पं. नारायणराव बोडस / पं. नारायणराव जोशी

पं. नारायणराव बोडस / पं. नारायणराव जोशी

पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव, प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. ‘सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरेलिखित नाटकापासून गायक नट म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीतसाधना केली. दाजी भाटवडेकर यांना नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले आणि त्यांनी लगेच ‘संगीत शारदम’ या संस्कृत नाटकासाठी नारायणरावांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. ‘संगीत सौभद्रम’, ‘पती गेले गं काठेवाडी’, ‘बुद्ध तिथे हरला’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘संगीत महाश्वेता’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत संशयकल्लोळ’ अशा अनेक संगीतनाटकात त्यांनी अविस्मरणीय भूमिका केल्या. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने ‘बालगंधर्व पुरस्कार’ देऊन गौरवही केला होता. १२ वर्षे त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्याथ्र्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६पासून वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ते विनामूल्य मार्गदर्शन करीत होते. कुठे थांबायचे, याचे भान अनेकांकडे नसते; ते नारायणरावांकडे होते. त्यामुळे साठाव्या वर्षी रंगभूमीवरून निवृत्त होणे त्यांनी पसंत केले, परंतु अंगी असलेली संगीत कला मात्र त्यांना स्वस्थ बसू देणे शक्य नव्हते. ग्वाल्हेर घराण्याची गायकी लोकप्रिय करण्यासाठी देशभर प्रवास करून त्यांनी मैफली गाजवल्या. उत्तम गायन आणि त्याला अभिनयाची जोड हे संगीत नाटकासाठी अत्यावश्यक असे गुण. ते नारायणरावांकडे होतेच, पण त्याबरोबरच घराणेदार गायकीची उत्तम तालीम लाभल्यामुळे अभिजात संगीताच्या दरबारातही त्यांना आपले गुण दाखवण्याची संधी मिळाली. वडील आणि काका हे दोघेही विष्णू दिगंबरांचे आवडते शिष्य. माहीत नसलेल्या प्रांतांमध्ये जाऊन गुरुजींच्या आज्ञेला शिरसावंद्य मानणाऱ्या या दोन्ही बंधूंनी संगीत विद्यालय स्थापन करून संगीताची अखंड सेवा केली. शंकरराव बोडस यांची कन्या म्हणजे वीणा सहस्रबुद्धे आणि पुत्र काशीनाथ हेही संगीताच्या प्रांतात आपले स्थान पक्के केलेले कलावंत. नारायणरावांचे पुत्र केदार हेही आघाडीचे कलावंत म्हणून ओळखले जाणारे. बोडस हे घराणे असे संगीतात चिंब भिजलेले. संगीत हाच ध्यास आणि तीच जगण्याची प्रेरणा. सतत स्वरचिंतनात मग्न राहणे आणि केवळ त्याचाच विचार करीत राहणे हा नारायणरावांचा धर्म त्यांनी अखेपर्यंत अतिशय प्रेमाने पाळला. वाशीच्या गांधर्व महाविद्यालयात विनामूल्य अध्यापन करणे, ही त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा होती. त्यांच्या निधनाने संगीतात आकंठ बुडालेल्या एका तपस्वी साधकाचा अंत झाला आहे.

पं. नारायणराव जोशी
प्रसिद्ध तबलावादक पं. नारायणराव जोशी यांचे नुकतेच निधन झाले. प्रसिद्ध गायक आणि व्हॉयलिन वादक कै. गजाननबुवा जोशी यांचे ते सुपुत्र. फरुखाबाद घरण्याचे एक उत्तम तबलावादक आणि त्यापेक्षा ही थिरखवाँ शैलीचे गाढे अभ्यासक म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे. उस्ताद अहमदजान थिरखवाँ यांचे अगदी जवळचे शिष्य. अगदी पूर्वी गुरूगृही राहून सर्व शिक्षा संपादन करणे ही परंपरा होती. त्याच पद्धतीने नारायणराव जोशी यांनी अनेक वर्षे उस्ताद अहमदजान थिरखवाँ यांच्याकडे राहून तबल्याचे शिक्षण घेतले. थिरखवाँ साहेबांच्या खास मर्जीचा हा शिष्य अशी त्यांची ख्याती होती. गुरूंनी दिलेला सर्व तबला त्यांना मुखोद्गत असायचा. बरोबरच्या शिष्यमंडळींना एखादी गोष्ट अडली की ते नारायण जोशींना त्याचा संदर्भ विचारायचे. गुरूवर नितांत श्रद्धा निष्ठा यामुळे थिरखवाँ शैली त्यांनी उत्तम आत्मसात केली. नुसतीच आत्मसात केली नाही तर ती शैली ते जगले. एखाद्या मुसलमान गुरूकडे एका हिंदू ब्राह्मण माणसाने राहून विद्या संपादन करणे थोडे कठीण, पण ते त्यांनी अगदी समर्थपणे साध्य केले. इतके की, थिरखवाँ साहेबांच्या मुखात अल्लाह नामाइतकेच नारायण हे नाव असायचे. आपल्या गुरूवर नितांत प्रेम, श्रद्धा, निष्ठा असणारा, थिरखवाँ शैली जगणारा एक निष्ठावान कलाकार हरपला.