मृत्यूनंतर तरी धर्मा पाटील यांना न्याय द्या- एकनाथ खडसे

सामना ऑनलाईन । जळगाव

धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी सरकारवर सर्वच स्थरातून टीका होत आहे. भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर तरी आता त्यांना न्याय द्या, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणी शासनाने कठोर भूमिका घेत या प्रकरणात औष्णिक उर्जा प्रकल्पात जे उद्योजक दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी अशी मागणी खडसेंनी केली .

सरकारच्या प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालाच पाहीजे. मात्र धर्मा पाटील यांना या प्रकल्पातील उद्योजकाने त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला दिला नाही. सरकारने योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही. त्यामुळे शेतकरी आज कुठेतरी शासनाच्या प्रकल्पांना जमिनी देण्यास सातत्यानं विरोध करत आहेत. न्यायाच्या प्रतिक्षेत धर्मा पाटील यांनी आपला जीव गमावला, मात्र मृत्यूनंतर तरी त्यांना न्याय मिळायला हवा अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.