वसंतराव डावखरे

  • राजेश पोवळे

हजारो लोकांमध्ये एखादंच व्यक्तिमत्त्व असं असतं की जे त्याच्या गुणांमुळे हृदयाला भिडतं. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन धडाडी आणि आत्मविश्वासाच्या बळावर राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे वसंत डावखरे म्हणजे माणुसकी जपणारं असंच एक मैत्रबन होतं. राजकारणातील हेवेदावे, वैरभाव दूर ठेवून सर्व पक्षांतील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी मैत्रीची घट्ट नाळ या नेत्याने बांधली आणि अखेरपर्यंत जपली. त्यांच्या निधनाने राजकारणातील मैत्री जपणारा वसंत हरपला आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी संघर्ष करावा लागलेल्या वसंतरावांच्या यशाची कमान जिद्द आणि चिकाटीमुळे वर चढत गेली. शिक्षणाशिवाय आणि संघर्षाशिवाय तरणोपाय नाही हा मंत्र त्यांनी अंगी बाणवला. सकाळी घरोघरी वृत्तपत्र टाकण्यापासून दुधाच्या बाटल्या पोहोचविण्यापर्यंत सगळी कामे त्यांनी केली. त्यातून साठवलेल्या पैशातून शिक्षण घेतले. आई सरूबाई ठाणे स्टेशनजवळील अशोक टॉकीज येथे भाजी विकत असत. त्यांच्या भाजीच्या पाट्या उचलण्याचे कामही ते करत. वसंत डावखरे यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले ते माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मानसपुत्र म्हणून. डावखरे यांनी काही काळ बाळासाहेब देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिले. नियम आणि कायद्याचा आदर राखून प्रसंगी थोडी लवचीकता दाखवून गरीबांची कामे तडीस नेणे हा देसाई यांचा मंत्र डावखरे यांनी आत्मसात केला आणि हिवरे गावचे सरपंच म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा केला. १९८६ मध्ये ठाणे महापालिकेत नगरसेवक झाल्यानंतर पुढच्याच वर्षी ८७ मध्ये ते ठाण्याचे पहिल्यांदा महापौर झाले. शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार वीणा भाटीया यांचा केवळ एका मताने पराभव त्यांनी केला होता. महापौर झाल्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. बाळासाहेबांनीही ती तत्काळ दिली. त्या दिवसापासून एखाद्या मंदिरात भाविकाने श्रद्धेने जावे तसे वसंतराव मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुखांना नेहमी भेटत. स्वतःच्या प्रत्येक वाढदिवशी आणि दर गुरुपौर्णिमेला ते मातोश्रीवर जाऊन शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद घेत. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम, विश्वास व घट्ट नाते वसंत डावखरे यांना लाभले होते. सरपंच, नगरसेवक, महापौर, आमदार आणि सलग १८ वर्षे विधान परिषदेचे उपसभापती म्हणून कर्तृत्वाची मोहोर त्यांनी उमटवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू, अशी त्यांची ओळख होती. अर्थात सर्व पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांना डावखरे आपले वाटत. एखाद्या मस्तीखोर मुलांच्या वर्गात आवडीच्या शिक्षकाने यावे तसाच आनंद विधान परिषद सदस्यांना डावखरे सभागृहात आल्यावर व्हायचा. सभागृहाच्या कामकाजात अटीतटीचे मुद्दे येत, वातावरण तापत असे. पण वसंत डावखरे हा त्यावरच्या उपायासाठी परवलीचा शब्द होता. मार्मिक, पण खुसखुशीत टिप्पणी करून ते हास्याची लहर निर्माण करीत. सभागृहातील तणाव कमी करण्याचे त्यांचे कसब विलक्षण होते. ते पीठासनावर विराजमान झाले की, सदस्यांकडून नियमांचे पालन करून घेतानाच प्रत्येक मुद्दा हातावेगळा करण्याची हातोटी त्यांना लाभली होती. गोरगरीबांचे जिव्हाळ्याचे प्रश्न असले की न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा आटापिटा सभागृहात पाहायला मिळे. ठाणे जिल्ह्यातील कोणत्याही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विधान परिषदेत कोणत्याही कामासाठी जाण्याकरिता वसंतराव म्हणजे थेट ‘अॅक्सेस’ होता. ठाणे जिह्यातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. पक्ष वेगळे असले तरी शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि वसंत डावखरे यांची मैत्री जगजाहीर होती. आनंद दिघे म्हणजे एडी आणि वसंत डावखरे म्हणजे व्हीडी अशी एडी-व्हीडीची मैत्री पक्षीय संघर्षातही कधी तुटली नाही. मी पदाने नसलो तरी मनाने शिवसैनिकच आहे असे वसंतराव जाहीरपणे सांगत. कृतज्ञता, मित्रप्रेम, गरीबांविषयी कळवळा, धडाडीने व आत्मविश्वासाने निर्णय घेण्याची क्षमता, नवनवे उपक्रम कल्पकतेने अमलात आणण्याची कार्यक्षमता, पक्षीय राजकारण टाळून अन्य पक्षातील मित्र जमविणे, गप्पांचे फड रंगवताना चांगले पदार्थ बनवून खाऊ-पिऊ घालणे, मैत्रीला जागणे, साहित्य, संस्कृती, कला, क्रीडाप्रेम इत्यादी असंख्य गुणांची महिरप डावखरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर होती.
कित्येकदा मांडलेले, कित्येकदा विस्कटते
नवे डाव मांडता मांडता, हातून बरेच काही निसटते…
जे मिळविले ते आपुले, जे हरवले ते नियतीचे
उरले सुरले घेऊन तारे, आकाश आपले सजवायचे..
कधी न थकता कधी न थांबता, पुढे पुढेच जात रहायचे…
उपसभापती असताना त्यांनी एका कार्यक्रमात जीवनाचे सार मांडताना ही कविता उत्स्फूर्तपणे सादर केली होती. न थकणारा, न थांबणारा हा उत्साहाचा वसंत आता अखेरच्या प्रवासाला निघून गेला आहे… कधीही न परतण्यासाठी…