येमेन : सौदी व इराण संघर्षाचा बळी

सनत कोल्हटकर – [email protected]

गेली अनेक वर्षे येमेन निर्नायकी अवस्थेत असून सौदी अरेबियाकडून सतत होणाऱ्या बॉम्ब फेकीमुळे त्रस्त आहे. सौदीच्या विमानांकडून येमेनमधील नागरी वस्तीवरच जास्त हल्ले होत आहेत. प्रचंड अन्नटंचाई, औषधटंचाई, वैद्यकीय उपचारांचा अभाव, पिण्यास अशुद्ध पाणी यामुळे कॉलरासारखे पसरलेले रोग या सर्व गोष्टींमुळे येमेनमधील सामान्य जनता सध्या होरपळून निघत आहे. येमेनची राजधानी सना व येमेनचा उत्तरेकडील भाग हा इराणप्रणीत हौथी बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे शियाप्रणीत हौथी व सौदीचे सुन्नीप्रणीत येमेनी लोक यांच्यात गेली दोन वर्षे धुमश्चक्री चालू आहे.

ट्युनिशियापासून २०११ मध्ये सुरू झालेल्या ‘अरब स्प्रिंग’च्या उठलेल्या वादळात इजिप्त, लिबिया, सीरिया या देशांना मोठा फटका बसला. लिबियामध्ये सत्तांतर तर झालेच, पण तेथील सत्ताधीश कर्नल मुअम्मर गदाफी याचाही बळी गेला. सीरिया तर इसिसबरोबरील लढाईमध्ये गेली सहा वर्षे अडकून पडला होता. सीरिया जबरदस्त उद्ध्वस्त तर झालाच, परंतु लाखो लोकांनी युद्धात प्राण गमावले आणि लाखो लोकांनी देश सोडून स्थलांतर केले. तेथील सत्ताधीश बशर अल असद याला हटविण्याचे खूपच प्रयत्न झाले. परंतु रशिया व इराणच्या मदतीने असद हे आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरले आहेत. तर इजिप्तमध्ये अनेक वर्षांपासून तेथील सत्तेवर मांड ठोकून बसलेले पंतप्रधान ‘होस्नी मुबारक’ यांची सत्ता संपुष्टात आली. या यादीतला चौथा देश म्हणजे येमेन. आधीच गरिबीने ग्रासलेल्या या देशाची सीमा तेलसंपन्न सौदी अरेबियाशी भिडलेली आहे.

२०११मध्ये येमेनमध्ये संघर्ष सुरू झाला. येमेनला १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेला येमेनचा अध्यक्ष अली अब्दुल्लाह सालेह याने २०१२मध्ये ‘अरब स्प्रिंग’च्या सुरू झालेल्या चळवळीमध्ये येमेनची सत्ता सोडली. त्या नंतर मन्सूर हादी हे येमेनचे अध्यक्ष झाले. सत्ताभ्रष्ट झालेल्या सालेहने मग येमेनमधील इराणप्रणीत ‘हौथी’ बंडखोरांशी हातमिळवणी केली आणि हादी सरकारला त्रास देणे सुरू केले. या दोन्ही पंतप्रधानांच्या सत्तासंघर्षात येमेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाले. हादी सरकारला सौदी सरकारचा पाठिंबा होता. नंतर काही काळाने मन्सूर हादी यांनी येमेनमधून पळ काढला व सौदीमध्ये राजकीय आश्रय घेतला.

गेली अनेक वर्षे येमेन निर्नायकी अवस्थेत असून सौदी अरेबियाकडून सतत होणाऱया बॉम्ब फेकीमुळे त्रस्त असून सौदीच्या विमानांकडून येमेनमधील नागरी वस्तीवरच जास्त हल्ले होत असल्याचे बोलले गेले. प्रचंड अन्नटंचाई, औषधटंचाई, वैद्यकीय उपचारांचा अभाव, पिण्यास अशुद्ध पाणी यामुळे कॉलरासारखे पसरलेले रोग या सर्व गोष्टींमुळे येमेनमधील सामान्य जनता सध्या होरपळून निघत आहे.

येमेनची राजधानी सना व येमेनचा उत्तरेकडील भाग हा इराणप्रणीत हौथी बंडखोरांच्या ताब्यात आहे. त्यामुळे शियाप्रणीत हौथी व सौदीचे सुन्नीप्रणीत येमेनी लोक यांच्यात गेली दोन वर्षे जोरदार धुमश्चक्री चालू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वैद्यकीय मदतीसाठीचे पथक येमेनमध्ये काम करत असून पथकात काम करणाऱ्यांनी येमेनमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येमेनचे माजी पंतप्रधान अली अब्दुल्लाह सालेह यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सौदी व इराण या दोघांमध्ये चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाचे सौदीने स्वागतही केले होते, परंतु सालेह यांना फितूर समजून येमेनमध्येच त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे हौथी बंडखोरांचा हात असल्याचे बोलले गेले. संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अधिकारी जेमी मेकगोल्डरिक यांनी तर येमेनमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला भयंकर दुष्काळ पडण्याचे भाकीत केले आहे.

गेल्या दोन महिन्यांत येमेनमधून सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळावर दोनवेळा क्षेपणास्त्र डागण्यात आली. ती क्षेपणास्त्रे रियाधजवळ पोहोचण्याआधीच सौदीने ती क्षेपणास्त्रे ‘पॅट्रिअट’ यंत्रणेद्वारे पाडल्याचा दावा केला. क्षेपणास्त्र सोडण्यामागे हौथी बंडखोरांचा हात असल्याचे सौदीचे म्हणणे आहे तर ते क्षेपणास्त्र बैलिस्टिक प्रकारातील असून ते इराणने हौथी बंडखोरांना पुरविल्याचा आरोप अमेरिका व सौदी अरेबिया या दोघांनी केला आहे.

यामुळे सौदी अरेबियाने येमेनबरोबरील त्यांच्या देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. येमेनच्या सीमा सौदी अरेबिया व ओमान या दोन देशांशी भिडलेल्या आहेत. तसेच सौदी अरेबियाने सौदीमधून येमेनला होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही रोखून धरला आहे. अनेक अमेरिकन सिनेटर्सनी ट्रम्प प्रशासनाला येमेनला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू करण्याबद्दल सौदीवर दबाव आणण्याची विनंती केली आहे. मागील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सौदी अरेबियाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा येमेनला ताबडतोब सुरू करण्याबद्दल फर्मावले आहे.

सौदी व इराण या दोघांनी संयम दाखविला तरच येमेनमधील परिस्थिती नजीकच्या काळात सुरळीत होऊ शकते.