आभाळमाया – पुन्हा हुलकावणी

[email protected]

अंतराळाचा वेध घेताना सारं कसं छान छानच दिसतं असं नाही. दूर कुठे तरी वसतीयोग्य ग्रह सापडण्याच्या आनंदात मश्गूल राहून चालत नाही. पृथ्वीच्या अवतीभोवतीच्या अवकाशावर बारीक नजर ठेवावी लागते. हबलसारख्या अवकाशस्थ दुर्बिणी ते काम चोख बजावतात. त्यांना अंतराळातील विलोभनीय दृश्यांप्रमाणेच पृथ्वीला त्रासदायक ठरू शकणारे धोकेही दिसतात. त्यातला एक धोका पृथ्वीजवळून पसार होणाऱ्या महापाषाणांचा किंवा अशनींचा, लघुग्रह म्हणता येणार नाही असे, पण अगदीच छोट्या दगड-गोट्याएवढे लहानही नसले काही अवकाशस्थ महापाषाण त्यांच्या भन्नाट गतीने अवकाशात इतस्ततः भिरभिरत असतात. परस्परांवर आदळआपट होऊन त्यांची कक्षा नि गती बदलू शकते. त्यापैकी काही पृथ्वीच्या रोखाने येऊ शकतात आणि कदाचित पृथ्वीवर आदळू शकतात.

यात काही पृथ्वीवासीयांना घाबरवण्याचा संशोधकांचा हेतू नसतो. उलट, ‘निद्रर अर्थ’ किंवा पृथ्वीजवळच्या कक्षांमध्ये भरकटणारे असे महापाषाण शोधून त्यांचा संभाव्य धोका कसा टाळता येईल यावरच जास्त विचार केला जातो.
साठ-पासष्ट कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या महाकाय अशनीने प्रचंड उत्पात घडवला. सगळे डायनॉसॉर नष्ट झाले. धुळीच्या वादळाने अनेक दिवस पृथ्वी अंधारली. कालांतराने स्थिती पूर्वपदावर येऊन उरल्या सुरल्या जिवांची उक्रांती सुरू झाली. त्यानंतर असा अवकाशी उत्पात झालेला नाही. विसाव्या शतकाच्या आरंभी रशियात तुंगास्का येथे जंगलात पडलेल्या अशनीनंतर मोठ्या अशनीने पृथ्वीला धडक दिलेली नाही.

सुमारे बावन्न हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लोणार येथे कोसळलेल्या अशनीने निर्माण केलेले विवर सर्वांना ठाऊक आहे. परंतु विरळ वस्तीच्या त्या काळात फार जैविक हानी झाली नसावी आणि तशी त्याची नोंद नाही. मात्र आता एखादा महापाषाण पृथ्वीच्या रोखाने येत असेल तर सावध राहायला हवं. अधूनमधून असा ‘अशनी’ येणार येणार म्हणून आवई उठतेच आणि दिलेली वेळ निघून गेली की आपण हुश्श करतो.

परवा ४ तारखेला असाच एक महाकाय अशनी पृथ्वीजवळून पसार झाला. जवळून म्हणजे पृथ्वीच्या कक्षेपासून ४२ लाख किलोमीटर अंतरावरून त्याने फेरी मारली. हे अंतर चंद्र आणि पृथ्वी या अंतराच्या दहापटींहून अधिक आहे. त्यामुळे तो महापाषण पृथ्वीजवळून गेला असं म्हणता येईल का? तर निश्चितच तसं म्हणता येईल. कारण अतिशय वेगाने त्याच्या कक्षेत फिरणारा हा अशनी थोडा जरी मार्ग चुकला असता तरी त्याला खेचून घेणारा मोठा ग्रह पृथ्वीच सर्वात जवळ होता.
या महापाषाणाचा आकार केवढा होता म्हणाल तर दुबईतल्या बुर्ज टॉवरपेक्षा मोठा! बुर्ज टॉवर ही ८३० मीटर उंचीची जगातली सर्वात उंच इमारत आहे. त्यापेक्षा अधिक उंचीच्या अशनीने पृथ्वीचा वेध घेतला असता तर? तो भरवस्तीत कोसळला असता तर अपरिमित जैविक हानी झाली असती आणि समुद्रात आदळला असता तरी जलचरांवर संक्रांत येऊन महाकाय त्सुनामी उसळून किनारपट्ट्यांवर हाहाकार उडाला असता. शिवाय या प्रचंड आघाताने निर्माण झालेलं धुळीचं वादळ पुढचे अनेक दिवस टिकून आपण दिवसाही सूर्यप्रकाशाला पारखे झालो असतो. त्याचा विपरीत परिणाम अर्थातच माणसांसह सर्व सजीव आणि वनस्तपतींवरही झाला असता. पृथ्वीच्या पृष्ठभागावरची भू-रचना कदाचित बिघडली असती.
…पण तसं काहीच घडलं नाही. आपला ग्रह आपल्यासह सुरक्षित आहे. तो तसाच सांभाळण्याची जबाबदारी मात्र आपली आहे. फक्त त्याची जाणीव माणूस नावाच्या प्राण्याला किती आहे याचं मोजमाप करता आलेलं नाही.