वैद्य खडीवाले

  • मेधा पालकर

नवनवीन औषधांची निर्मिती करणारे आणि दुर्धर आजाराच्या रुग्णांना नवसंजीवनी देणारे अशीच परशुराम यशवंत वैद्य अर्थात खडीवाले वैद्य यांची ओळख होती. आयुर्वेदातील विविध विषयांसह चिकित्सेवरील दीडशेहून अधिक पुस्तके खडीवाले यांनी लिहिली. आयुर्वेदातील ४० वर्षांहून अधिक काळाच्या कामाची केंद्र सरकारने दखल घेतली. केंद्र सरकारचा पहिला राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार, आयुर्वेद भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. सामान्य नागरिकांपासून रुग्ण आणि वैद्यकीय तज्ञांमध्ये ते दादा या नावाने परिचित होते. हवाई दलातील सुस्थितीतील नोकरीवर पाणी सोडून वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी दादा खडीवाले यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर वडिलांच्या इच्छेनुसार अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद प्रवीण या अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला. वयाच्या चाळिसाव्या वर्षी डीएसएसी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रम पूर्ण असतानाच हरी परशुराम औषधालय या आयुर्वेदीय औषधे व काष्ठौषधीचे विक्री केंद्र त्यांनी सुरू केले. वडील वैद्य कै. यशवंत हरी वैद्य यांच्या स्मरणार्थ वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था या संस्थेची १९७४ मध्ये स्थापना केली. त्यानंतर प्रत्यक्ष आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसला त्यांनी सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार व संशोधनाचे काम त्यांनी शेवटपर्यंत सुरूच ठेवले. दोनशेहून अधिक आयुर्वेदाच्या औषधाची निर्मिती त्यांनी केली. सर्वसामान्यांना आयुर्वेदाचे ज्ञान सहज उपलब्ध व्हावे याकरिता खडीवाले वैद्य यांनी गुरुकुल आयुर्वेद परिचय वर्ग गेली ४० वर्षे अखंडपणे चालविला. आयुर्वेदातील दीडशेहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जनकल्याण रक्तपेढीची स्थापना आणि नेत्रसेवा केंद्र सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या ३० वर्षांपासून महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावाने आयुर्वेदातील विविध शाखांमधील वैद्यांना १३ पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली. नानाजी देशमुख यांच्या आग्रहावरून बीड जिल्ह्यात मोफत आयुर्वेद चिकित्सा शिबिरे त्यांनी आयोजित केली होती. गेल्या ४० वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी सवालाख रुग्णांना मोफत उपचार दिले. वडील यशवंत वैद्य खडीवाले यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शंभर शिबिरांचे त्यांनी आयोजन केले. नेत्रदानाच्या प्रचारासाठी पदयात्रा आयोजित केली. १९९१ मध्ये आकुर्डी प्राधिकरणात निराधार व अनाथ बालकांसाठी आधार केंद्राची स्थापना केली. सुमारे १५ वर्षांपूर्वी ताई आपटे यांच्या नावाने महिला विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. ठाणे जिल्ह्यातील देवबांध येथे श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयुर्वेदाच्या प्रचारासाठी वनस्पती उद्यान उभारणी करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आयुर्वेदाच्या वनस्पतीचे जतन व संवर्धन हा विषय चर्चेला आला. जगभरातील आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आणि संशोधकांसाठी एकच व्यासपीठ मिळावे याकरिता त्यांना विश्व वैद्य संमेलन भरविले. राष्ट्रीय वनसंपदा संवर्धन व संशोधन केंद्राची स्थापना केली. औषधांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी औषध वनस्पती अभ्यास गटाचीदेखील त्यांनी स्थापना केली. ते सातत्याने आपल्या संशोधन, उपचाराच्या कामात सतत मग्न राहिले. त्यांच्या निधनाने आयुर्वेदासाठी आयुष्य वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.