अवकाशातील दौलत!

1

‘ती ही वरची देवाघरची दौलत लोक पाहत नाथा.’ असं गोविंदाग्रजांनी एका काव्यात म्हटलंय. रात्रीच्या ताऱ्यांनी चमचमत्या आकाशाचं ते वर्णन आहे. आता स्वच्छ आकाशाचा काळ सुरू झाला आहे. पुढच्या पावसाळ्यापर्यंत रात्रीचं आकाश निरभ्र असेल तेव्हा रोज रात्री एका वेळी सुमारे 3 हजार तारे आपण पाहू शकतो. रात्रभर जागरण केलं तर मावळते आणि उगवते तारे मिळून 6 हजार तारे न्याहळता येतात. आपल्या विश्वात खरं तर असंख्य तारे आहेत. एकेका दीर्घिकेत (गॅलॅक्सीमध्ये) कोटय़वधी तारे असतात. प्रभावशाली दुर्बिणीतून त्यातील अनेक दिसू शकतात. दूरस्थ तारकासमूह, तारकापुंज, जोडतारे, रंग बदलणारे रूपविकारी तारे असे कितीतरी प्रकारचे तारे न्याहाळण्याची संधी मिळते, पण नुसत्या डोळ्यांनी सहा हजार तारेच पाहता येतात.

आपल्या सूर्याच्या वस्तुमानाच्या 2.44 पट वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचं न्यूट्रॉन ताऱ्यात तर 3.4 सौर वस्तुमानाच्या ताऱ्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं. सर्वच तारे नेब्युला किंवा तेजोमेघातून जन्माला येतात. या तेजोमेघात हायड्रोजन, हिलियम आणि इतर जड धातूंची मूलद्रव्यं असतात. तेजोमेघाचे आकुंचन होताना हायड्रोजन वायू गाभ्यात एकवटतो. त्याचं तापमान 1.5 कोटी केल्विन (थोडय़ाफार फरकाने सेल्सिअस) झालं की, हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होऊ लागतं. तेजोमेघातील इतर जड मूलद्रव्य नंतर ग्रहनिर्मितीसाठी उपयोगी ठरतात. मात्र सूर्याच्या दहापट वस्तुमानाचा तारा असेल तर त्याच्या शेवटच्या काळात तो लाल राक्षसी तारा बनतो आणि त्यातून प्रचंड विस्फोट होऊन त्याचा सुपरनोव्हा किंवा अतिनवतारा तयार होतो. तारा सुपरनोव्हा बनण्याच्या क्षणीच त्यामध्ये सोनं, प्लॅटिनम असे मौल्यवान धातू तयार होतात. आपल्या पृथ्वीवर मिळणारे हे मौल्यवान धातू इथे तयार झालेले नाहीत. ते अवकाशातील ‘दौलती’तून प्राप्त झाले आहेत म्हणूनच त्यांचं पृथ्वीवरचं प्रमाण खूप कमी असून त्यांची किंमत जास्त आहे.

आपली सूर्यमाला तयार होण्याआधी एखाद्या ताऱ्याच्या सुपरनोव्हामधून ही मौल्यवान द्रव्यं अवकाशात विखुरली असतील आणि पृथ्वी तयार होतात त्यात समाविष्ट झाली असतील. थोडक्यात काय तर ताऱ्यांचे प्रचंड विस्फोट विश्वात मौल्यवान धातूंची बरसात करतात. गोविंदाग्रजांच्या त्याच कवितेत ‘आणीत होती माणिक मोती, परतून राजस रात नाथा’ असंही म्हटलंय ही कविकल्पना. माणिक-मोती नव्हे, पण अवकाशातून सोनं आणि प्लॅटिनमचा वर्षाव होतो खरा! ‘नासा’च्या तज्ञांच्या असं लक्षात आलंय की, दोन न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर होते तेव्हा त्यातून होणाऱ्या महाविस्फोटमधून जी मौल्यवान द्रव्य तयार होतात त्याची नोंद आता स्पेस टेलिस्कोप घेऊ शकतो. अशा ‘किलोनोव्हा’ विस्फोटातून (रेडिओ ऑक्टिव्ह फ्लॅशमधून) प्रचंड प्रमाणावर सोनं, रूपं (चांदी) आणि प्लॅटिनमचे कण तसंच युरेनियमही अवकाशात ‘शिंपडलं’ जातं! दोन तारे किंवा ब्लॅकहोल यांची टक्कर झाली की, निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय लहरींची गणिती संकल्पना आइन्स्टाइन यांनी 1916 मध्ये मांडली आणि बरोबर शंभर वर्षांनी ‘लेझर इंटरस्फेरॉमीटर ग्रॅव्हिटेशनलवेव्ह ऑब्झर्वेटरी’ किंवा संक्षिप्त रूपातील ‘लायगो’ प्रकल्पाने अशा गुरुत्वीय लहरींचा वेध 2016 मध्ये घेतला. 2002 मध्ये यासाठीच ‘लायगो’ प्रकल्प कार्यान्वित झाला होता.

सुमारे दीड कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या अतिघट्ट (सुपर डेन्सिटी असलेल्या) ताऱ्यांच्या टक्करीतून जा प्रचंड ऊर्जेची घुसळण झाली आणि जे तापमान तयार झालं त्यातून निघालेल्या गुरुत्वीय लहरी ‘लायगो’ला समजल्या. अशा ताऱ्यांच्या, कृष्णविवरांच्या टक्करी किंवा परस्परांचं ‘विलिनीकरण’ विराट विश्वात कुठे ना कुठे सतत होतच असतं आणि अशा महास्फोटांमधून सोन्या-चांदीसारखी मौल्यवान द्रव्यं अवकाशात भिरकावली जातात. ‘तारे’च ही द्रव्यं त्यांच्या विशिष्ट रूपात निर्माण करतात. सोनं, रूपं, प्लॅटिनमचं काय, एखाद्या ताऱ्याचं स्वरूप हिऱ्यासारखं असू शकतं. सेन्टॉरस किंवा नरतुरंग तारकासमूहामधला ‘ल्युसी’ नावाचा खुजा तारा म्हणजे एक महाकाय हिराचं आहे असा शास्त्र्ाज्ञांचा दावा आहे. या ताऱ्याचा गाभा चक्क स्फटिक झालेल्या प्रचंड आकाशाच्या हिऱ्याचा आहे. त्याच्यापुढे पृथ्वीवरचे कोहिनूरसारखे हिरे काहीच नव्हेत. सध्या दिवाळीच्या दिवसात कालच ‘लक्ष्मीपूजन’ करताना अनेकांनी सोन्या-चांदीच्या, हिऱ्याच्या दागिन्यांची आठवण ठेवली असेल. ही मौल्यवान द्रव्य विराट विश्वातील घडामोडींनी पृथ्वीवासीयांना दिली आहेत हे वैज्ञानिक सत्य या निमित्ताने जाणून घ्यायला हरकत नाही.