मोठ्याने घोटला लहान भावाचा गळा

सामना प्रतिनिधी, मुंबई

दारूसाठी पैशांची मागणी करून विनाकारण घरात वाद घालणाऱ्या मोठय़ा भावाने लहान भावाचा गळा घोटून त्याची हत्या केल्याची घटना चुनाभट्टी येथील संजय गांधी नगरात घडली. वडाळा टीटी पोलिसांनी आरोपी कबीर शेख याला अटक केली आहे.

कबीर हारुन शेख याला दारूचे व्यसन आहे. पत्नी व मुले गावी गेल्याने तो चुनाभट्टी येथील घरी राहण्यासाठी आला होता. दारूसाठी तो कोणाकडेही पैसे मागून वाद घालतो. सोमवारी त्याचा बबलू हारुन शेख (२८) या लहान भावाशी वाद झाला. यावेळी कबीरने त्याचा गळा घोटून छातीवर दाब दिला. यातच बबलूचा मृत्यू झाला. वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी अमोल टमके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल जाधव व प्रकाश लिंगे यांनी तत्काळ शोध सुरू करून २४ तासांच्या आत कबीरला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील कांबळे यांनी सांगितले.