देशविदेश – उपवासी

शेफ मिलिद सोवनी, [email protected]

आषाढी एकादशीचा उपवास हा एक महत्त्वाचा सोहळा… पाहूया काही उपवासी पदार्थ….

पंढरपूरच्या वारीमध्ये नेहमी जाणाऱया वारकऱयांबद्दल फारसं ठाऊक नसलं तरी महाराष्ट्रातील अनेकजण आषाढी एकादशीला उपवास करतात याची मला पूर्ण कल्पना आहे. यामुळेच या खास आषाढी एकादशी स्पेशल पुरवणीसाठी मी काही उपवासाचे पदार्थ दिले आहेत. यातल्या दोन म्हणजे नैवेद्याला खीर वगैरे बनवतात त्यापैकी साबुदाण्याची आणि रताळ्याची खीर ही रेसिपी दिली आहे, तर त्याहून जरा वेगळं म्हणून वऱयांचा तांदळाचा डोसा ही रेसिपी दिली आहे. बेसिकली उपवासाचे पदार्थ किंवा पंढरपूरच्या वारीच्या वेळी वारकरी नेमकं काय खातात असा विचार करून मी या रेसिपी दिल्या आहेत.

साधारणपणे एकादशीला उपवास का केला जातो, का करतात, त्यामागचं नेमकं कारण काय हे पाहताना पौराणिकदृष्टय़ा म्हणायचं तर दानव स्वर्गातून पळून जातात आणि एकादशीच्या दिवशी ते धान्यांमध्ये जाऊन लपून बसले असं म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी उपवास करून धान्य खात नाहीत अशी प्रथा आहे. पण शास्त्रीयदृष्टया या उपवासाकडे बघितलं तर पौर्णिमा आणि अमावस्या या दोन दिवशी चंद्राचा दबाव पृथ्वीवर जास्तीतजास्त असतो. या दबावामुळेच समुद्राच्या  लाटा मोठमोठय़ा उसळताना दिसतात. अशा दिवशी आपल्या एकंदरच पचनाला शरीरावरही प्रेशर येतं. हा  शरीरावर दबाव जास्तीतजास्त असेल  तेव्हा कमीतकमी अन्न खाल्ले तर ते पचायला सोपं जातं. दुसरं म्हणजे शरीरातून अन्न  पूर्णपणे पचून ते शरीरात जेव्हा जिरते तेव्हा त्यामधील चांगले घटक मेंदूला मिळतात आणि त्याला चालना मिळते. एकादशीच्या दिवशी शरीरावर आधीच चंद्राचा दबाव असताना आपण भरपूर जेवलो, जड अन्न खाल्ले, तर ते पचायला अर्थातच वेळ लागतो. पचायलाच वेळ लागला तर त्यातील अंश आपल्या मेंदूपर्यंत पोहोचायलाही वेळ लागतो. म्हणून उत्साह कमी होतो, आळस अंगात वाढायला लागतो. हे सगळं टाळण्यासाठी उपवास करणं चांगलं. वारकऱयांना तर पायी चालत पंढरपूरपर्यंत जायचं असतं. त्यांना तर त्यांचा स्टॅमिना चांगला राखणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास करणं हे केवळ पौराणिकदृष्टय़ा नाही, तर शास्रीयदृष्टय़ाही खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे ज्या पद्धती सुरू झाल्या आहेत त्या प्रत्येक पद्धतीमागेही काहीतरी शास्त्र्ााrय कारण असते. फक्त ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणूनच तर उपवासाच्या दिवशी ताजी फळे खायची परवानगी दिलेली असते. त्याचा फायदाच शरीराला मिळतो.

वरीचा डोसा

साहित्य..एक कप वरीचा तांदूळ, अर्धा कप खवलेले खोबरे, एक कप चिरलेल्या टोमॅटोचे तुकडे, 2 मिरच्या, चवीनुसार मीठ.

कृती ..वरी १० मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर वरीच्या तांदळासकट वरील सर्व पदार्थ मिक्सरमधून डोशाच्या पिठाप्रमाणे वाटून घ्या. गॅसवर डोश्याचा तवा ठेवून त्यावर तेल किंवा बटर पसरवून डोसे बनवा. डोसा एका बाजूने शिजल्यानंतर परतायचे. लोण्याबरोबर हा डोसा खूप छान लागतो.

रताळ्याची खीर

साहित्य..किसलेला एक मध्यम आकाराचे रताळे, ४ कप दूध, पाव कप साखर, खवलेले खोबरे अर्धा कप, कूटलेली वेलची अर्धा चमचा, एक चमचा तूप, काजू व किसमिस प्रत्येकी एकेक चमचा.

कृती..प्रथम रताळे स्वच्छ धुवून त्याचे साल काढून टाकायचे आणि तो किसून घ्यायचा. त्यानंतर दूध उकळवून त्यात रताळ्याचा किस घालून तो चांगला शिजू द्यायचा. नंतर त्यामध्ये साखर आणि वेलचीची पूड घालून काजूचे तुकडे आणि किसमिसही घालायचे.  काजू गुलाबी रंगाचे होईपर्यंत खीर ढवळत राहायची. रताळ्याची ही खीर खूप छान लागते.

साबुदाणा केसरी खीर

साहित्य..दीड कप साबुदाणा, पाऊण कप साखर (आवश्यकतेनुसार), ४ कप दूध, ८ ते १० काजूचे तुकडे, १० ते १२ किसमिस, १ चमचा तूप, पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर केसर.

कृती..सर्वप्रथम साबुदाणे रात्री भिजत घालावे. दूध गरम करायचे. नंतर एका कढईमध्ये तूप घालून त्यावर हे गरम दूध ओतायचे. ते चांगले उकळले की त्यात साखर घाला. यानंतर एका छोटय़ा भांडय़ात तूप घालून ते गरम करायचे. त्यात काजूचे तुकडे, किसमिस तळून घ्यायचे. त्यातच साबुदाणेही परतून घ्या. हे तुपात परतलेले मिश्रण गरम दुधात घालायचे. व्यवस्थित ढवळून नंतर त्यात वेलची आणि केसर मिक्स करायचे. थंड झाल्यावर ही साबुदाणा केसरी खीर सर्व्ह करायची.