गाव जगेल तर देश तगेल

श्रीकांत पोहनकर – [email protected]

गांधीजींची ग्रामस्वराज्याची स्वप्नं प्रत्यक्षात उतरण्याऐवजी केवळ हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या गांधीटोप्यांपुरतीच त्यांची स्मृती आता शिल्लक राहिली आहे. गावकऱ्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेणे व मोकळ्या, शुद्ध हवेची साथ सोडून गटारांच्या शेजारी दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्यांमध्ये वास्तव्य करणे हे काय प्रगतीचं लक्षण समजायचं का? गावांची सर्वांगीण उन्नती झाली तरच गावं जगतील आणि गावं जगली नाहीत तर त्यांच्याशिवाय देश तगणं हे एक मोठं दिवास्वप्नच ठरेल.

शाळकरी वयात शेतकरी, ग्रामीण हिंदुस्थान, हिंदुस्थानातील खेडी किंवा महात्मा गांधी यांसारख्या काही विषयांवर निबंध लिहिण्याची वेळ आली की, त्यातील कोणत्याही विषयावरील निबंधाची सुरुवात ‘हिंदुस्थान देश खेड्यांमध्ये राहतो असं महात्मा गांधी म्हणत’ अशा एका ठरावीक व वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्याने होत असे! हिंदुस्थानसारखा एक अख्खा देश खेड्यांमध्ये राहतो याचा नक्की अर्थ काय हे अजिबात न कळूनही मी त्या गांधीजींच्या वाक्याने अनेकदा निबंधाची सुरुवात केली होती. काही वर्षांनंतर त्या वाक्याचा अर्थ कळला व आपल्या देशातील ७० टक्के लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून असल्यामुळे बहुसंख्य देशवासी खेड्यांमध्ये राहतात हे लक्षात आलं. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटल्यानंतर गांधीजी जर आज हिंदुस्थानात अवतरले तर सर्वप्रथम आपल्या देशाबद्दल अनेक वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल समस्त देशवासीयांची माफी मागून ते म्हणतील- ‘‘माफ करा, हिंदुस्थान खेड्यांमध्ये नव्हे, तर शहरांमधील बकाल झोपडपट्ट्यांमध्ये व पदपथांवर राहतो!’’

या जगात पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्तता झाल्यानंतर अनेक देशांनी हेवा वाटण्यासारखी प्रगती केली. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने केलेली प्रगती बघून तर अमेरिकेसारख्या महासत्तेलाही घाम फुटला. गावांचा बळी देऊन कोणत्याही देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होत नसते याची ज्या देशांमधील सुज्ञ राज्यकर्त्यांना जाणीव होती त्या देशांमध्ये सुखसमृध्दीचे वारे वाहू लागले, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशप्रेमाऐवजी व्यक्तिस्तोम माजविण्यात धन्यता मानणाऱ्या महान नेत्यांनी आपल्या देशाचं काय केलं? ग्रामस्थांमध्ये कायमचं वितुष्ट निर्माण करणारं अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण, राज्याच्या महसुलात भर घालण्याच्या बहाण्याने गावागावात देशी दारूच्या परवान्यांची वाटली जाणारी खिरापत, विदर्भ-मराठवाड्यासारख्या प्रदेशात शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे व उद्घाटन झाल्यानंतर थोड्याच अवधीत बंद पडणारे साखर कारखाने व सूत गिरण्या, कारखाने बंद पडल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाकुल्या दाखवत पंचतारांकित हॉटेल्समध्ये वास्तव्य करणारे व आलिशान वातानुकूलित गाड्यांमधून फिरणारे त्या कारखान्यांचे प्रवर्तक, कधीही अस्तित्वात न येणाऱ्या कोट्यवधी रुपये खर्चाच्या सिंचन योजनांचे कागदी घोडे, नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळणारे हजारो शेतकरी हे आमच्या गावांचं आजचं भीषण चित्र. ग्रामरक्षण, ग्रामशुध्दी, ग्रामनिर्माण कला, ग्राम-आरोग्य व गोवंश-सुधार या ग्रामनिर्माण पंचकाद्वारे ग्रामसमृध्दीचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या देशात गावांमागून गावं जर आपलं जीवन संपवू लागली तर स्वतःला महान समजल्या जाणाऱ्या या देशाची प्रगती कशी होणार?

आपल्या देशात गरीब व श्रीमंत यांच्यांमधील दरी अतिशय चिंताजनकरीत्या जशी वाढत चालली आहे, तशीच दरी ग्रामीण व शहरी भागांमध्ये वाढते आहे. एकीकडे हिंदुस्थानसारख्या देशातील साठ कोटींपेक्षाही जास्त लोकांना दिवसभर कष्ट करून रोज ५०-६० रुपयेही मिळू शकत नाहीत, तर दुसरीकडे त्याच देशातील अवघ्या ३६ अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती तब्बल १२ लाख ५५ हजार कोटी रुपये इतकी आहे! गावांचं अहोरात्र शोषण करून शहरं सोन्याच्या राशींवर लोळण्याची स्वप्नं बघत असतील तर कणाकणाने मृत्युपंथाला लागत चाललेल्या गावांमुळे हा देश तगून राहण्याची सुतराम शक्यता नाही!

ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या व शेतीवरच उपजीविका असणाऱ्या बहुसंख्य देशवासीयांच्या हिताकडे पूर्णतः दुर्लक्ष करून जिथे मूठभर लोक राहतात अशा मोजक्या शहरांचे सिंगापुरीकरण करण्याची स्वप्ने बघणाऱ्या राजकारण्यांमुळे हा देश दिवसेंदिवस बकाल होत चालला आहे. गांधीजींची ग्रामस्वराज्याची स्वप्नं प्रत्यक्षात उतरण्याऐवजी केवळ हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्या गांधीटोप्यांपुरतीच त्यांची स्मृती आता शिल्लक राहिली आहे. गावकऱ्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेणे व मोकळ्या, शुद्ध हवेची साथ सोडून गटारांच्या शेजारी दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्यांमध्ये वास्तव्य करणे हे काय प्रगतीचं लक्षण समजायचं का? गावांची सर्वांगीण उन्नती झाली तरच गावं जगतील आणि गावं जगली नाहीत तर त्यांच्याशिवाय देश तगणं हे एक मोठं दिवास्वप्नच ठरेल.

(लेखक पोहनकर फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष आहेत. )