शिक्षणमंत्री तावडे यांच्या कारकिर्दीत शिक्षकांच्या समस्या वाढल्या – कपील पाटील


सामना ऑनलाईन । नागपूर 

राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसमोर अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात शिक्षकांच्या समस्या सुटण्यापेक्षा अधीकच वाढल्या आहेत. त्यामुळेच तावडेंच्या अशैक्षणिक धोरणाच्या विरोधात शिक्षक भारती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. नागपूर मतदार संघात शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांची लढत ही तावडेंच्या अशैक्षणिक धोरणाच्या विरोधात आहे, असे  शिक्षक आमदार कपील पाटील यांनी येथे सांगितले.

नागपूर येथे राजेंद्र झाडे यांच्या प्रचारदौऱ्यानिमित्त कपील पाटील येथे आले असता पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित केले. यावेळी पाटील पुढे म्हणाले, राज्यात तीन ठिकाणी शिक्षक आमदारांच्या निवडणुका आहेत. मात्र सर्वत्र तावडेंच्या विरोधात रोष असल्यामुळे त्यांना कोणत्याही निर्वाचन क्षेत्रात प्रचारासाठीही जावू देत नाहीत.

राज्याच्या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना पाटील म्हणाले, प्रत्येक विषय शिकवायला त्या विषयाच्या तज्ज्ञ शिक्षकाची आवश्यकता असते. मात्र, युती शासनाने सर्वच विषयांसाठी एकच शिक्षक ठेवण्याचा निर्णय घेउन शिक्षक कपात सुरू केली. विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव देण्यासाठी कला शिक्षकांची नियुक्ती केली जात असे. मात्र, अशा शिक्षकांच्या नियुक्तीवरही बंदी आणली आहे.

विनाअनुदानित शिक्षकांना गेल्या दोन वर्षांपासून गाजर दाखविण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्री करीत आहेत. त्यामुळे राज्यातील गोर, गरीब, बहूजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर करणे हा शिक्षणमंत्र्यांचा डाव असून आमचा लढा हा त्याविरोधातच असल्याचेही कपील पाटील यांनी सांगितले.

महात्मा गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शाळा बंद करण्याचा शासनाचा डाव असून तसे धोरण शिक्षणमंत्री आखत असल्याचा आरोपही कपील पाटील यांनी केला. त्यामुळे आमच्या उमेदवाराची लढाइ ती थेट तावडेंच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात असल्याचे पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे, सपन नेहरोत्रा, प्रा. दिलीप तडस आदी उपस्थित होते.