बाबुराव सरनाईक

⦁ माधव डोळे

ध्याच्या डिजिटल युगामध्ये बाबुराव सरनाईक हे नाव फारसे कुणाला माहीत नाही, पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे ते एक प्रमुख साक्षीदार होते. एवढेच नव्हे तर आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ दैनिकाच्या कार्यालयातून विचारांच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या त्याचे सरनाईक हे प्रमुख साक्षीदार होते. ते मुख्य मुद्रित तपासनीस म्हणून काम करीत होते. त्या काळात ‘मराठा’ आणि आचार्य अत्रे यांच्या नावाचा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात दबदबा होता. अत्रे यांचे अनेक अग्रलेख, भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या बातम्या, अनेक स्फुट लेखन तसेच सदरांचे मुद्रित तपासण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले. त्यांनी केवळ मुद्रितशोधनाचे काम केले नाही तर १९५३ ते १९६० या काळात त्यांना आचार्य अत्र्यांचा जवळून सहवास लाभला. त्यांना अत्र्यांचा सहवास मिळावा हे जणू विधिलिखितच होते.

सरनाईक हे मूळचे विदर्भाचे. तेथील धामणगावच्या मारवाडी छात्रालयात ते शिकत होते. गॅदरिंगच्या निमित्ताने अत्रे यांच्या ‘मी उभा आहे’ या नाटकाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी व्यवस्थापकांनी बाबुरावांवर टाकली होती. पुढे नोकरीच्या शोधासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि १९५३ साली विठ्ठलभाई पटेल मार्गावरील ‘अत्रे प्रिंटिंग प्रेस’मध्ये ते दाखल झाले. त्याच प्रेसमध्ये नवोदित लेखकांसाठी ‘कथासृष्टी’ साप्ताहिकाचे टेबल कार्यालय होते. तेथे सरनाईक यांचा शिरकाव झाला आणि थोड्याच कालावधीत ते अत्रेमय झाले. पुढे ‘मराठा’मध्ये मुद्रित तपासनीस म्हणून ते रुजू झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या बहराचा तो काळ होता. अत्रे यांची वाणी आणि लेखणी अक्षरशः आग ओकत होती. त्यांची असंख्य व्याख्याने सरनाईक यांनी ऐकली आहेत. त्यांच्यावर अत्र्यांच्या लेखनाचा प्रभाव होणे साहजिकच होते. ‘साष्टांग नमस्कार’, ‘तो मी नव्हेच’ यांसारखी अनेक नाटके तसेच ‘ब्रह्मचारी’ ते ‘महात्मा फुले’ या चित्रपटांचे बाबुराव सरनाईक हे साक्षीदार होते. पुढे काळाच्या ओघात ‘मराठा’ बंद पडला तरी अत्रे साहेबांच्या विचारांचे तसेच लेखनाचे गारुड त्यांच्यावर शेवटपर्यंत कायम होते.

स्वातंत्र्योत्तर तसेच त्यानंतरचा प्रदीर्घ कालखंड सरनाईक यांनी अुनभवला. अत्र्यांच्या लेखनाची शैली, त्यांचे विनोद, परखडपणा तसेच राजकीय डावपेच आणि वक्तृत्व शैली याचे संस्कार सरनाईक यांच्या लेखणीवर झाले. त्यामुळेच त्यांनी पाच पुस्तके लिहिली. आईच्या वात्सल्याची महती सांगणाऱ्या त्यांच्या ‘अमृतकुंभ’ या पुस्तकाला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘कोरांटीची फुले’ तसेच ‘ज्योतिष शास्त्र : एक दिव्य दृष्टी’, ‘स्वप्न साक्षात्कार’ ही त्यांची पुस्तकेही तेवढीच गाजली. त्यांचे मराठी साहित्यातील सर्वात मोठे योगदान म्हणजे आचार्य अत्रे यांच्या जीवनप्रवासावर लिहिलेले ‘तो एक सूर्य होता’ हे पुस्तक. ‘मराठा’मधील अनेक अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिले असून अत्रे समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग होतो. आजही अनेक पत्रकार या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करतात. साहित्य व पत्रकारितेत प्रदीर्घ काम करूनही ते स्वतः प्रसिद्धीपासून दूर होते. विशेष म्हणजे अखेरपर्यंत त्यांना चष्मा नव्हता. त्यांची स्मरणशक्तीदेखील तल्लख होती. त्यांचे सर्व घराणेच राजकारणात असूनही बाबूजींनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याचे संपूर्ण जीवनच आदर्शव्रत होते. वयाच्या ९८व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांचे लेखन सर्वांनाच प्रेरणा देणारे ठरणार आहे. अखेरपर्यंत अत्रे नावाचा मंत्र जपणारे बाबुराव स्वर्गातदेखील तोच मंत्र जपतील याची खात्री आहे.