श्रीकांत देशमुख आणि सुजाता देशमुख

  • प्रशांत गौतम

श्रीकांत देशमुख

राठवाड्यातील प्रतिभावंत कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही’ या कवितासंग्रहाला साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठत साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्रीकांत देशमुख हे सध्या लातूर येथे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयात आहेत. मूळ सिंदखेडराजाजवळील राहिरी येथील ते रहिवासी आहेत. नांदेड येथे त्यांनी साखर सहसंचालक म्हणून प्रशासकीय सेवा बजावली. सरकारी अधिकारी असले तरी त्यांनी आपला वाचन, लेखनाचा छंद जोपासला. कृषी संस्कृतीचे कायमच शोषण झाले असले तरी या कालप्रवाहात होणारी पडझड आणि संस्कृती आज टिकून आहे. ‘बोलावे ते आम्ही’ या कवितासंग्रहात ६८ कविता असून त्यात कृषी क्षेत्राची होणारी पडझड, शेतकऱ्यांची सोशिकता प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. गावाकडचा बदलत जाणारा अवकाश अतिशय व्यामिश्र स्वरूपात आला आहे. संग्रहातील कविता कृषी संस्कृतीला वेढून टाकणारी आहे. आक्रमित आणि संस्कारित करणारी बाह्य अवस्था चिंतनीय झाली आहे. देशमुख हे नव्वोदत्तरी कालखंडातील महत्त्वाचे कवी. कष्टकरी दलितांचे दुःख आणि वेदनाही त्यांच्या एकूणच लेखनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. ‘बोलावे ते आम्ही’ या संग्रहाचे शीर्षकही संत तुकोबाराय यांच्या अभंगातील ओवीचे आहे. तुकोबा, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा कवी जपतात. देशमुख यांचे बळीवंत, आषाढमाती आणि बोलावे ते आम्ही हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध असून शेतकरी चळवळ याविषयी त्यांनी वैचारिक लेखनही केले आहे. पडझड, वाऱ्यावरच्या भिंती हे ललित लेखनही त्यांच्या नावावर जमा आहे. देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्याने सलग तिसऱ्या वर्षी मराठवाड्याचा सन्मान झाला आहे. २०१५ साली वीरा राठोड यांना ‘सेन साई वेस’ या संग्रहास युवा साहित्य अकादमी तर आसाराम लोमटे यांना २०१६ साली ‘आलोक’ या ग्रामीण कथासंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार लाभला.

सुजाता देशमुख

सुजाता देशमुख यांनाही अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्काराचा सन्मान प्राप्त झाला आहे. विक्रम संवंथ यांचे ‘माय नेम इज गौहर जान’ हे इंग्रजी पुस्तक बरेच गाजले. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद सुजाता देशमुख यांनी ‘गौहर जान म्हणतात मला’ असे शीर्षक देऊन केला आहे. गौहर जान या कोलकाता येथील प्रख्यात गायिका आहेत. प्रस्तुत अनुवाद पुस्तकातून देशमुख यांनी या गायिकेचा जीवनपट उलगडून दाखवला आहे. या गायिकेची पहिली रेकॉर्ड ब्रिटिशांनी प्रसिद्ध केली. त्या संदर्भातील आठवणी, गायिका म्हणून त्यांचा झालेला प्रवास, त्या काळातील स्थित्यंतरे मांडण्याचा उत्तम प्रयत्न झाला आहे. अनुवाद हा दोन भाषांत साधणारा दुवा असतो. मूळ लेखकाला नेमके काय सांगायचे ते अनुवादकांनी लक्षात ठेवून मूळ आशयास धक्का न लावता आपले अनुवाद कार्य करायचे असते. या भाषेतून त्या भाषेत साहित्य जाताना सर्वच बाबी काळजीपूर्वक बघाव्या लागतात. अनुवाद करताना मूळ लेखकांच्या विचारांचा गाभा, आत्मा जपणे हे फार महत्त्वाचे असते. ती एक मोठी जोखीमच असते. सुजाता देशमुखांनी ती जाणली व उत्तम इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठी भाषेतील जाणकार, अभ्यासक, वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. या अनुवादाआधी सुजाता देशमुख यांनी दहशतीच्या छायेत, माझंही एक स्वप्न होतं, बाईकवरचं बिऱहाड, तिची मोहिनी, नीलची शाळा अशी पुस्तके मराठी भाषेत अनुवादित केली. त्यांनी अनुवाद केलेले एक पुस्तक बरेच गाजले ते लालकृष्ण आडवाणी यांचे ‘देश माझा, मी देशाचा.’ हे लालकृष्ण आडवाणी यांचे आत्मचरित्र देशमुखांनी मराठीत आणले. अनुवाद करताना मूळ लेखकाला काय म्हणायचे आहे हे आम्ही जाणून घ्यायला हवे, दुसऱ्याचे मूलही आपल्याला सांभाळता यायला हवे, असे अनुवाद प्रक्रियेच्या संदर्भात सुजाता देशमुख म्हणतात. ज्यावेळी त्या भाषेतील संकल्पना स्पष्ट केली जाते त्यात अंगभूतता असली पाहिजे. विशेष म्हणजे लेखक ज्या प्रकृतीमधून लिहितो, ती अनुवादकाने जोपासायला हवी असे सुजाता देशमुख यांना वाटते.