सरकार दखल घेत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो – एकनाथ खडसे

सामना प्रतिनिधी । धुळे

संपादित जमिनीचा मोबदला मिळविण्यासाठी धुळे जिह्यातील धर्मा पाटील या वयोवृध्द शेतकऱयास आत्महत्या करावी लागते. पुन्हा याच मागणीसाठी दुसऱया कुठल्या धर्मा पाटलाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. निसर्गाशी संघर्ष करीत असताना सरकार दखल घेत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतो ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे असे म्हणत भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा सरकारला घरचा आहेर दिला.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे बुधवारी सायंकाळी धुळे शहरात दाखल झाले. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना खडसे यांनी भाजपा सरकारच्या विरोधातील आपला राग पुन्हा एकदा व्यक्त केला. विकास कामांसाठी विरोधी पक्षाशी असलेलेच नव्हे तर पक्षांतर्गत असलेले मतभेददेखील आम्ही विसरलो. विकास व्हायला हवा या एका उद्देशाने काम केले पण गेल्या काही वर्षापासून विकास कामांमध्ये खंड पडला आहे. विकास कामे अतिशय मंद गतीने होत आहेत, अशी जनतेची भावना आहे. जनतेची ही भावना आम्ही वेळोवेळी सरकारकडे मांडतो असे खडसे म्हणाले.