नरवीर तानाजी : अजरामर योद्धा

  • रवींद्र मालुसरे

‘गड आला, पण सिंह गेला’ असे भावुक उद्गार ज्या नरवीर तानाजींबद्दल छत्रपती शिवरायांनी काढले त्या तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी. तानाजी म्हणजे शिवरायांचा अत्यंत विश्वासू आणि शूर कर्तव्यनिष्ठ सेवक. स्वराज्यासाठीच्या अनेक कामगिऱ्या त्यांनी फत्ते केल्या. आपल्या देदीप्यमान शौर्याने तानाजी मालुसरे हे नाव अजरामर योद्धा म्हणूनच कायम ओळखले जाईल.

‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ किंवा ‘गड आला पण माझा सिंह गेला’ अशी इतिहासात असलेली नोंद म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास नव्हे, तर तानाजी यांच्या देदीप्यमान तेजस्वी पराक्रमाची गाथा सांगणारा शाहीर तुलसीदासाने रचलेला शिवकाळातला पहिला पोवाडा आणि इतर बऱ्याच प्रसंगांची नोंद इतिहासात आजही उपलब्ध आहे.

पिलाजी नाईक हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार. नीळकंठराव सरनाईक यांचे चिरंजीव. त्यांना आणि तानाजी मालुसरे यांना शिवाजी महाराजांनी कोकणात संगमेश्वर येथे ठेवले होते. त्या काळात कोकणात वाहतुकीसाठी चांगले रस्ते नव्हते. संगमेश्वरला छावणी करून राहत असताना महाराजांनी तानाजी व पिलाजी यांना रस्तेबांधणीचे काम सांगितले. तानाजी यांनी त्यात मुळीच कमीपणा मानला नाही. ढाल-तलवारी, भाले-बरचे छावणीत ठेवून मंडळींनी रस्त्याच्या जडणघडणीला सुरुवात केली. याच सैन्यावर शृंगारपूरचे सूर्याजीराव सुर्वे यांनी एके रात्री अकस्मात हल्ला चढविला. तानाजीराव सावध होतेच. त्यांनी हातात ढाल-तलवार घेतली. अकस्मात हल्ल्याने ते मुळीच भ्याले नाहीत, निकराने लढू लागले. भिणे त्यांना ठाऊकच नव्हते. सुभेदार नेटाने लढू लागल्यावर त्याचे शिपाई थोडेच मागे हटणार! त्यांनीही हिमतीने हत्यारे चालवली. अकस्मात झालेला हा हल्ला तानाजीने मागे लोटला. पिलाजी आपली फौज घेऊन दुसऱ्या बाजूला लढत होता. त्याचा मात्र निभाव लागेना. शत्रूचा जोर जसजसा वाढला तसा स्वतः पिलाजी नीळकंठराव हत्यार टाकून पळू लागले. तानाजीराव त्या दिशेला ताबडतोब धावले. आपल्या राकट हातांनी त्याची मानगूट पकडली आणि म्हणाले, पळून जायला लाज नाही वाटत? ऊठ, भ्याड कुणा मुलुखाचा. पिलाजीरावांची अवस्था शोचनीय झाली होती. तानाजीरावांनी प्रथम त्याची खूप निंदा केली. एवढे करून न थांबता एक मोठा दोरखंड आणवला. त्या दोराने त्यांनी पिलाजीला एका दगडाशी आवळून बांधले आणि समशेर उपसून शत्रूवर तुटून पडले. तानाजींनी उडवलेला कल्लोळ फार मोठा होता. तानाजी यांनी आपल्या भीमपराक्रमाने शत्रूचा डाव उधळला होता आणि विजापूरच्या आदिलशाहीचा कोकण सेनापती धुळीला मिळवला होता. तानाजीराव त्या बांधलेल्या दगडाजवळ आले आणि पिलाजीला मोकळे करीत म्हणाले, ‘‘अरे बाबा मरणाला भिऊन चालत न्हाई. मरणाच्या मागे आपण पळू लागलो म्हंजे ते पळते. असे भिऊन पुन्यांदा पळू नका, नेटाने लढत चला.’’

सुभेदार तानाजी अंगापिंडाने चांगलेच भरदार होते. त्यांच्या भरदार शरीराचे आणि गुलजार मिशांचे वर्णन रसिकपणे शाहीर करीत. कुणी म्हणतात, त्यांच्या मिश्यांच्या आकड्यात टपोरी लिंबे सहज बसत! शरीराप्रमाणे त्यांचे मनही मोठे बेडर, धाडसी होते. स्वतःच्या शक्तीवर त्यांना विश्वास होता. या सर्व गोष्टींमुळे तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजीराजांचा हुकमी एक्का होता. किती तरी कामगिऱ्या त्यांनी बिनबोभाट पार पाडल्या. तानाजी मालुसरे यांच्या हाताखाली एक हजार मावळ्यांचे पथक होते.

तानाजी मालुसरेंचे नाव इतिहासात अजरामर झाले ती मोहीम सिंहगडाची. सिंहगड हा ‘कोंढाणा’ या नावाने आधी ओळखला जात असे. पुरंदरच्या तहान्वये औरंगजेबाला जे २३ किल्ले देण्यात आले होते त्याप्रमाणे मिर्झाराजांना हा गड शिवाजी महाराजांनी खाली करून दिला होता. महाराज आग्रा भेटीनंतर शिताफीने निसटून आल्यानंतर तह मोडून हा किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरवले. सिंहगडावर महाराजांची आणि जिजाऊंची तशी विशेष ममताही होती. या गडावर फडकणारा मोगलांचा हिरवा ध्वज हा जिजाऊ आऊसाहेबांच्या हृदयातील सल होती.

एक तर गड अवघड! त्यावर अंमलदार होता उदयभानु राठोड हा राजपूत, परंतु मुसलमान झालेला कडवा शूर किल्लेदार. तो स्वतः शूर होता, सावधपणे तो गडाची राखण करीत होता. तो कामात कडक होता. कामचुकार अगर ढिलाई करणाऱ्यांची तो गय करीत नसे. औरंगजेबाचा त्याच्यावर अतिशय विश्वास होता. त्याच्या हाताखाली १५०० राजपूत लढवय्ये शिपाई होते. गडावर तोफा, दारूगोळा, बंदुका, धान्य, रसद भरपूर होती. असा अवघड किल्ला घेण्यासाठी प्रत्यक्षात आपल्या मुलाचे लग्न ठरले असताना तानाजीरावांनी मोहिमेचा विडा उचलला. ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे’ अशी सिंहगर्जना करीत ही मोहीम त्यांनी मागून घेतली होती.

सिंहगड घेताना तानाजीरावांनी अजोड पराक्रमाने आपले नाव इतिहासात अजरामर केले. आधी कर्तव्य स्वराज्यासाठी, आपल्या महाराजांसाठी हे ब्रीद ते जगले. कारण स्वतः महाराजांनी या मोहिमेवर त्यांनी जाऊ नये असे त्यांना सांगितले होते. तरीही त्यांनी स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी ही मोहीम स्वीकारली.

तानाजीरावांसारख्या नेक आणि इनामी कर्तव्यनिष्ठ सेवकाने राजांना साथ दिली म्हणून स्वराज्याची इमारत पुढे भक्कमपणे उभी राहिली. अनुयायी कसा असावा हे तानाजी यांनी दाखवून दिले, तर भाऊ कसा असावा हे सूर्याजीने दाखवून दिले. रामराज्यात राम-लक्ष्मण ही भावंडे अमर झाली, तर महाराष्ट्राच्या शिवराज्यात तानाजी-सूर्याजी हे भाऊ अढळ झाले. शिवाजी महाराजांना सूर्याजीची हिंमत पाहून फार धन्यता वाटली. नंतर त्यांनी तानाजी यांचा सुभा सूर्याजीला दिला. आज पोलादपूर तालुक्यात उमरठ येथे तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पवित्र्यातील सहा फूट उंचीचा भव्य पुतळा आहे तर जवळच साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. साखर येथील मालुसरे मंडळी १९३० पासून उमरठ येथे माघ वद्य नवमीला जाऊन आजतागायत नतमस्तक होत शौर्यदिन साजरा करीत आली आहे.

सुभेदार तानाजीरावांच्या शौर्यशाली चरित्रापासून स्फूर्ती घेत अनेक लढवय्ये हिंदुस्थानात निर्माण झाले. तानाजीरावांच्या चरित्रात एवढी ताकद आहे की, स्वातंत्रवीर सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना जनता पेटून उठावी यासाठी तानाजीच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला, या पोवाड्यातून गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हा देश पेटून उठेल हे लक्षात येताच इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली. तानाजीरावांचे चरित्र कितीही गायले तरी थोडेच आणि त्यातील थोडे जरी आचरले तरी पुष्कळच!

(लेखक मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष आहेत.)