खऱ्या इतिहासाचे दिवस

हिंदुस्थानच्या इतिहासाचे खरे स्वरूप प्रत्यक्ष शिक्षण क्षेत्रात अंतर्भूत झाले तर आज आमच्या तरुण पिढ्यांना आमच्या पूर्वजांनी काय केले होते हे कळेल. गेल्या दोन वर्षांत असे प्रयत्न होताना दिसत आहेत. यापूर्वी आमच्या पाठ्यपुस्तकातून खऱ्या इतिहासाची अनेक प्रकरणे गहाळ झाली, बदलली गेली.

चितोडची राणी पद्मावती ऊर्फ पद्मिनीच्या जोहाराची कथा पडद्यावर येण्याआधीपासून जे रण माजले त्यामुळे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी खऱ्या इतिहासाच्या अभिव्यक्तीचे दिवस जवळ येत चालले आहेत असं वाटले. ज्या जाणकार मंडळींना खऱ्या हिंदुस्थानीय इतिहासाचे पुनरागमन व्हावे असे वाटते त्यांना हे पटेल.

या आधी बाजीराव मस्तानी हा चित्रपट अशीच खळबळ माजवून गेला. बाजीराव मस्तानीची कथा एक सत्य घटना आहे. ती जशी घडली तशी जरी चित्रपटात दाखवली असती तरी ती रोमहर्षक झाली असती. खऱ्या इतिहासात काशीबाई या बाजीरावाच्या प्रथम पत्नीने मस्तानीचा दुस्वास केला नाही. ती त्या लहान मुलाला शनवारवाड्यात घेऊन आली. राधाबाई या बाजीरावाच्या आईने व चिमाजी अप्पाने कृष्ण ऊर्फ समशेर बहाद्दर याचा ममतेने सांभाळ केला. त्याला राजपुत्रांना जे शिक्षण दिले जाई मग त्यात तलवार चालवणे येई, घोड्यांवर स्वार होऊन दौड करावी लागे, धावत्या घोड्यावरून तलवारीने लढावे लागे. संस्कार, आदरसत्कार, राजनीती, यात समशेर बहाद्दर पारंगत झाला. त्याला पत्नी म्हणून बाजीरावाच्या मर्जीतल्या दळवी नावाच्या सरदाराने आपली कन्या दिली. मुळात बाजीराव जातपात पाळत नसे. सैनिकांची जात एकच ती म्हणजे लढवय्या! त्यानं लढावं, मातृभूमीचे रक्षण करावं. प्रसंगी रक्त सांडून मातृभूमीचे रक्षण करावं हीच भावना त्यानं त्याचा मुलगा समशेर बहाद्दरमध्ये व आपल्या सैनिकांमध्ये रुजविली होती.

मी पुण्यापासून ५५ कि.मी. असलेल्या पाबळला जाऊन मस्तानीची समाधी बघून आलो. बाबा इनामदार हे तिथे व्यवस्थापक आहेत. ते मला म्हणाले, समशेर बहाद्दर १७६१च्या युद्धात पानिपतावर पेशव्यांच्या बाजूने लढला तेव्हा २० वर्षांचा होता. अत्यंत पराक्रम करून त्याने मातृभूमीसाठी देह ठेवला. हा खरा इतिहास मी आनंदाने कसलीही अपेक्षा न बाळगता बाजीराव मस्तानी सिनेमाच्या निर्मात्यांना सांगू शकलो असतो, पण मला भेटायला कुणी आलेच नाही.

ज्यांच्या हातात पैसे, साधने आहेत, ज्यांना इतिहासावर चित्रपट काढायचे आहेत त्यांनी खरा इतिहास स्वतः जाणून घ्यायला हवा किंवा जाणत्या संशोधकांकडून त्याचे कथानक लिहून घ्यायला हवे. कबूल आहे की, कथानक चित्रपटाचे रूप धारण करताना काही काल्पनिक बदल करावे लागतात, तेवढी मुभा असतेच पण त्याचाच अतिरेक झाला तर मूळ इतिहास बाजूला व काल्पनिक कथानक इतिहास होऊन बसते. मग त्या चित्रपटाच्या निर्मितीवर कितीही खर्च झालेला असो. तो चित्रपट उत्पन्नाच्या दृष्टीने यशस्वी होईलही, पण त्याचे ऐतिहासिक मूल्य काय?

सध्या पौरस (पुरू-पुरुरवा) नावाची मालिका सोनी टी.व्ही.वर दाखवली जातेय. २६० एपिसोडसमध्ये याचं कथानक गुंफले आहे. म्हणजे तीन वर्षे ही मालिका चालेल. मला पुरूबद्दल विशेष आत्मीयता वाटते. त्यामुळे या मालिकांतून पुरूला काय न्याय मिळतो हे जाणण्याची उत्सुकता आहे.