झव्हेरी बाजारातील सुवर्णकारांना देशोधडीला लावू नका!

  • रवींद्र गावणकर

महाराष्ट्र सरकारने जव्हेरी बाजार परिसरातील हजारो सुवर्णकारांना स्थलांतरित करण्याचा आदेश दिला आहे. सरकारच्या या आदेशामुळे खळबळ उडाली असून त्या परिसरातील सुवर्णकारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घोषणेचे परिणाम किती घातक असू शकतील याचा विचार शासनासह संबंधितांनी अद्याप केलेला दिसत नाही. या निर्णयाची अंमलबजावणी खरंच झाली तर जव्हेरी बाजार परिसरातील हजारो सुवर्णकार देशोधडीला लागतील.

मुंबईचा झव्हेरी बाजार देशातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून नावारूपाला आलेल्या झव्हेरी बाजार आणि त्यांच्या आसपासच्या भागात म्हणजे विठ्ठलवाडी, तेलगल्ली, काळबादेवी, भुलेश्वर, भोईवाडा ते अगदी फणसवाडी-ठाकूरद्वार, गिरगाव परिसरात विविध भाषिक सुवर्णकार पिढ्यान्पिढ्या सुवर्णकारीचा व्यवसाय करत आहेत. जव्हेरी बाजारातील मोठ्या पेढ्या तसेच महाराष्ट्र-गुजरातच्या शहर-गावातून जव्हेरी बाजारात खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या सराफ मंडळींचे दागिने घडविण्याचे काम या परिसरातील मंडळी करत असतात. जव्हेरी बाजारच्या आधारानेच या कारागिरांचा पोटापाण्याचा व्यवसाय चालतो. त्यांच्या कुटुंबीयांचे पालनपोषण होते. सुवर्ण नियंत्रण कायद्यासारखी तसेच तेजी-मंदीची अनेक संकटे झेलत ही मडळी वर्षानुवर्षे या भागात टिकून आहेत.

झव्हेरी बाजार परिसरातील सुवर्णकारांसमोर सध्या फार मोठे संकट उभे ठाकले आहे. ८ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जव्हेरी बाजार परिसरातील हजारो सुवर्णकारांना स्थलांतरित करण्याचा आदेश दिला. सुवर्णकार संघटनांच्या एकता दिनी म्हणजेच ९ जानेवारी रोजी ही बातमी वृत्तपत्रांनी ठळकपणे छापली. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे खळबळ उडाली असून त्या परिसरातील सुवर्णकारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे परिणाम किती घातक असू शकतील याचा विचार शासनासह संबंधितांनी अद्याप केलेला दिसत नाही. या निर्णयाची अंमलबजावणी खरंच झाली तर जव्हेरी बाजार परिसरातील हजारो सुवर्णकार देशोधडीला लागतील. शासनाने त्यांच्यासाठी मुंबईबाहेर एखाद्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये सुवर्णकारांचा व्यवसाय करण्यासाठी जागा दिल्या तरी जव्हेरी बाजारापासून दूरवर कोण दागिने घडविण्यासाठी जाणार? शासन यंत्रणा त्यांना काम पुरविण्याची जबाबदारी घेईल का? अर्थातच हे व्यवसाय घरात बसणारे नाहीच. मग या सुवर्णकारांनी करायचे काय, याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे.

काही वर्षांपूर्वी या भागातील एका सुवर्णकाराच्या दुकानात रात्रीच्या वेळी आग लागली होती. त्याआधी किंवा त्यानंतरही असेल, आगीच्या अशाच एक-दोन घटना घडल्या होत्या असे म्हणतात, परंतु या घटना मोठय़ा प्रमाणात नव्हत्या. मनुष्यहानी झाली नाही. अर्थात आग म्हटली की ती धोकादायक किंवा जीवघेणी असतेच हे मान्य करायला हवे, परंतु आगीच्या घटना संपूर्ण मुंबई शहरात, विविध कारखान्यात, हॉस्पिटलमध्ये, नागरी वस्तीत ते अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही घडतात. अगदी मंत्रालयदेखील यातून सुटलेले नाही. आग लागू नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. नव्हे प्रत्येक नागरिकाचे ते आद्य कर्तव्यच आहे. आगीचे कारण शोधून त्या त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना केली जाते. ते हॉटेल, तो कारखाना, त्या इमारतीमधील राहते घर यांना त्या जागेवरून हटविण्याचा आततायीपणाचा निर्णय शासन घेऊ शकत नाही.

झव्हेरी बाजार परिसरातील सुवर्णकारांना तेथून हुसकावून लावण्याचे आणखी एक कारण पुढे केले जात आहे. ते म्हणजे प्रत्येक सोनाराच्या दुकानात कोळशाच्या जळत्या भट्टय़ा असतात, तेथे मोठय़ा प्रमाणात मेण, ऑसिड, गॅस बॉटल असतात. दागिने, सोने वितळविताना, दागिने घडवताना आणि ते पॉलिश करताना ऑसिडचा वापर केला जातो. या सर्व गोष्टी ज्वालाग्रही आणि मानवी आरोग्यास घातक असल्याचा दावा करून मनुष्य वस्तीत असलेले अलंकारनिर्मितीचे हे उद्योग या परिसरातून तत्काळ बंद करणे, अशी मागणी काळबादेवी परिसरातील एक रहिवासी हरकिसनदास गोरडिया यांनी केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेत झव्हेरी बाजार, काळबादेवी, भुलेश्वर ते अगदी ठाकूरद्वार-गिरगाव परिसरातील दागिने घडविणाऱ्या कारखान्याचे तत्काळ स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीत दागिने घडविणारे कारखाने असा उल्लेख बहुदा मुद्दामच केला गेला आहे. या परिसरातील एकटादुकटा सुवर्णकार किंवा बऱ्याच इमारतींमधील लहान-लहान खोल्यांमध्ये पाच-दहा अशा संख्येने सुवर्णकार आपापला व्यवसाय स्वतंत्रपणे करत असतात. याला कारखाने म्हणून संबोधणे निश्चितच चुकीचे आहे. हिंदुस्थानात सुवर्ण कारागीर हा शतकानुशतके, पिढ्यान्पिढ्या चालत आलेला हस्त व्यवसाय आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेला हा व्यवसाय फार पूर्वीपासून स्वतःच्या घरी बसूनच केला जात असे. शहरीकरणामुळे अनेक व्यवसाय शहराच्या एका ठराविक भागात एकवटले. मुंबईचा झव्हेरी बाजारही ब्रिटिशांच्या काळात दीडशे वर्षांपूर्वी आला आहे. त्या ठिकाणी म्हणजे मुंबादेवी मंदिराच्या परिसरात निर्माण झाला आणि त्यावर अवलंबून हजारो सुवर्णकार या परिसरात मिळेल त्या जागेत बसून आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका करू लागले.

कालानुसार या भागात हा व्यवसाय अधिक भरभराटीस आला आणि सुवर्णकारांची संख्या वाढत गेली. सुवर्ण व्यवसायाबरोबरच या ठिकाणी कापड मार्केट आणि त्याला पूरक असे अनेक व्यवसाय आणि गोडाऊन्स या भागातील चाळीचाळीतून पाहावयास मिळतात. स्टील व प्लॅस्टिकच्या भांड्याकुंड्यांची शेकडो दुकाने व त्यांना पूरक गोडाऊन्स व इतर व्यवसायदेखील दाटीवाटीने येथे एकवटले आहेत. मात्र फक्त सुवर्ण अलंकार घडविणाऱ्या कारागिरांच्या छोट्या व्यवसायामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो असा दावा सरकार करत आहे. पिढ्यान्पिढ्या या भागात सुवर्ण अलंकार घडविले जात आहेत आणि या भागात नागरी वस्तीही पिढ्यान्पिढ्या आहे. या कालखंडात येथील सुवर्ण कारागिरांना, येथील नागरिकांना सुवर्णकार वापरत असलेल्या ऑसिडसारख्या किंवा अन्य वस्तूंमुळे कसले धोकादायक आजार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आजवर कधी आले आहे का?

सुवर्ण कारागिरीचा व्यवसाय ही हस्तकला आहे, कुटिरोद्योग आहे आणि त्यास केंद्र सरकारचीही मान्यता आहे. स्वतःच्या घरात किंवा छोट्याशा जागेत केल्या जाणाऱ्या या व्यवसायाला मुंबई महापालिकेसह सर्वच शहर-गावात गुमास्तासह आवश्यक ते परवाने आजवर वर्षानुवर्षे देण्यात येतात. मग आताच हा व्यवसाय शासन बेकायदा कसा ठरवत आहे. जव्हेरी बाजार, भुलेश्वरसह संपूर्ण सी-वॉर्डमध्ये दोन लाख सुवर्णकार व्यवसाय करतात असे एका वृत्तपत्रातील बातमीमध्ये म्हटले आहे. या सर्व कारागिरांना स्थलांतरित (परागंदा नव्हे) करणे शासनाला तरी शक्य आहे का? हे कारागीर कोणी परदेशातून आले नाहीत तर याच देशाचे नागरिक आहेत. त्यात असंख्य मराठी बांधव आहेत. इतर देखील आहेत. आपल्याच लोकांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा अधिकार शासनाला कोणी दिला.

जर शासन जव्हेरी बाजार परिसरातील हजारो सुवर्णकारांवर अन्याय करणार असेल तर सुवर्णकार संघटना स्वस्थ बसणार नाही हे निश्चित. महाराष्ट्र शासनाने सुवर्णकारांच्या स्थलांतराचा निर्णय मागे घ्यावा.

(लेखक ‘दैवज्ञ संदेश’ या मासिकाचे संपादक आहेत.)