मानवी तस्करी

790
  • ज्ञानेश्वर भि. गावडे

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय गुन्हे शोध खात्याच्या २०१६च्या अहवालानुसार मानवी तस्करीचे आठ हजारांहून अधिक गुन्हे घडल्याचे उजेडात आलेले आहे. १८२ विदेशी व्यक्तींसह २३०० जणांची सुटका करण्यात यश आले आहे. त्यापूर्वीच्या वर्षात २०१५ मध्ये ६८७७ गुन्हे अशा प्रकारात घडलेले आहेत. सोळा वर्षांच्या खालील वयोगटातील व्यक्तींचे अपहरण झाल्याची सर्वात जास्त नोंद आहे. प. बंगाल, आसाम, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली असा या गुन्ह्यात उतरता क्रम आहे. ही राज्ये सीमेवरील देशांशी सीमित आहेत म्हणून ही क्रमवारी. उरलेल्या राज्यांतही असे गुन्हे घडले असले तरी ते लक्षणीय नाहीत अशी पोलीस नोंद आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार मानवी तस्करी हा मोठा अपराध आहे. यामध्ये लहान मुले, मुली, स्त्रीया यांना पळवून नेणे याचे प्रमाण मोठे आहे. फूस, लालच, धमकी, मारझोड, भीती दाखविणे आदी प्रकाराद्वारे मानवी जिवांना पळवून नेण्यात येते. नंतर त्यांना विकण्यासाठी, भीक मागण्यासाठी, बाटवून आतंकी बनविण्यासाठी, लहान मुलांकडून निरनिराळे गुन्हे घडवून आणण्यासाठी हेरगिरी करण्यासाठी, चोरटी आयात-निर्यात करण्यासाठी, नशिल्या पदार्थांचा व्यापार उदीम करण्यासाठी, बळजबरीच्या अशा खोट्या धंद्यात पळवून आणलेल्या माणसांचा वापर केला जातो. सबंध जगातच असे बेकायदेशीर प्रकार घडत आहेत. त्याला हिंदुस्थानही अपवाद नाही. म्हणून प्रथम सामाजिक प्रबोधन आणि नंतर कडक उपाययोजना करून देशातील मानवी तस्करीचे प्रमाण आटोक्यात आणले गेले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या