल्यानंतर देशातील रुग्णालये धडा घेतील अशी आशा होती. मात्र हे प्रकरण ताजे असतानाच गुरुग्राम येथी फोर्टीस रुग्णालयात डेंग्यूच्या उपचारासाठी दाखल केलेल्या एका सात वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांना तब्बल १६ लाखांचे बिल आकारल्याचा प्रकार समोर आला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे मुलीच्या पित्याकडून सांगण्यात आले. डेंग्यू हा एक तापाचा प्रकार असून तो गंभीर असला तरी त्याचे १६ लाखांचे बिल कसे होऊ शकते? मग तापाच्या उपचारासाठी १६ लाखांचे बिल रुग्णालयाने कसे काय आकारले? उपचारांच्या नावाखाली रुग्णांकडून लाखो रुपये उकळता, मग रुग्णांना उपचार देण्यात हलगर्जीपणा का? साध्या तापाच्या उपचारासाठी रुग्णालय १६ लाखांचे बिल आकारीत असेल तर इतर आजारांसाठी बिलाचा विचारच न केलेला बरा.

रुग्णालयाचे बिल बघूनच एखादा रुग्ण आजारी पडेल यात शंका नाही. खासगी रुग्णालये श्रीमंतांना अरेरावी करताना कधीच दिसत नाही मग सर्वसामान्य रुग्णांच्या बाबतीत दुजाभाव का? गरीबाला जगण्याचा काहीच अधिकार नाही का? श्रीमंत असोत वा गरीब प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे याचा रुग्णालयांना विसर पडलाय का? खासगी रुग्णालय म्हटले की एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यात आलिशान वातानुकूलित खोल्या, पावलापावलावर सुरक्षारक्षक व नामांकित डॉक्टरांची फौज अशा विविध सुविधा खासगी रुग्णालयात दिल्या जातात. याच सुविधांना बळी पडून लोक खासगी रुग्णालयांची वाट धरतात. आता याच सुविधांच्या आड रुग्णांची लूट करून त्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे रुग्णालये ही जीवनमरण विकत घेण्याचे दुकानच होऊन बसली आहेत.

आधीच सरकारी व पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची होत असलेली हेळसांड आता खासगी रुग्णालयांमध्येही सुरू असल्यामुळे विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा संभ्रमच सध्या देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. कारण आजकाल देशात खासगी रुग्णालयांचे भलेमोठे साम्राज्य असून नवनवीन रुग्णालये जन्माला येत आहेत व याच रुग्णालयांच्या आड बक्कळ नफा कमवला जात आहे. पैशांच्या हव्यासापोटी रुग्णाच्या जिवाची पर्वा न करण्याचा आजारच सध्या अनेक खासगी रुग्णालयांना जडला आहे. तेव्हा खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर शासनाने वेळीच रामबाण औषध शोधले पाहिजे कारण याआधीही देशातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणारी लूट व हेळसांडीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

सरकारने वेळीच खासगी रुग्णालयांविरोधात कठोर पाऊल उचलले असते तर आज रुग्णांच्या जिवाशी खेळण्याइतपत खासगी रुग्णालयांची मुजोरी वाढली नसती. निव्वळ दोषी डॉक्टरांवर कारवाई करून रुग्णांची होत असलेली लूट थांबणार नाही. तर त्यासाठी सरकारने अधिकाधिक कडक कायदे तयार करणे गरजेचे आहे. दोषी डॉक्टरांबरोबरच रुग्णालय प्रशासनावरही कारवाई होणे गरजेचे आहे. रुग्णालय म्हणजे जेथे रुग्णांना नवजीवन मिळते, पण अशा पवित्र वास्तूतच रुग्णांचे जीवन हिसकावून घेतले जात असेल तर त्याबद्दल एक चुकीची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होऊ शकते याचे सर्वांनी भान ठेवले पाहिजे.