एकनाथ शिंदेंची सायकल स्वारी

सामना ऑनलाईन । ठाणे

एकनाथ शिंदे. ठाण्यातील एक वजनदार नाव. मात्र तेवढाच दिलखुलास माणूस. मंत्रीपदाचा प्रोटोकॉल बाजूला सारुन शिंदे यांनी सायकलवर स्वारी केली. वेगळा अर्थ काढू नका. ही सायकल होती मराठी बिझनेस एक्सचेंझ येथील उद्योजकीय प्रदर्शनातील. मराठी उद्योजकांच्या उद्योगाला व्यासपीठ मिळावे यासाठी मराठी बिझनेस एक्सचेंझ हे दोन दिवसीय उद्योजकीय प्रदर्शन ९ व १० नोव्हेंबर रोजी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे सुरु आहे. या उद्योजकीय प्रदर्शनाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अराई या सायकल ब्रॅण्डचे अनावरण शिंदे यांनी केले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी सायकल स्वारीचा आनंद लुटला. मराठी बिझनेस एक्सचेंझ मधील सायकल स्वारीची चर्चा यावेळी उद्योजकीय वर्तुळात चांगलीच रंगली.