हिमाचल-गुजरातचा ‘इलेक्शन फेस्टिव्हल’

नीलेश कुलकर्णी  

मोठय़ा टीकेनंतर उशिरा का होईना गुजरात विधानसभेचे रणशिंग निवडणूक आयोगाने औपचारिकपणे फुंकले. या दोन्ही निवडणुकांचाथ्री इडियटस्राजकीय पडद्यावर सध्या झोकात झळकत आहे. टिंगलटवाळी केलेल्या राहुल यांनी सत्ताधाऱयांना धडकी भरेल असा राजकीय कार्यक्रम गुजरातमध्ये सुरू केला आहे. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी या त्रिकुटामुळेदेखील सत्ताधाऱयांना घाम फुटला आहे. ‘ऑल इज वेल, ऑल इज वेलअसे भाजप वर्तुळात छातीठोकपणे सांगितले जात असले आणि टीव्हीवाल्यांच्या सर्व्हेनीही भाजपच्या विजयाचे ढोल निवडणुकीपूर्वीच वाजवायला सुरुवात केली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या निमित्तानेइलेक्शन फेस्टिव्हललाच सुरुवात झाली आहे. हा फेस्टिव्हल सत्ताधाऱयांचा बेरंग करतो की विरोधकांच्या उत्साहात रंग भरतो हे निवडणुकीनंतर कळेलच.

गुजरातसोबत हिमाचलच्या निवडणुका होत असल्याने कधी नव्हे ते या राज्याच्या निवडणुकीलाही ‘ग्लॅमर’ मिळाले आहे. गुजरातमध्ये ‘विकास गांडो थये छे’च्या नाऱयाने निवडणुकीचे रणांगण गाजत आहे तर देवभूमीच्या दऱयाखोऱयातून भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे निर्दालन करण्याच्या आरोळय़ा घुमत आहेत. हिमाचलचे विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांना भ्रष्टाचार शिरोमणी ठरवून भाजप त्यांच्याविरोधात रान उठवत आहे आणि दुसरीकडे एकेकाळी भ्रष्टाचारामुळेच गाजलेले माजी मुख्यमंत्री  सुखराम यांचे चिरंजीव अनिल शर्मा यांना भाजपमध्ये घेऊन पवित्र करून घेतले जात आहे. येनकेनप्रकारेण हिमाचल खिशात टाकायचे ही भाजप नेतृत्वाची जुनी महत्त्वाकांक्षा आहे. त्यासाठी वीरभद्र सिंग यांच्या मुलीच्या लग्नादिवशी त्यांच्यावर सीबीआय धाडी घालून लग्नाचा बेरंग करण्यापासून वीरभद्र सिंग यांना काहीही करून तुरुंगात डांबण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले गेले. तरीही यश मिळाले नाही. त्यामुळे भाजप आता पुन्हा स्वच्छ कारभाराचा नारा देत पहाडी जनतेस कौल मागत आहे. अर्थात काँग्रेसचे नेतृत्व वीरभद्र करत असताना भाजपमध्ये मात्र नेतृत्वाचा पेच आहे. समजा सत्ता आलीच तर मुख्यमंत्री कोणाला करायचे हे भाजपने अजून गुलदस्त्यात ठेवले आहे. माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल या वयातही गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत तर त्यांचे ‘बीसीसीआय’फेम खासदार चिरंजीव अनुराग ठाकूर यांच्याही महत्त्वाकांक्षेचेही उडान होताना दिसत आहेत. दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचलची निवडणूकदेखील रंजक ठरणार आहे. हिमाचलमध्ये पुन्हा काँग्रेस सत्तेवर आली आणि गुजरातमध्ये ऐतिहासिक सत्तांतर झाले तर ती देशाच्या सत्ताबदलाची नांदी ठरणार आहे.

नवा मध्य प्रदेश पॅटर्न

मध्य प्रदेशसारख्या एकेकाळच्या भुकेकंगाल राज्याला प्रगतिपथावर नेणारे तिथले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान सध्या जागतिक प्रसिद्धीस पावले आहेत. अमेरिकेच्या दौऱयावर असताना त्यांनी अमेरिकेपेक्षा मध्य प्रदेशातील रस्ते हे गुळगुळीत आणि दर्जेदार आहेत असे सांगत ट्रम्पतात्यांच्या महासत्तेलाच एक प्रकारे आव्हान दिले. त्यामुळे  पंतप्रधान मोदींनंतर नव्या ‘जागतिक नेतृत्वा’चा उदय झाल्याची वदंता भाजप वर्तुळात  आहे. शिवराजसिंग यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे जोरदार ट्रोलिंग झाले. शिवराज यांना झोडपण्याचा कार्यक्रम झाला. अर्थात एकेकाळच्या बिमारू आणि काँग्रेसी सरकारमध्ये भुकेकंगाल झालेल्या मध्य प्रदेशला संपन्नतेची विकासाची वाट दाखविली ती निःसंशयपणे याच शिवराजसिंग यांनी. नाहीतर एकेकाळी बिहारचे रस्ते हेमामालिनीच्या गालापेक्षा गुळगुळीत करण्याचे वाह्यात विधाने करणारे लालूप्रसादांसारखे बोलघेवडेही आपल्याकडे कमी नाहीत. शिवराजसिंग यांनी मध्य प्रदेशला विकासाच्या मार्गावर नेले आहे हे खरे, मात्र अमेरिकेशी तुलना करण्याइतका हा रस्त्याचा गुळगुळीतपणा नक्कीच नाही हे त्यांना कोणीतरी सांगायला हवे. एकवेळ शिवराज यांनी देशातील काँग्रेसशासित राज्यांतील डांबरीकरणाची स्पर्धा केली असती तर कोणी फारसा आक्षेप घेतला नसता. मात्र विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ विधानसभेच्या रणधुमाळीत  ‘विकास पगला गया है’ या घसरगुंडीवरून घरंगळत असताना शिवराजसिंग यांनी विकासाचा नवा ‘मध्य प्रदेश पॅटर्न’ उदयाला आणावा, हा फक्त योगायोगच म्हणायचा की आणखी काही? गुजरात मॉडेलची पोलखोल होत असताना हे नवे मॉडेल येण्यामागची अंतस्थ प्रेरणा कोणाची? त्याची दिशा नागपूर तर नाही ना? यावर सध्या परिवारात खमंग चर्चा सुरू आहे.

रूपा गांगुलींचागोंधळ

‘महाभारत मालिकेतील द्रौपदी’ ही भाजपच्या राज्यसभा खासदार रूपा गांगुली यांची निजखूण आहे. सिनेमाच्या पडद्यावरून अडगळीत पडल्यानंतर रूपाबाई भाजपाई झाल्या. त्यानंतर त्यांना प्रोजेक्ट करून भाजपने पश्चिम बंगालच्या खाडीत कमळ वगैरे उमलविण्याचा संकल्प सोडला होता, पण हा संकल्प त्या खाडीतच वाहून गेला. नवज्योतसिंग सिद्धूंनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसचा हात धरल्यानंतर राष्ट्रपतीनियुक्त सदस्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर रूपा गांगुली यांना संधी देण्यात आली. त्यानंतर अधूनमधून खळबळजनक विधाने करून या बाई चर्चेत असतात. राज्यसभेवर येऊन अगदी काही महिने झाले असल्यामुळे त्यांना संसदीय कामकाजाची सखोल माहिती नाही. तशी कोणाची अपेक्षाही नाही. मात्र वेगळ्याच संसदीय समितीच्या बैठकीला हजेरी लावल्यामुळे रूपामॅडम पुन्हा चर्चेत आल्या आहेत. वाणिज्य विभागाच्या संसदीय समितीवर त्या आहेत. मात्र संसदेत त्या दिवशी रस्तेविकास खात्याच्या अन्य एका समितीच्या बैठकीला रूपा गांगुली जाऊन बसल्या. तृणमूल काँग्रेसचे विद्वान खासदार डेरेक ओ’ब्रायन हे त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवत होते. थोडय़ा वेळाने ‘काहीतरी चूक झाली आहे,’ याची जाणीव रूपा गांगुली यांना झाली. आपला काही तरी गोंधळ झालाय याचा उलगडा झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत बैठकीतून काढता पाय घेतला. मात्र या बैठकीत समितीव्यतिरिक्त इतर सदस्यही बसू शकतात अशी मल्लिनाथी करत पश्चिम बंगालमधील भाजपचा क्रमांक एक शत्रू असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओ’ब्रायन यांनी रूपा गांगुली यांना चहा-बिस्किटे ऑफर करून या ‘गोंधळात गोंधळ’ या प्रकरणावर पडदा पाडला.