निवडणूक आयोगाचा दणका, योगी आदित्यनाथ आणि मायावती यांना प्रचारबंदी


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री मायावती यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तास अर्थात तीन दिवस आणि मायावती यांच्यावर 48 तास अर्थात दोन दिवसांसाठी प्रचारबंदी करण्यात आली आहे. उद्या मंगळवार, 16 एप्रिलला सकाळी 6 वाजल्यापासून ही प्रचारबंदी लागू होणार आहे.

… म्हणून बंदीची कारवाई

देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदच्या पहिल्याच संयुक्त प्रचारसभेत ‘मी खास मुसलमान समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात, नातेसंबंधाच्या गोष्टीत अडकून मतदान करू नका. एकगठ्ठा मतदान महाआघाडीला केले पाहिजे’, असे बसपा प्रमुख मायावती यांनी केले होते. धर्माच्या आणि जातीच्या आधारवर मतदान करण्याचे आवाहन हे अग्राह्य मानले जाते व आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाते, त्यामुळे मायावती या अडचणीत आल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेत स्थानिक प्रशासनाकडे अहवाल मागवला होता. यानंतर मायावती यांना दोन दिवसांसाठी प्रचारबंदी लागू करण्यात आली.

तर मायावती यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ज्या पद्धतीने प्रचारसभेमध्ये मायावती यांनी मुसलमानांकडे मतांची मागणी केली ते पाहता हिंदुंकडे भाजप व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाचा पर्याय नाही. तसेच काँग्रेस, सपा, बसपा यांचा ‘अली’वर विश्वास असेल तर आमचा ‘बजरंगबली’वर आहे असे वक्तव्य केले होते. याची निवडणूक आयोगाने दखल घेत योगींवर तीन दिवसांसाठी प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.