सोनाली गावडे

  • प्रशांत गौतम

या वर्षीचे राज्य पुरस्कार नुकतेच घोषित झाले. तीस-पस्तीस मानकऱ्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सावे या छोट्या गावातील शाळकरी विद्यार्थिनी सोनाली गावडे हिने लिहिलेल्या ‘माझी दैनंदिनी’ या पुस्तकाचा समावेश झाला. राज्य पुरस्कारप्राप्त सर्व मानकरी सारस्वतांचे अभिनंदन तर आहेच. त्यात सोनालीसारख्या आडवळणाच्या गावात शिकणाऱ्या मुलीच्या पुस्तकास ना. धों. ताम्हणकर यांच्या नावाचा राज्य पुरस्कार लाभला. त्यासाठी या चिमुरड्या बालमैत्रिणीचेही विशेष अभिनंदन आणि कौतुक.

ज्या दिवशी राज्य पुरस्कार घोषित झाले त्या दिवशी सोनाली संभाजीनगर शहरात होती. राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि वरद गणेश वाचनालय आयोजित बालसाहित्य संमेलनात छोट्या बच्चे कंपनीने तिची प्रगट मुलाखत घेतली. दुसऱ्या दिवशी प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या शिवार प्रतिष्ठानच्या पहिल्या संदीप दळवी पुरस्काराचे वितरण सोनालीच्या ‘माझी दैनंदिनी’ या पुस्तकास झाले होते. त्याहीवेळी तिची प्रगट मुलाखत रंगली. शिवाय पुरस्कार वितरणाच्या दिवशी राज्य पुरस्काराची घोषणा झाल्याने या छोट्या लेखिकेचे ‘माझी दैनंदिनी’ हे पुस्तक अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरले. खरे तर आज दैनंदिनी लिहिणे हा वाङ्मय प्रकार जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा काळात सोनालीने आपल्या शैलीदार लेखनाने या वाङ्मय प्रकारास नवी उभारी देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. यानिमित्ताने सोनालीची ‘माझी दैनंदिनी’ वाचून सोलापूर जिल्ह्यातील सावेगाव, गावातील माणसे, सोनालीची शाळा, शाळेतील शिक्षक, तिची मित्र-मैत्रीण मंडळीही प्रकाशझोतात आली. तिच्या लेखनात लालित्य आणि अस्सलपणा हा मूळ गाभा असल्याने पुस्तक वाचनाचा वेगळा आनंद वाचकांना नक्कीच मिळू शकतो.

सोनालीचे शाळेतील जीवन अभ्यास, लगोरी ग्रुप, खेळ, मैत्रिणी यांनी समृद्ध झाले आहे. विद्यार्थी- विद्यार्थिनींमधील नातेसंबंध विलक्षण आत्मीय आहेत. एवढेच नव्हे तर शाळेतील शिक्षकांनी त्यांना शिस्त आणि वाचनाचे संस्कार दिले आहेत. अशा वातावरणात सोनाली अभ्यास करते. तिच्यातील उपजत लेखन गुण अशोक जगताप ओळखतात आणि तिला ‘माझी दैनंदिनी’ लिहिण्यासाठी प्रेरणा देतात. फापटपसारा टाळून शैलीदार आणि उत्तम असे लिहावे याचा परिपाठ नामदेव माळी यांनी घालून दिला. प्राथमिक लेखन तपासून पुस्तकाची पाठराखणही केली. चार शब्द कागदावर उतरवण्यासाठी आणि नंतर दोन-चार पुरस्कार मानसन्मान, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी यातील काहीही होत नाही. बालवयात केलेल्या लेखनात या शिक्षकांनी अस्सल लालित्यपूर्ण शैलीचे अंतरंग शोधले. सोनाली सातवीमध्ये असताना म्हणजे ९ मार्च २०१५ ते ५ एप्रिल २०१६ या अलीकडच्या काळात तिच्या दैनंदिनीचे लेखन झाले. ८ जून २०१६ रोजी सोनालीचे ‘माझी दैनंदिनी’ सांगलीच्या सृजन प्रकाशनाने प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित झाल्यावर १० हजारांची पहिली आवृत्ती हातोहात संपली. नंतर पुन्हा दहा हजार प्रतींची आवृत्ती वाचकांच्या भेटीला आली.

वाचन संस्कार अथवा लेखनाचा घरात कोणताही वारसा नसताना सोनालीने दैनंदिनीमधून किशोरवयीन मुलांचे चंचल भावविश्व वाचकांसमोर उलगडून दाखवले आहे. ग्रामीण भागातील तिचे हे अनुभव तर भन्नाटच आहेत. एवढेच नाही तर भाषेतील जिवंतपणा आढळून येतो. आज टी.व्ही., मोबाईल, सिनेमा, संगणकाचे युग आहे. त्या प्रसारमाध्यमांचा परिणाम या लेखन प्रकारावर झाला आणि या वाङ्मय प्रकाराची भाषाही वेगळीच बनून गेली. अनुभवाचे समृद्धपण, प्रवाहीपण सहजतेने अवतरले आहे. सोनालीच्या दैनंदिनीत वास्तव जीवन, रूढी, परंपरा, शाळा, मित्रमैत्रिणी, रुसवे-फुगवे अशा काही बाबी अत्यंत निरागसतेमधून आलेल्या आहेत. दैनंदिनीसारखे लेखन हे आत्मचरित्र प्रकारासारखेच असते. त्यात आत्मसंवाद असतो. आपणच आपल्याला घडविण्याची ही निर्मितीची प्रक्रिया असते. ‘माझी दैनंदिनी’ या पुस्तकात सोनालीने ग्रामीण मुलीचे भावविश्व, कौटुंबिक वातावरण यांचे मनोहारी दर्शन घडवले आहे. शेतकऱयांच्या घरातील वातावरण कसे असते, त्या वातावरणात मुली कसे काम करतात, असे कितीतरी धागेदोरे दैनंदिनीच्या पानापानात भेटतात. मराठी बालसाहित्यात सोनालीच्या या नव्या लेखनाने वेगळी पाऊलवाट निर्माण केली आहे. या वाचन, लेखन साहित्य प्रवासाची सुरुवातच राज्य पुरस्काराने दमदार होण्यास मदत झाली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.