आटपाडी नगरपालिकेचा प्रश्न

  • सादिक खाटीक

आटपाडी ग्रामपंचायतीचे नगर- पंचायतीऐवजी नगरपालिकेतच रूपांतर व्हायला हवे. सरकारने नगरपंचायतीचा निर्णय घेतला असेल तर तो स्थगित करायला हवा. आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करता येत नसेल तर ग्रामपंचायतच राहू द्यावी. अकलुजकरांचा आदर्श समोर ठेवून ग्रामपंचायतीचा कारभार हाताळला जावा, असे माझ्यासारख्याला वाटते. नगरपंचायतीचा निर्णय केला गेल्यास पूर्वीची ग्रामपंचायतच बरी असे भविष्यात आटपाडीकरांना वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याऐवजी नगरपालिकेचा निर्णय झाल्यास आटपाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठे पाऊल ठरू शकते.

आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये न करता थेट नगरपालिकेत होण्यासाठी पूर्वी एकसंध आटपाडी ग्रामपंचायतीचा भाग असलेल्या भिंगेवाडी, मापटेमळा, पुजारवाडी (आ), यमाजी पाटलाची वाडी, देशमुखवाडी, खानजोडवाडी आणि मासाळवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश नव्या आटपाडी नगरपालिकेत करावा.

आटपाडी ग्रामपंचायतीचा समावेश नगरपंचायतीमध्ये झाल्यास विकासाचा हत्ती ग्रामपंचायतीच्या सध्याच्या विकासाच्या चालीनेच चालणार असल्याने शहराच्या विकासाला फारसा वेग मिळेल असे नाही व आटपाडी शहराच्या ४ किलोमीटर परिघातल्या सात ग्रामपंचायती या नगरपालिकेत समाविष्ट झाल्यास आटपाडी नगरपालिका सक्षम बलवान होउै शकते. आजही आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये १७ किलोमीटर अंतरावरील शेंडगेवाडी या वस्तीचा समावेश आहे आणि सहा किमीवरील मुढेवाडी ही पूर्वी आटपाडी पंचायतीचा भाग होती. त्यामुळे चार किलोमीटर परिघातल्या त्या सात ग्रामपंचायती नगरपालिकेत आल्याने फारसे बिघडणार नाही. आटपाडी नगरपालिकेबाबतचा निर्णय करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अडचण येईल असे वाटत नाही. एका गटाचा मापटेमळ्याचा अडसर आणि दुसऱ्या गटाकडून पुजारवाडी (आ), य. पा. वाडी ही गावे नव्या नगरपालिकेत जाऊ न द्यायची सुप्त भावना आटपाडी नगरपालिका निर्मितीत अडसर असल्याचे वरकरणी जाणवते. मापटेमळा, पुजारवाडी (आ) या ग्रामपंचायतीच्या हद्दीतले, साखर कारखाना, सूतगिरणी, जिनिंग प्रोसेसिंग युनिट, दूधसंघ आणि दुधावर प्रकिया करणारा उद्योग यातून नव्या नगरपालिकेस मोठा महसूल मिळाल्याने नवी नगरपालिका सक्षमतेने विटा, तासगाव, इस्लामपूरसारखा चौफेर विकास दाखवू शकते. अजूनही वेळ गेलेली नाही. लोकांनी सरकारला नगरपालिकाच करण्यासाठी भाग पाडावे.

आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायत किंवा नगर परिषद किंवा नगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यास कदाचित काही मंडळींना आपले सदस्यत्व सोडावे लागेल. मात्र नगरपालिका झाल्यास त्यांच्यासह नगरपालिकेत येणाऱ्या विविध गावच्या मातब्बरांनाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यत्वाची दारे कायमचीच बंद होणार आहेत. त्यामुळे राजकारणी मंडळी नगरपंचायत की नगरपालिका याने चिंतातूर असावेत असेच दिसते. तथापि आटपाडी शहराच्या भल्यासाठीच नगरपालिकाच झाली पाहिजे.