पुलंचे साहित्य आणि पुढील पिढी

2
  • वीरेंद्र चित्राव

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात उपक्रम, कार्यक्रम यांची रेलचेल होईल यात शंकाच नाही. पण खरी गरज आहे त्यांचे विचार आणि साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची! यानिमित्ताने होणारा पु. ल. विचार-साहित्याचा जागर म्हणजे निव्वळ कार्यक्रमांची मालिका असता कामा नये, तर विविध माध्यमांतून पुलंचे शब्द, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तसेच सर्जनशील अभिरुचीसंपन्नता यांचा ठेवा भावी पिढय़ांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक अभिजात प्रयत्न असावयास हवा.

हाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी आजपासून (8 नोव्हेंबर) सुरू होत आहे. पुलंची जन्मशताब्दी म्हणजे जगभरातील मराठी मनांचा केवळ आनंदसोहळा नसून साहित्यविश्वातील एक अभूतपूर्व योग आहे. पुलंवर मराठी मनांनी अतोनात प्रेम केले याचे कारण म्हणजे पु. ल. ही मुद्रा त्यांच्या हृदयात नुसतीच स्थान करून राहिली नाही तर अनेक पिढय़ांना तिने प्रेरित केले. खरेतर पुलंचे निधन होऊनदेखील 18 वर्षे लोटली तरीसुद्धा आपल्याला मनसोक्त आनंद देणारा हा ‘बहुरुपी’ आजदेखील आपल्या मनावर अधिराज्य करून राहतो याचे कारण शोधणं हेदेखील एक आव्हानच आहे!

‘खरेतर पुलंच्या बाबतीत अष्टपैलू हा शब्ददेखील तोकडाच पडतो’…असे विं. दा. करंदीकर म्हणायचे आणि ते तंतोतंत खरं देखील आहे. संगीतकार, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, एकपात्री कलाकार, हार्मोनियम वादक, वक्ता, कथाकथनकार आदी अनेक रूपांमधून पु. ल. रसिकांस भेटले आणि त्या प्रत्येक रूपावर आपण भरभरून प्रेम केले. त्याचे कारण पुलंनी आपल्या गुणांनी स्वतः तर कलांचा आस्वाद घेतलाच … पण अनंत हस्तांनी तो द्विगुणित करून रसिकांवर त्याची उधळण केली. जे जे कलासौंदर्य पुलंना भावले, त्याचा परिचय त्यांनी इतरांना करून दिला… ज्यासाठी जगावं अशा अनेक गोष्टींवर त्यांनी स्वतः प्रेम केलंच; पण जगण्याचा आनंद घेण्यासाठी कलेशी मैत्री करायलाही शिकवलं! ते नेहमी म्हणायचे ‘पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा, पण तेवढ्यावर थांबू नका. आयुष्यात एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री का जगायचे हे सांगून जाईल’. चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांचा अभिजात आविष्कार ते कायमच जगले आणि या जगण्यातला आनंद कसा घ्यावा? हे त्यांनी आपल्याला शिकविले म्हणूनच पु. ल. आजही आपल्या मनाचा एक कप्पा व्यापून राहिले आहेत.

पुलंनी आपणास आणि मराठी भाषेस काय दिले, असा विचार कायमच मनात येतो. गेल्या काही दशकांत आपणांस धकाधकीच्या जीवनास सामोरे जावे लागत आहे. रोजचे प्रश्न सोडविताना आपली एवढी दमछाक होते की, कला, संस्कृती, वाचन या सगळ्या पासून सर्वसामान्य माणूस लांब जाताना दिसतो. रखरखत्या उन्हात वाऱ्याची हळूवार झुळूक यावी आणि मन क्षणभर प्रसन्न व्हावे तसा आनंद पुलंचे साहित्य आणि विनोदतून आजदेखील आपणांस मिळतो. तसं पाहिलं तर पुलंच्या साहित्यातील ‘चाळ’ शहरी जीवनातून कधीच हद्दपार झाली. त्यांच्या साहित्याची भाषांतरे सर्वदूर पोहचू शकली नाहीत तरी देखील त्यांच्या शब्दांची जादू आणि ध्वनीफितींचा मोह अजूनही टवटवीत आहे आणि म्हणूनच त्यांची जन्मशताब्दी उपक्रमशील करण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. विविध क्षेत्र आणि माध्यमांतील व्यक्ती आणि संस्था कल्पकतेने कार्यक्रम आणि उपक्रमांची रचना करताना जगभर दिसतात आणि हेच पु. ल. नावाच्या ‘खेळीयाचे’ मराठी मनावरचे गारुड आहे.

या वर्षात उपक्रम, कार्यक्रम, घोषणा यांची रेलचेल होईल यात शंकाच नाही. पण खरी गरज आहे त्यांचे विचार आणि साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची! थोडक्यात सांगायचे तर जी पिढी आज शाळा आणि महाविद्यालयात आहे त्यांना मराठी भाषा, साहित्य, साहित्यिक यांची किती ओळख आहे? त्यांच्या कलाकृतींबद्दल या पिढीस किती आत्मीयता आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास पुढे येणारी वास्तविकता फारशी आनंददायी नसेल. यामुळेच पु.ल. प्रेमींची जवाबदारी अधिकच वाढते. एक चांगले आहे की, पुलंची साहित्य निर्मिती बहुआयामी आहे. पुस्तके, कथाकथन, व्हिडिओ, चित्रपट, गाणी, भाषणे अशा अनेकविध माध्यमांतून नव्या पिढीस त्यांची नुसती ओळखच नव्हे तर या सर्वांची गोडी लावण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल.

जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने होणारा पु. ल. विचार-साहित्याचा जागर म्हणजे निव्वळ कार्यक्रमांची मालिका असता कामा नये, तर विविध माध्यमांतून पुलंचे शब्द, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तसेच सर्जनशील अभिरुचीसंपन्नता यांचा ठेवा भावी पिढय़ांपर्यंत पोहोचविण्याचा हा एक अभिजात प्रयत्न असावयास हवा. रोजच्या जीवनातून हद्दपार होत असलेल्या ‘विनोदाचे’ महत्त्व या निमित्ताने तरुण पिढीपर्यंत पोहोचावे आणि जीवनाचा निखळ आनंद म्हणजे काय, याची प्रचीती त्यांना मिळाली तर हे वर्ष खऱ्या अर्थी साजरे झाले असे म्हणता येईल.

(लेखक ग्लोबल पुलोत्सव महोत्सवाचे संयोजक आहेत.)