विदर्भातील सेवाव्रतींची तीर्थक्षेत्रे

  • प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील

    विदर्भाचा विचार जरी केला तरी येथे असे अनेक सेवाव्रती कार्य करीत आहेत, ज्यांच्या कार्याचा परिचय तरुण पिढीला करून देणे क्रमप्राप्त आहे जेणेकरुन त्यांच्यामधे दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या सामाजिक संवेदनांना जोपासता येईल. विदर्भातील ही स्थाने म्हणजे सामाजिक भान निर्माण करणारी क्षेत्रे आहेत. आपल्या सहलींच्या यादीत वर्षाकाठी यापैकी किमान एका सामाजिक क्षेत्राची पारिवारिक भेट जरुर ठरवावी. या क्षेत्रांवर कार्य करणारी सेवाव्रती मंडळी आजच्या समाजातील खरेखुरे आदर्श आहेत, ज्यांची आपल्या घरातील नव्या व जुन्या पिढीच्या प्रतिनिधींची भेट घडवायला हवी.

    समाजात वावरत असताना आपल्याला अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत राहतात. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाचा प्रसार वाढला आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणूस माणसाशी जोडल्या जाण्याची विविध साधने निर्माण झाली. सोशल मीडिया हा नवा प्रकार उदयास येऊन लोक त्याद्वारेच एकमेकांना भेटायला लागले. याद्वारे भेटी व्हायला लागल्या, पण प्रत्यक्ष भेटींमधील आपुलकी संपुष्टात येऊ लागली. या सोशल मीडियाचा आणखी एक परिणाम झाला तो म्हणजे, बरेच लोक यालाच आपले जग मानायला लागले व या प्रकारांचा वापर करणारी मंडळी म्हणजेच मनुष्य जमात असा भ्रम निर्माण झाला. परंतु या सोशल मीडियाच्या पलीकडे एक मोठा समुदाय आपल्या जगातच वावरतो याचे आपल्याला भानच राहत नाही. हा समुदाय उपेक्षितांचा, वंचितांचा, शोषितांचा आहे व दुर्दैवाने याकडे आपले संपूर्णपणे दुर्लक्ष झालेले असते. मॅकडोनाल्ड किंवा केएफसीसारख्या दुकानांमधून पिझ्झा, बर्गर खात फिरणारी, हातात महाग अँड्रॉइड फोन वापरणारी पिढी या तंत्रज्ञानाच्या परिघापलीकडे वावरणाऱ्या समुदायापासून पूर्णपणे तुटलेली आहे. हा दुर्लक्षित समुदाय त्यांच्या मनःपटलावर किंवा विचारकक्षेमधे अस्तित्वातच नाही; परंतु या दुर्लक्षित समाजाची मनापासून सेवा करणारे व त्यांना सक्षम बनवून मुख्य प्रवाहात आणणारे काही सेवाव्रती आपल्या आसपास वावरत असतात. हे लोक सातत्याने अनेक वर्षे या दुर्लक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्य झोकून झटत आहेत. या सेवाव्रतींच्या कार्याचे अवलोकन करणेदेखील आपल्यासाठी आणि विशेषतः तरुण पिढीसाठी प्रेरणादायी व सामाजिक संवेदना जागृत करणारे ठरू शकते.

    केवळ विदर्भाचा विचार जरी केला तरी येथे असे अनेक सेवाव्रती कार्य करीत आहेत, ज्यांच्या कार्याचा परिचय तरुण पिढीला करून देणे क्रमप्राप्त आहे जेणेकरुन त्यांच्यामधे दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या सामाजिक संवेदनांना जोपासता येईल. कुष्ठरोग झाल्यानंतर अगदी जवळच्याही व्यक्तीला घराबाहेर काढल्यानंतर त्याला सन्मानाने जगविणारे व त्याला हक्काचे स्वतंत्र छत उपलब्ध करुन देणाऱ्या विकास आमटे यांचे कार्य असेच आहे. बाबा आमटेंनी सुरू केलेले कुष्ठरोग्यांच्या पुनरुत्थानाचे कार्य वरोरा येथील आनंदवनात बघणे ही एक मोठी उपलब्धी ठरते. गडचिरोलीला आदिवासी बांधवांच्या जीवनसक्षमीकरणासाठी कार्य करणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांचे ‘सर्च अनुसंधान केंद्र’ म्हणजे आदिवासी बांधवांसाठी नवसंजीवनी ठरते. ‘सर्च’मधे तरुण मुलांसाठी चालविले जाणारे शिबीर हे अन्य व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांपेक्षा वेगळे ठरते; कारण तेथे समाजातील दुर्लक्षित घटकांबद्दल संवेदना निर्माण केल्या जातात व त्यामुळे आपला छोटासा व नेहमीचा परीघ सोडून त्या पलीकडे असलेल्या जगाची ओळख होते. गडचिरोली जिल्ह्यातीलच आलापल्ली नावाच्या गावाहून भामरागड येथे जाताना साधारण सत्तर किलोमीटरचा रस्ता निबीड अरण्यातून आहे. या अरण्यामधे नक्षलवादी कारवाई सुरू असते याची आठवण येताच ते अरण्य जास्त गर्द वाटायला लागते. परंतु भामरागडच्या अलीकडे लोक बिरादरी प्रकल्पामधे शिरल्यावर माणसाने ठरविले तर माणसांसाठी काय करता येऊ शकते याचे अप्रतिम व प्रेरक उदाहरण डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे व त्यांच्या परिवाराच्या माधमातून समोर येते. माडीया गोंड आदिवासी बांधवांच्या जीवनात खराखुरा प्रकाश या परिवाराने निर्माण केलाय. माणसेच काय, पण जंगली श्वापदांनाही त्यांनी लावलेला लळा पाहून माणसाच्या प्रेम करण्याच्या शक्तीवर दृढ विश्वास बसतो. धारणी परिक्षेत्रात बैरागड येथे अशाच प्रकारचे कार्य करणारे डॉक्टर जोडपे डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या जीवनाचा आलेख असाच चकित करणारा आहे. साधारण तीस वर्षांपूर्वी अत्यंत सुखवस्तू स्थितीमधे व्यावसायिक वैद्यकीय सेवा देऊन भौतिकदृष्ट्या जगणे नाकारून बैरागडसारख्या दुर्गम भागात वास्तव्य करून सेवाकार्य करणे ही किती अवघड बाब आहे याची कल्पना बैरागडला गेल्यावरच येऊ शकते. आदिवासी तरुण-तरुणींना मुख्य धारेत आणण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा विचार करून धारणीजवळ लवादा येथे कार्य करणारे जोडपे सुनील व सौ. निरुपमा देशपांडे. संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून या मुला-मुलींना बांबूपासून विविध वस्तू बनविणे शिकविले जाते. त्यानंतर त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था करुन त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. याच परिसरात आणखी एक समर्पित कार्य म्हणजे म्हणजे वझ्झर येथे शंकरबाबा पापळकर यांच्याद्वारे चालविले जाणारे स्व. अंबादासपंत वैद्य अनाथालय. शंभरहून अधिक मूकबधिर व अनाथ मुला-मुलींचा बाप होऊन त्यांचे पालनपोषण करणाऱ्या या माणसाने या मुलांच्या व काही समर्पित कार्यकर्त्यांच्या मदतीने पंधरा हजारांहून अधिक वृक्ष लागवड केली आहे व तीस एकरांचा परिसर हिरवागार करून टाकला आहे. अनाथ मुले व हजारो झाडे यांना हा माणूस तळमळीने सांभाळतोय. अशाच पठडीतले पण जरासे वेगळे कार्य नागपूरला कर्नल सुनील देशपांडे व त्यांची कन्या फ्लाइंग ऑफिसर शिवाली मिळून करीत आहेत. तरुणांनी सैन्यामधे जाऊन देशसेवा करावी किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावे यासाठी हे बाप-लेक ‘प्रहार’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून प्रचंड मेहनत करीत आहेत.

    या सर्व कार्यक्षेत्रांचा विचार करता ही कार्यक्षेत्रे नसून खरीखुरी तीर्थक्षेत्रेच आहेत असे म्हणावेसे वाटते. आपण पुण्य मिळविण्यासाठी आपल्या परिवारातील मुलाबाळांना घेऊन तीर्थक्षेत्रांना भेटी देतो. मंदिरांमधे रांगा लावून, कधी पैसे भरून, कधी धक्काबुक्की करून, कधी शंकराच्या पिंडीला दूध अर्पण करुन परमेश्वराची आराधना करतो व त्याचे दर्शन घेतो. यामुळे आपणास पुण्य लाभेल व परिवारातील मुला-मुलींवर धार्मिक संस्कार होतील असे आपणास वाटत असेल. आपल्या श्रद्धा असतील तर ते जरुर करावे; परंतु या धार्मिक संस्कारांसोबत मुला-मुलींच्या सामाजिक संवेदनादेखील जागृत असायला हव्यात. हे सामाजिक संस्कार वर वर्णन केलेल्या कार्य-तीर्थस्थळांना मिळतात. विदर्भातील ही स्थाने म्हणजे सामाजिक भान निर्माण करणारी क्षेत्रे आहेत. आपल्या सहलींच्या यादीत वर्षाकाठी यापैकी किमान एका सामाजिक क्षेत्राची पारिवारिक भेट जरुर ठरवावी. या क्षेत्रांवर कार्य करणारी सेवाव्रती मंडळी आजच्या समाजातील खरेखुरे आदर्श आहेत, ज्यांची आपल्या घरातील नव्या व जुन्या पिढीच्या प्रतिनिधींची भेट घडवायला हवी. इतरांसाठी कसे जगायचे याचा पाठ आपल्याला मिळू शकेल, जो निश्चित उपयोगी राहील.