लोकशाहीवर जनशक्तीची जरब

  • वैजनाथ महाजन

लोकशाही शाबूत राहून ती वर्धिष्णु होत राहावी असे वाटत असेल तर सत्ताधाऱ्यांची डोकी ताळ्यावर राहण्याकरिता जाणिवांची जनशक्ती फार मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला हवी. अशा जाणिवांच्या सच्चा जनशक्तीची जरब सदैव लोकशाहीवर असायलाच हवी. सत्ताधाऱ्यांना आपण स्वयंभू नसून आम जनतेचे सेवक आहोत हे पदोपदी जाणवून देण्याकरिता या जनशक्तीचा उपयोग होतो. लोकशाही म्हणजे फक्त डोकी मोजण्याचा व्यवहार नव्हे. तर ती डोकी जनतेच्या भल्याकरिता ताळयावर असणे गरजेचे असते.

लोकशाही आणि लोकतंत्र हे आज सार्वत्रिक परवलीचे शब्द झालेले असले तरी अशा लोकशाहीकरिता विविध राष्ट्रांतील अगणित महापुरुषांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले आहे पुन्हा सांगावा लागलेला आहे. याचाच अर्थ लोकशाही राज्यप्रणाली विकसित करण्याकरिता तसे लोकमानस घडविणे आणि घडविलेल्या लोकमानसाला त्यात सर्वार्थाने सहभागी करून घेणे आवश्यक काम आहे. हेच जिकिरीचे काम. अशा महापुरुषांना वेळोवेळी करावे लागलेले आहे. आभाळ फाटले तर ते पुन्हा कसे सांधायचे हा प्रश्न जितका मुश्कील तशीच लोकशाहीची घडी एकदा विस्कटली की ती पुन्हा नव्याने कशी बसवायची हा प्रश्नदेखील पण तितकाच मुश्कील. याकरिता लोकशाहीत फक्त लोकसंख्या आणि लोकमत यावर विसंबून राहता येत नाही. त्याकरिता तशा जाणिवा निर्माण कराव्या लागतात. अशा जबाबदार जाणिवांची जनशक्ती साकारणे आव्हानात्मक काम आहे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी अशी जबाबदार जनशक्ती प्रत्येक काळात निर्माण होणे गरजेचे असते. मानवी स्वभाव हा हक्क आणि जबाबदारी अशा दुहेरी वाटांनी सतत पुढे जाणारा असतो. अर्थात जबाबदारीपेक्षा हक्काकडेच मानवी स्वभावाचा नेहमी कल असतो हेदेखील खरेच. त्यामुळे हक्कांसाठी सततचे संघर्ष असा एक वेगळाच स्थायिभाव लोकशाहीत तयार होतो आणि त्याचा पाठपुरावाही लोकमानसाला भाकड वाटू लागतात. प्रसंगी ती अडगळीत फेकली जातात. आपल्या लोकशाहीतदेखील असे यापूर्वी अनेकदा घडलेले आहे. सामान्य माणूसच जेव्हा आपली जाणीव व जागृती अशी प्रकट करतो याला लोकशाहीत असाधारण असे महत्त्व आहे हे लक्षात घ्यायला हवे. नाही म्हटले तरी आपले प्रजासत्ताक निर्माण होऊन आता किमान सहा दशकांचा कालखंड लोटला आहे. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात एवढा कालखंड हा तसा अगदीच नगण्य मानण्याचे कारण नाही. तरी पण एवढय़ा काळात आपण अद्याप अनेक मूलभूत अशा बाबींकडे म्हणावे तितके लक्ष देऊ शकलेलो नाही हे कटू वास्तव आहे. प्राथमिक शिक्षणाचा हक्क घटनेत तरतूद होऊन मान्य झाला असला तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत असताना कित्येक खेडी, कित्येक वस्त्या आणि तेवढाच मुलूख आपल्याकडे तसाच ओसाड पडून राहिलेला आहे. असंख्य ठिकाणी शाळेसाठी कोवळ्या जिवांना पायपीट करावी लागत आहे. हीच बाब पिण्याकरिता शुद्ध पाणी उपलब्ध होण्याशी तितक्याच गांभीर्याने जोडली गेल्याचे दिसते. लोकशाहीने अन्न, वस्त्र, निवारा आणि याचबरोबर शिक्षण हेच प्रमाण मानून त्याकरिताच राजशकट हाकलले पाहिजे. पण देशाच्या अफाट लोकसंख्येत आपण याबाबत काही काटेकोरपणे, योजनाबद्धरीत्या करू शकलो आहोत असे ठामपणे म्हणता येईल असे काही वाटत नाही. वेळोवेळी अशा बाबतीत प्रसिद्ध होणारी आकडेवारी किती फसवी असते ते पण आपण अनुभवत असतो. अशा वेळी आपण जर लोकसंख्या हेच लोकशाहीचे बळ मानले तर तोच निकोप लोकशाहीसाठी अडसर ठरणार हे स्पष्ट आहे. यात कशा प्रकारे सकारात्मक परिवर्तन येऊ शकेल अथवा ते आणता येईल याचा वेळोवेळी विचार व्हायला हवा. अर्थात या दिशेने सकारात्मक आणि जाणीवपूर्वक पावले पडताना दिसत नाहीत. तेव्हा जाणिवांची जनशक्ती अशा प्रश्नांच्या मागे एकवटायला हवी. दुसरीकडे अशा जाणिवांच्या जनशक्तीतून जनमताचा जो रेटा निर्माण होत असतो तोसुद्धा सकारात्मक हवा. अनेकदा तो तात्पुरता उभा राहतो आणि हवेत विरून जात असतो. त्यामुळे लोकोपयोगी कामांसाठी बळ उभारणे काहीसे आव्हानात्मक होते. पुन्हा लोकशाही आली की लोकानुनय ओघानेच येतो. असा लोकानुनय खुर्च्या टिकविण्यास उपयुक्त असतो. म्हणून तो सत्ताधाऱ्यांकडून सतत केला जातो. तो अंतिमतः भल्याचा नसतो याकडे आपोआपच डोळेझाक होत राहते. लोकानुनय वेगळा आणि लोकांच्या भल्याचा निर्णय वेगळा. अशा काळात सत्ताधाऱयांना जर वेळ मारून नेण्याची सवय लागली तर त्यातून आणखी नवे नवे प्रश्न निर्माण होत असतात. लोकशाही राज्य प्रणालीचे एकूण प्रारूप हे असेच असते. त्याकरिता लोकशाही शाबूत राहून ती वर्धिष्णु होत राहावी असे वाटत असेल तर सत्ताधाऱयांची डोकी ताळ्यावर राहण्याकरिता जाणिवांची जनशक्ती फार मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला हवी. अशा जाणिवांच्या सच्चा जनशक्तीची जरब सदैव लोकशाहीवर असायलाच हवी. सत्ताधाऱ्यांना आपण स्वयंभू नसून आम जनतेचे सेवक आहोत हे पदोपदी जाणवून देण्याकरिता या जनशक्तीचा उपयोग होतो. अष्टावधानी भान विकसित झालेली जनशक्ती म्हणूनच गरजेची असते. लोकशाही म्हणजे फक्त डोकी मोजण्याचा व्यवहार नव्हे. तर ती डोकी जनतेच्या भल्याकरिता ताळ्यावर असणे गरजेचे असते. असे भान परिस्थितीतून येत असते आणि राजकीय पर्यावरणातून ते पुढे जात असते. म्हणून लक्षवेधी लोकशाही आणि प्रजासत्ताक यासाठी आपण सकारात्मक जाणिवांची जनशक्ती निर्माण व्हावी याकरिता कटिबद्ध असायला हवे.