अॅड. मधुकर किंमतकर

  • महेश उपदेव

विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाची जाणीव जनतेला व लोकप्रतिनिधींना करून देणारे विदर्भ अनुशेषाचे गाढे अभ्यासक, काँगेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अॅड. मधुकर उपाख्य मामा किंमतकर यांच्या निधनामुळे विदर्भाच्या विकासासाठी झटणारा मार्गदर्शक विदर्भवासीयांनी गमावला आहे. मामा किंमतकर यांचा विदर्भाच्या अनुषेशाबाबत गाढा अभ्यास होता. सिंचनाचा अनुशेष सरकारने भरून काढला तर विदर्भ सुजलाम् सुफलाम् होईल. यासाठी ते सरकारशी सतत लढत होते. विदर्भाचा विकास होत नाही हे पाहून त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. परंतु त्यामागे विकास हाच विचार होता. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयात बसून विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते सतत अभ्यास करीत. कोणत्याही परिस्थितीत विदर्भावर अन्याय होऊ नये याकरिता ते राज्यपाल कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत होते. सत्तेत असताना मामा किंमतकर यांनी स्वतःच्या सरकारविरुद्धही अनेकदा आवाज उठवला. वैधानिक मंडळाची स्थापना झाल्यानंतर त्यांची तज्ञ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. विदर्भाचा अनुशेष दूर करणे आणि रामटेकचा विकास हा त्यांचा अखेरपर्यंतचा ध्यास होता. गेल्या आठवड्यात ‘मामा’ना ‘रामटेक भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. १९८२ मध्ये त्यांनी बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद भूषवले होते. त्यांच्याकडे वित्त व नियोजन, कामगार आणि विधी व न्याय विभाग होता. विदर्भ, मराठवाडा, कोकणावर होणारा अन्याय यावर ते विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला चांगलेच धारेवर धरायचे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत सिंचन, उच्च शिक्षण, रस्ते, पूल, महाविद्यालये, दवाखाने व कर्मचाऱ्यांचा अनुशेष होता. या अनुशेषामुळे विदर्भाचा विकास होण्यात अडचणी येत होत्या. कृषीपंपाचा अनुशेष दाखवून सरकारचे डोळे उघडण्याचे काम मामा यांनी केले. त्यानंतर सरकारला जाग आली. राज्यातील शिवसेना-भाजप युती सरकारने मामा किंमतकर यांनी केलेल्या सूचनांचे पालन करून कृषीपंपाचा अनुशेष भरून काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विदर्भाच्या अनुशेषावर बोलण्यासाठी मधुकर किंमतकर यांनी विदर्भाच्या आमदारांचा एक गट तयार केला होता. यात बी. टी. देशमुख, नानाभाऊ एंबडवार, वामनराव चटप, सरोज काशीकर यांचा समावेश होता. एवढेच नाही तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते आमदारांची कार्यशाळा घ्यायचे. विदर्भाच्या विकासाकरिता व अनुशेष भरून काढण्यासाठी प्रत्येक आमदारांनी विधिमंडळाच्या सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करायचे याबाबत ते मार्गदर्शन करायचे. जेणेकरून सरकारकडून विदर्भाच्या पारड्यात विकासाकरिता निधी खेचून आणण्यावर त्यांचा भर होता. विदर्भाचा विकास व्हावा व अनुशेष भरून काढण्यासाठी पत्रकारांनीदेखील आपल्या वृत्तपत्रातून कोणते मुद्दे उपस्थित करायचे, यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकारांचा गटही त्यांनी तयार केला होता. अधिवेशनाच्या पाच दिवसांपूर्वी पत्रकार मित्रांना वैधानिक विकास मंडळाच्या कार्यालयात बोलावून ते आकडेवारीसह माहिती द्यायचे. त्यांचा एकमेव उद्देश होता की, कोणत्याही परिस्थितीत विदर्भाचा विकास व्हावा. विदर्भात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सिंचन प्रकल्प आवश्यक आहे आणि त्यामुळेच सिंचनाच्या अनुशेषाबाबत ते सतत चिंतित होते. सरकारने सिंचन प्रकल्प त्वरित बांधून दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकतात असा त्यांना ठाम विश्वास होता. १९८०-८५ या आमदारकीच्या काळात विधिमंडळात विदर्भाच्या बॅकलॉगचा आवाज मामांनी बुलंद केला होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदार किंमतकर बोलायला उभे झाले की, ‘बॅकलॉग आमदार आले’ अशी टिपणी करायचे. पण त्यांनी त्यांच्याकडे कधी लक्ष दिले नाही. ते आपला मुद्दा जोरकस मांडत असत. माजी पंतप्रधान नरसिंहराव व माजी राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. अनुशेषाच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी अनुशेष निर्देशांक समिती स्थापन करून घेतली होती. त्यात राज्यपालांना निधीवाटपाचे अधिकार देण्यात आले होते. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विरोधक असताना ‘मामां’कडून माहिती घेऊन सरकारला धारेवर धरायचे हे विसरता येणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर निधीवाटपात विदर्भावर कसा अन्याय झाला आहे हे किंमतकर बारीकसारीक आकडेवारीनुसार सांगायचे. मामा किंमतकर हे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने वैदर्भीय अनुशेषाचा गाढा अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेला आहे.