गंगाप्रसाद अग्रवाल आणि प्रा. अजित दळवी

  • प्रशांत गौतम

गंगाप्रसाद अग्रवाल

महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने या वर्षी मराठवाड्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी, ज्येष्ठ सर्वोदयी नेते गंगाप्रसादजी अग्रवाल यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. वसमत येथील गंगाप्रसाद अग्रवाल हे मराठवाड्याचे गांधी म्हणून प्रसिद्ध आहेत. १ जानेवारी रोजी त्यांनी ९६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हैदराबाद संस्थान मुक्तीनंतर अल्पकाळ त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम केले. नंतर पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी जागृत नागरिकांचा नागरिक संघ स्थापन केला व नगर परिषदेची निवडणूक बहुमताने जिंकली. वसमत नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून अडीच वर्षे काम केले. त्या काळात संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोरात होता. नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते उतरले. राष्ट्रसेवा दलाचे कार्य करीत असताना गंगाप्रसादजींनी मराठवाडा पातळीवर तरुणांच्या संघटनांची बांधणी केली. मराठवाडा राष्ट्र सेवादलाचे पहिले शिबीर तालुक्यातील भोरीपगाव येथे आयोजित केले. तेथे त्यांनी श्रमदानातून दलितांना पाण्यासाठी विहीर खुली केली. आचार्य विनोबा भावे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्याने त्यांनी १९५८च्या सुमारास विनोबांसोबत भूदान पदयात्रा आणि महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात १४५ दिवसांचे साखळी उपोषण केले. आणीबाणीच्या काळात लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतिविचारांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी १९ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. गंगाप्रसादजींचे संपूर्ण आयुष्यच गांधी-विनोबांच्या सर्वोदय विचाराला समर्पित करणारे आहे. वाणी, लेखणीच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून त्यांनी गांधी-विनोबांच्या विचारांचा प्रचार केला. आजही ९६ व्या वर्षी ते या विचारांवर ठाम आहेत. महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे मुखपत्र असलेल्या ‘साम्ययोग’ या संपादक मंडळाचे त्यांनी अनेक वर्षे काम केले. ग्रामस्वराज्याची संकल्पना स्वीकारून सजीव शेती, खादी आणि ग्रामोद्योगाचा पुरस्कार केला. ‘पद्मविभूषण’ गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे मराठवाडा पाणी परिषदेचे आयोजन व मराठवाडा विकास आंदोलनात सहभाग घेतला. वर्धा येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान येथे गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. गंगाप्रसादजींना नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे डी.लिट. देऊन सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आता महाराष्ट्र फाऊंडेशनच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांचे कार्य अधोरेखित झाले आहे.

प्रा. अजित दळवी
महाराष्ट्र फाऊंडेशनच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव केला जातो. यंदाचा हा सन्मान संभाजीनगरातील प्रख्यात नाट्यलेखक प्रा. अजित दळवी यांचा ‘समाजस्वास्थ्य’ या नाटय़लेखनाच्या पुरस्काराने गौरव झाला आहे. पुरस्काराचा वितरण समारंभ पुण्यात १३ जानेवारीला होणार आहे. संभाजीनगरातील वसंतराव नाईक महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते प्रदीर्घ काळ अध्यापन क्षेत्रात होते. समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि नाट्यलेखनाची आवड या दोन्ही बाबींमुळे मराठी रंगभूमीवर त्यांनी आपल्या नाट्यलेखनाचा ठसा उमटवला. शालेय जीवनापासून नाट्यक्षेत्राविषयी त्यांना विलक्षण आकर्षण होते. अभिनय आणि दिग्दर्शनात स्वतःची एक दृष्टी होती. एवढेच नव्हे तर रंगभूमीवर स्वतःच एक अस्तित्व त्यांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यलेखनाने निर्माण केले. ‘शतखंड’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘गांधी विरुद्ध गांधी’ या त्यांच्या महत्त्वाच्या नाट्यलेखनाने मराठी रंगभूमीवर वेगळे स्थान निर्माण केले. त्याचप्रमाणे ‘मुक्तिधाम’, ‘लढा’, ‘आपल्या बापाचं काय जातं’, ‘संघर्ष’, ‘देहधून’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘बलरामाचे गाणे’, ‘कृष्णसखा’ ही त्यांची रंगभूमीवरील नाटके आली. प्रा. अजित दळवी यांचे महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’. वैद्यक क्षेत्रातील प्रवृत्ती-अपप्रवृत्तीवर प्रकाश टाकणारे हे नाट्यलेखन नाटकात कलावंतांनीही दमदारपणे सादर केले. त्याला राज्य पुरस्कारासह अनेक व्यावसायिक पुरस्कार लाभले. शतखंडच्या नाट्यलेखनासाठी राज्य पुरस्कार, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक म्हणून ‘नाट्यदर्पण’ पुरस्कार लाभला. प्रा. अजित दळवी यांचे आणखी एक महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘गांधी विरुद्ध गांधी’. रंगभूमीवर ताकदीच्या कलावंतांनी त्याचे उत्तम सादरीकरण केले. याही नाट्यलेखनास नाट्यदर्पण, अनंत काणेकर, कालनिर्णय, लायन्स क्लबचे पुरस्कार प्राप्त झाले. त्याचप्रमाणे ‘लढा’, ‘संघर्ष’, ‘आपल्या बापाचं काय जातं’, ‘बलरामाचं गाणं’ या नाटय़लेखनासही राज्य नाटय़स्पर्धेत लेखनाची अनेक पारितोषिके लाभली. लेखन आणि दिग्दर्शनात प्रा. दळवी यांचे वेगळेपण अधोरेखित झाले. ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ या नाटय़लेखनाचा हिंदी, गुजरातीत अनुवाद झाला तर ‘गांधी विरुद्ध गांधी’ या नाटकाचा हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजीत अनुवाद झाला. त्याचे प्रयोग अमेरिका आणि कर्नाटकातही झाले. महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराने प्रा. दळवी यांच्या नाट्यलेखन क्षेत्रातील योगदानाची नोंद घेतली.