त्रिपुरातील अराजकता आणि घुसखोरी

ईशान्य हिंदुस्थान हा आपल्या देशाचा एक दुखरा कोपरा आहे. त्रिपुरा हे राज्य प्रसिद्धीच्या झोतात नसते. त्यामुळे तिथे घडणाऱ्या घटनांवर माध्यमांचे लक्ष जात नाही, सत्य परिस्थिती सामान्य माणसासमोर येत नाही. त्रिपुरातील सुरक्षा परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्रिपुरा ईशान्य हिंदुस्थानच्या टोकाशी येते. या राज्याला तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढले आहे. त्यामुळे इथे होणारी बांगलादेशी घुसखोरी ही कायमचीच डोकेदुखी आहे. त्यामुळे येथील मूळ रहिवासी जातीजमातींना आपली संख्या कमी होऊन बंगाली लोकांची संख्या वाढेल की काय अशी कायमच भीती वाटते.

अनेकांची कल्पना अशी असते की, त्रिपुरातील माणिक सरकार यांचे सरकार उत्तम पद्धतीने काम करत आहे, परंतु सत्य असे आहे की, तिथला राजकीय इतिहास हा रक्ताने माखलेला आहे. तिथे प्रचंड भ्रष्टाचार आहे. दहशतवाद्यांची संख्या जरी कमी झाली असली तरीही सुरक्षेच्या आव्हानांमध्ये बदल होत आहे. या सुंदर प्रदेशाला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. शिवाय बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यात आपल्याला यश आलेले नाही. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशात आजही ६५ टक्के लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालील आहे.

विश्वमोहन बर्मा या नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा या दहशतवादी संघटनेच्या अध्यक्षाने एक पत्र लिहून त्रिपुरामध्ये राहणाऱ्या सगळ्या नॉन-त्रिपुरा नागरिकांना धमकावले. बंगाली भाषिकांनी त्रिपुरा सोडून जावे नाही, तर तुमच्यावर दहशतवादी हल्ले करण्यात येतील. या गटाने असेही सांगितले की, सध्या सरकारचा बांगलादेशी हिंदूंना त्रिपुरामध्ये वसवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याविरोधात आम्ही मोठी चळवळ सुरू करणार आहोत. त्याकरिता त्यांना पीपल्स डेमोक्रॅटिक कौन्सिल ऑफ कारबी डोंगरी या दहशतवादी संघटनेचासुद्धा पाठिंबा आहे. म्हणजे त्रिपुरातील तीन दहशतवादी गट एकत्र येऊन तिथे राहणाऱ्या बंगाली आणि हिंदी भाषिक नागरिकांना त्रिपुरा सोडण्यास धमकावत आहेत. हे गट नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल ऑफ नागालँड (खपलांग ग्रुप) आणि युनायटेड नेशन्स फ्रंट ऑफ आसाम यांना सामील आहे. ईशान्य हिंदुस्थानातील सर्व दहशतवादी गटांना एकत्र करण्याकरिता गेल्या वर्षी युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ वेस्टर्न साऊथ ईस्ट एशिया नावाची संघटना स्थापन करण्यात आली आहे, ज्यात त्रिपुरातील गटसुद्धा सामील आहे. मात्र सैन्याने या भागात बजावलेल्या चांगल्या कामगिरीमुळे दहशतवाद्यांना २०१७ मध्ये कोणतेही कृत्य करण्यात यश मिळाले नाही. एवढेच नाही तर अनेक दहशतवाद्यांनी २०१६ -२०१७ मध्ये आत्मसमर्पण केले आहे. एक सैन्याधिकारी म्हणून माझे अर्धे जीवन ईशान्य हिंदुस्थानात दहशतवादविरोधी अभियानात खर्च झाले आहे. त्यामध्ये मी त्रिपुरामध्ये अनेक वेळा दहशतवादविरोधी अभियानात सहभागी झालो होतो.

या सगळ्या भागामध्ये बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यासाठी कुंपण बांधणे सुरू आहे. त्रिपुराशी बांगलादेशची ८५६ किलोमीटरची सीमा जोडली आहे. २०१६ पर्यंत ही सीमा पूर्णपणे कुंपण घालून बंद केली जाईल असे मोदी सरकारने जाहीर केले होते. ज्यामुळे बांगलादेशी घुसखोरी कमी होण्यात यश मिळेल. मात्र अजूनही ६३ किलोमीटर कुंपण घालणे शिल्लक आहे. त्यासाठी ढिलाई करणाऱ्या सीमा सुरक्षा दल, कॉन्ट्रक्टर आणि देशाच्या गृहमंत्रालयाला जाब विचारणे आवश्यक आहे.

सध्या त्रिपुरातील दोन प्रश्न महत्त्वाचे आहे. तिथे राहणाऱ्या जातींचे बाहेरून आलेल्या लोकांविरोधात सुरू असणारे आंदोलन यामुळे या भागात बंगाली भाषिक लोक आणि स्थानिक जनजाती यांच्यात हिंसाचार होऊ शकतो. सरकारने बांगलादेशातून आलेल्या बुद्धिस्ट, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि काही हिंदू नागरिकांना या भागात वसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविरोधात आंदोलने प्रतिआंदोलने नेहमीच सुरू असतात. याशिवाय इथे असणारे दहशतवादी गट आणि केंद्र सरकारचे गृहमंत्रालय यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून वाटाघाटी सुरू आहेत, ज्याला पूर्णपणे यश मिळालेले नाही. लवकरात लवकर या वाटाघाटी व्हायला पाहिजेत. या दहशतवाद्यांना या शांतता प्रक्रियेत सहभागी करून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय या भागात असलेल्या ब्रुस या जमातीला मिझोराममध्ये पाठवणे आहे. मात्र मिझोराम आणि त्रिपुरा यांच्यातील परस्पर वादामुळे ३२ हजार ८७६ ब्रुस रहिवासी त्रिपुरात अडकले आहेत.

मात्र त्रिपुराला आता सर्वात मोठा धोका आहे, तो तिथे पडलेल्या अफू, गांजा यांच्या अमली पदार्थांच्या विळख्याचा. त्रिपुराला तिन्ही बाजूंनी बांगलादेशने वेढले असल्याने तिथे अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. लाखो बेरोजगार युवक हे त्रिपुराचे वास्तव आहे. बेरोजगारीमुळे व्यसनाधीनता वाढत आहे आणि तरुण पिढीच्या विरोधात अमली पदार्थांचे मोठे आक्रमण सुरू आहे. मात्र त्याविरोधात एकदिलाने लढण्याऐवजी तिथल्या सुरक्षा व्यवस्थेने ज्या पद्धतीने काम केले पाहिजे त्या पद्धतीने काम केले जात नाही. दरवर्षी १०० कोटी अमली पदार्थांची तस्करी त्रिपुरामध्ये केली जाते. त्यात हेरॉईन, गांजा, अफू आदी ड्रग्जचा समावेश आहे. बांगलादेशला लागून असलेल्या सीमेवरून हा धंदा राजरोसपणे सुरू आहे. कुंपण न घातल्यामुळे तस्करांचे फावते आहे आणि याकडे स्थानिक सरकार आणि पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. हिंदुस्थान-बांगलादेश म्हणजे त्रिपुराच्या सीमेवर असलेले सीमा सुरक्षा दल हे सर्व थांबवण्यात अपयशी ठरले आहे.

राज्यसभेत दिलेल्या आकडेवारीप्रमाणे देशात ७ कोटी २१ लाख अमली पदार्थांचे सेवन करणारे लोक आहेत. सर्वाधिक गांजा पिकवणाऱ्या राज्यांपैकी त्रिपुरा हे एक राज्य आहे. गांजाची लागवड बेकायदेशीर असूनही ते राजरोसपणे पिकवले जाते. शिवाय सर्व प्रकारचे अमली पदार्थ इथे सहजपणे उपलब्ध असतात. सीमापार तस्करीचे गुन्हे इथे सर्वाधिक घडतात. जवळपास १६०७ हिंदुस्थान- बांगलादेश सीमेवर नोंदवण्यात आले. ७८९ गुन्हे हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर नोंदवण्यात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर म्यानमार सीमा तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानची सीमा आहे. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेसंदर्भात एक याचिका दाखल केली होती. त्यानुसार त्रिपुरातील ३५ टक्के लोक अमली पदार्थांचे सेवन करताहेत. राज्यात उपलब्ध होणाऱया अमली पदार्थांच्या तुलनेत पकडले जाणारे अमली पदार्थ हे एक टक्कासुद्धा नाहीत. कारण यामधून होणारा फायदा. त्यामुळे हा धंदा किफायतशीर ठरत आहे. राज्यातील अनेक मोठे अधिकारी, राजकारणी, संस्था या धंद्यात गुंतलेल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या तस्करीला राज्य सरकारच जबाबदार आहे. अमली पदार्थांची तस्करी थांबत नाही तोपर्यंत येथील तरुणाई धोक्यात आहे. त्रिपुरामध्ये पोलिसांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्रिपुराची लोकसंख्या ३७ लाख आहे तर पोलिसांची संख्या ५७ हजारांहून अधिक आहे. मुंबईची लोकसंख्या १.५ कोटी असून तिथे पोलिसांची संख्या ५६ हजार आहे. असे असूनही कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यात त्रिपुरा पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या आकडेवारीनुसार त्रिपुरामधील गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे आणि त्रिपुराला ईशान्य हिंदुस्थानातील सर्वात मोठे अराजकता पसरलेले राज्य म्हटले जाते.