भविष्यवेधी मार्गदर्शनाची प्रेरणा

आज भगिनी निवेदितांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आणि स्वामीजींची विश्वविजयी शिकागो भाषणाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्धापनाचा उत्सव साजरा करताना त्यांच्या या विजिगिषु आणि भविष्यवेधी मार्गदर्शनाची प्रेरणा युवा पिढीच्या अंतःकरणात जागवायला हवी. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, धर्मनिष्ठा आणि गतानुगतिक रूढीप्रियता यांच्यातील भेदरेषा अत्यंत ठळकपणे अधोरेखित करून त्यांनी वैज्ञानिकता, आधुनिकता आणि उद्दमशीलता यांची कास धरण्याचा संदेश त्यांनी तरुणांना दिला.

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या शिष्योत्तमा भगिनी निवेदिता यांच्या १५० व्या जयंतीचे हे वर्ष आहे. त्यामुळे या वर्षीच्या विवेकानंद जयंतीनिमित्त त्या दोघांमधील गुरू-शिष्य परस्पर संबंध आणि व्यवहार यातील काही महत्त्वपूर्ण पैलूंचा आढावा घेणे औचित्याचे ठरावे. भारतीय समाजाचा आत्मा असलेल्या सनातन वैदिक धर्माचे निस्सीम आणि निष्ठावंत अनुयायी या नात्याने विश्व धर्म परिषदेने त्यांना वैदिक परंपरेची विजय ध्वजा यशस्वीपणे फडकवली हे सर्वश्रुत आहे. मात्र तेवढ्यावरूनच त्यांना केवळ हिंदू धर्म प्रसारक म्हणणे उचित ठरत नाही. तसे ते असते तर भगिनी निवेदिता (मूळच्या आयरिश वंशाच्या मार्गारेट नोबल) वैदिक धर्माचा अवलंब आणि प्रसार करण्यासाठी हिंदुस्थानात येत आहेत हे पाहून ते हर्षभरीत झाले असते, हुरळून गेले असते आणि अत्यंत तत्परतेने त्यांनी मार्गारेटला हिंदू धर्माची दीक्षा देण्याची तातडी केली असती. त्यादृष्टीने ख्रिस्ती मतपरंपरेपेक्षा वैदिक परंपरा कशी श्रेष्ठ आहे हेच तिच्या मनावर बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. तसे स्वामींनी केलेले दिसत नाही. उलट हिंदू धर्मपरंपरा स्वतःहून समजून घेण्याची आणि त्या परंपरेच्या तत्कालीन व्यवहारात निर्माण झालेल्या दोषांसकट त्याची वस्तुनिष्ठ चिकित्सा करण्याची पूर्ण सवड त्यांनी मार्गारेट नोबल यांना दिली. इंग्लंडमधील वास्तव्यादरम्यानचा सुमारे दीड-दोन वर्षांचा कालावधी त्यांनी मार्गारेटशी सखोल तत्त्वचर्चा केली. हिंदुस्थानात येण्याचा ठाम निश्चय मार्गारेटने व्यक्त केल्यानंतरही तिला तांत्रिक अर्थाने ‘हिंदू’ करून घेण्याची घाई त्यांनी बिलकूल केली नाही. हिंदुस्थानात आल्यानंतरचे जवळजवळ तीन महिने उलटून गेल्यानंतरच स्वामी विवेकानंदांनीं मार्गारेट नोबल यांना वेदान्त साधकाची दीक्षा दिली, तीही प्राथमिक स्वरूपाचीच. ती दीक्षा देताना त्यांनी अंगिकारलेली पद्धत अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती हे लक्षात घ्यायला हवे.

२५ मार्च १८९८ या दिवशी स्वामींनी मार्गारेटला ब्रह्मचर्याची (संन्यासाची नव्हे) दीक्षा दिली. त्याआधी १८९५ च्या माध्यमापासून लंडनमध्ये ती विवेकानंदांच्या घनिष्ठ संपर्कात होती. पूर्ण विचारांती जानेवारी १८९८ मध्ये ती प्रत्यक्षात हिंदुस्थानात येऊन दाखल झाली होती. २५ मार्च या दिवशी स्वामीजींनी तिला दीक्षा दिली म्हणजे काय केले? त्यांनी सर्वप्रथम तिच्याकडून भगवान शिवाची पूजा करवून घेतली. पूजेचा हिंदू धर्मप्रणीत विधी सर्व बारकाव्यांसह मार्गारेट प्रथमच करीत होती. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी तिला महात्मा गौतम बुद्धाच्या चरणावर फुले अर्पण करण्यास सांगितले. ‘ज्या महात्म्याने सर्वसंग परित्याग करून मानवजातीच्या सेवेसाठी, बुद्धपद प्राप्त होण्यापूर्वी कठोर तपस्या केली त्या बुद्धाचे तू अनुकरण कर..’ अशा अत्यंत मार्मिक सूचना तिला केली आणि सर्वात शेवटी ‘वाहे गुरू की फतेह’ ही उद्घोषणा तिच्याकडून करून घेतली. धर्मपरंपरा आणि आध्यात्मिक जीवनपद्धती यांच्याविषयीची स्वामीजींची संकल्पना किती अभिजात आणि विशाल होती हेच यावरून दिसून येते. पुढच्या काळातही निवेदितांना त्यांनी प्रेरित केले ते हिंदुस्थानात सेवा आणि शिक्षणप्रसार (तोही महिला वर्गाला शिक्षित करण्याच्या रूपाने) या दोन क्षेत्रांत कार्यरत होण्यासाठी आणि स्वामीजींनी तरुण पिढीसमोरही अत्यंत उत्कट प्रेरणा साकार करणारे मार्गदर्शन केले हे याच प्रकारचे. कर्मप्रवणता, उद्दमशीलता, समता आणि सेवा परायणता यांचा अंगिकार हाच होता. स्वामीजींनी तरुणांना केलेल्या प्रेरक मार्गदर्शनाचा गाथा.

कसे तरुण मला (राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या स्वप्नपूर्तीसाठी) हवे आहेत याविषयी वर्णन करताना आणि त्या तरुणांसमोरील ध्येयाचे विवेचन करताना स्वामीजींनी वापरलेली परिभाषा विलक्षण आहे, अत्यंत प्रभावी आहे आणि अचूकपणे समर्पक आहे. ध्येयवादाने ज्यांची अंतःकरणे भारलेली आहेत, ज्यांच्या नसा पोलादाच्या आहेत, सेवाभावाने जे ओतप्रोत आहेत असे हजारो तरुण-तरुणी उत्साहाने रसरसून उठतील आणि सेवेचा, समतेचा आणि अध्यात्माचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवतील..’ या शब्दांमध्ये त्यांनी तरुण पिढीकडून आलेल्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सनातन धर्मविचार, अस्सल आध्यात्मिकता यांच्या घट्ट पायावर अतिशय ठामपणे उभे असलेल्या स्वामीजींची अंतर्दृष्टी सुंदर भविष्याचा अचूक वेध घेत होती. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, धर्मनिष्ठा आणि गतानुगतिक रूढीप्रियता यांच्यातील भेदरेषा अत्यंत ठळकपणे अधोरेखित करून त्यांनी वैज्ञानिकता, आधुनिकता आणि उद्दमशीलता यांची कास धरण्याचा संदेश तरुणांना दिला.

‘आगामी काही काळ अन्य साऱ्या देवदेवतांना विसरून केवळ आणि भारतमातेला आपले आराध्य बनवा’, ‘जो धर्म, जो समाज स्त्रीयांना समानतेचा हक्क देत नाही तो धर्म व समाज सैतानाचा बाजार आहे, पक्षी कधी एका पंखाने उडू शकत नाही’, ‘माझ्यात इतर काही दोष असू शकतात, परंतु उभ्या जन्मात मी कधीही कुणाचा मत्सर केलेला नाही, कुणावर अधिकार गाजवलेला नाही आणि माझ्या सहकाऱ्यांवर टीका केलेली नाही…’ ही आणि यासारखी त्यांची सारी वक्तव्ये केवळ अर्थगर्भ आहेत, एवढेच नाही तर आजही आपणास भेडसावत असलेल्या समस्यांच्या (धर्मांधता, महिलांचा अवमान, भेदाभेद इ.) संदर्भात अत्यंत सुसंगत आहेत. स्वामीजींच्या दूरदृष्टीचा ठळक प्रत्यय त्यांच्या अशा परखड विधानांमधून सतत येत राहतो. याच दूरदृष्टीच्या आधारे जेमतेम २७-२८ वर्षांच्या मार्गारेट नोबलचे व्यक्तिमत्त्व भगिनी ‘निवेदिता’ (म्हणजे संपूर्ण समर्पिता) या स्वरूपात रूपांतरित केले.

आज भगिनी निवेदितांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आणि स्वामीजींची विश्वविजयी शिकागो भाषणाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्धापनाचा उत्सव साजरा करताना त्यांच्या या विजिगिषु आणि भविष्यवेधी मार्गदर्शनाची प्रेरणा युवा पिढीच्या अंतःकरणात जागवायला हवी.