मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे महाडेश्वर ,उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर

39
फोटो सौजन्य-स्मरण शिंदे

सामना ऑनलाईन,मुंबई

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने आज पहिल्यांदाच एकहाती सत्ता काबीज केली आणि सलग पाचव्यांदा महापालिकेवर भगवा फडकवला. साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिलेली मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक आज पार पडली. महापौरपदी शिवसेनेचे प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर विराजमान झाल्या. तब्बल सहा तास ही निवडणूक प्रक्रिया चालली. शिवसेनेच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर प्रचंड संख्येने शिवसैनिक जमले होते. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सौ. रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीनंतर साऱ्या देशाचे लक्ष महापौरपदाच्या निवडणुकीकडे लागले होते. या निवडणुकीतून भाजपने आधीच माघार घेतली होती. काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी विठ्ठल लोकरे आणि उपमहापौरपदासाठी विन्नी डिसुझा यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. दुपारी 12 वाजता आज सभागृह सुरू झाले. माजी महापौर स्नेहल आंबेकर या पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 12.30 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे अखेर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. सर्वात आधी महापौरपदासाठीची निवडणूक झाली व त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली.

आजच्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी, एमआयएम आणि सपा यांनी तटस्थ राहून कोणत्याही उमेदवाराला मतदान केले नाही, तर मनसेचे सर्व सदस्य या निवडणुकीसाठी गैरहजर राहिले. तर भाजपच्या 82 नगरसेवकांन ऊर्फ ‘पहारेकऱयांनी’ शिवसेनेला मतदान केले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सभागृहात 218 नगरसेवक उपस्थित होते. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने विश्वनाथ महाडेश्वर आणि काँग्रेसच्या वतीने विठ्ठल लोकरे रिंगणात होते. या निवडणुकीसाठी एकूण 218 नगरसेवकांनी मतदान केले. 16 नगरसेवक तटस्थ राहिले, 8 नगरसेवक अनुपस्थित राहिले तर मतदानावेळी 1 नगरसेवक अनुपस्थित होता. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांना 171 मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार विठ्ठल लोकरे यांना 31 मते मिळाली. अशाप्रकारे विश्वनाथ महाडेश्वर यांचा 140 मतांनी दणदणीत विजय झाला. त्यानंतर पीठासीन अधिकारी स्नेहल आंबेकर यांनी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निवडीची घोषणा केली.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर तर काँग्रेसच्या वतीने विन्नी डिसुझा रिंगणात होत्या. यावेळीही अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आला, परंतु कुणीही अर्ज मागे घेतला नाही. या निवडणुकीसाठी 218 नगरसेवकांनी मतदान केले. यात तटस्थ 16 नगरसेवक तर 8 नगरसेवक अनुपस्थित आणि मतदानावेळी एक नगरसेवक गैरहजर राहिला. शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांना 166 मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवार विन्नी डिसुझा यांना केवळ 31 मते मिळाली. या निवडणुकीत 5 मते अवैध ठरली. त्यामुळे महाडेश्वर यांनी उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांच्या निवडीची घोषणा केली.

नवनिर्वाचित महापौरांचे स्वागत आणि जल्लोष

नवनिर्वाचित महापौर आपल्या आसनासमोर येताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे गटनेते आणि सभागृह नेते यशवंत जाधव यांनी महाडेश्वर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळीही ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

शिवसेना नेत्यांची उपस्थिती

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोऱहे, विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब, संजय पोतनीस, सुनील प्रभू, सदा सरवणकर, उपनेते अनंत तरे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, विभागप्रमुख दत्ता दळवी, पांडुरंग सकपाळ यांची उपस्थिती होती.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीने नवचैतन्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने शिवसेना नगरसेवकांच्या अंगात नवचैतन्य संचारले. नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचे उद्धव ठाकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘उद्धवसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या नगरसेवकांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले.

गटनेत्यांची निवड

सभागृह नेतेपदी शिवसेनेचे यशवंत जाधव, भाजपच्या गटनेतेपदी मनोज कोटक, काँग्रेसच्या गटनेतेपदी रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी राखी जाधव, तर समाजवादी पार्टीकडून रईस शेख यांची निवड झाल्याचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले. यावेळी मनसेकडून गटनेतेपदी नामांकन न आल्याने मनसेच्या गटनेतेपदाचे नाव जाहीर झाले नाही.

विरोधी पक्षनेतेपदाची निवड नाही

या निवडणुकीत विरोधी पक्षनेपदाची निवड झालीच नाही. निवडणुकीत दुसऱया क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपने कोणत्याही पदाची निवडणूक लढवणार नाही तसेच विरोधी पक्षनेतेपदावरही दावा सांगणार नाही असे जाहीर केले होते.  अन्य पक्षानेदेखील  विरोधी पक्षनेतेपदाची निवडणूक लढवली नाही.

पालिका परिसरात दिवाळी आणि जल्लोष

मुंबई महानगरपालिकेच्या आवारात सकाळपासूनच नवचैतन्य संचारले होते. जिकडे तिकडे भगवे झेंडे, भगवे कंदील आणि हत्तींच्या अवाढव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. महानगरपालिका इमारतीवरही भगवे झेंडे, भगवे पडदे लावण्यात आले होते. त्यामुळे जणूकाही भगवी दिवाळीच असल्याचा भास होत होता. आवारात सकाळपासूनच शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रवेशद्वाराबाहेरच एक व्यासपीठ बांधण्यात आले होते. या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊन व्यासपीठावरून आपल्याला केव्हा संबोधित करतात याचीच सर्वजण वाट पाहत होते. विजयोत्सव साजरा करण्यासाठी न थकता अविरतपणे ढोलताशांचा गजर सुरू होता. ‘आम्ही पार्लेकर’’ ढोलताशा पथकाने सर्व परिसर दणाणून सोडला.

अवघे सभागृह भगवे झाले

सकाळपासूनच शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेना नगरसेवक आणि शिवसैनिकांची प्रचंड लगबग होती. सर्व नगरसेवकांनी भगवे फेटे, भगवे उपरणे, भगवे झेंडे घेऊनच महापालिका सभागृहात प्रवेश केला. जबरदस्त घोषणाबाजी करतच शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात प्रवेश केला. अवघे सभागृहच भगवे झाले होते.

पारदर्शक शब्दाला अर्थच नाही – अनिल देसाई

पारदर्शक कारभारामुळेच मुंबईकरांनी पाचव्यांदा शिवसेनेच्याच पारडय़ात भरघोस मते टाकली. खरे तर आता पारदर्शक या शब्दालाच काही अर्थ राहिलेला नाही. त्यामुळे एक दिवस पारदर्शकता हा शब्दच निघून जाईल अशा शब्दांत शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेनेला पाठिंबा देऊ असे म्हणणाऱया भाजपने शिवसेनेच्या बाजूने मतदान केल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता त्यांनाच जाऊन विचारा असे देसाई म्हणाले.

मुंबईकरांचे आभार – नीलम गोऱ्हे

मुंबईकरांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केले असे सांगतानाच मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शी होता, पारदर्शी आहे आणि भविष्यातही पारदर्शीच राहील असा विश्वास शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱहे यांनी व्यक्त केला.

महाराजांचा विसर, मोदींचा गजर!

सभागृह सुरू झाल्यापासून भाजपच्या नगरसेवकांनी ‘मोदी मोदी’ असा गजर सुरू केला होता. निवडणुकांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचे फलक लावणाऱया भाजपला निवडणूक संपताच महाराजांचा विसर पडला आणि त्यांनी शिवरायांचा जयजयकार न करता मोदींच्या नावाचा घोष केला. महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नावाची घोषणा होताच भाजप नगरसेवकांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी सुरू करत नौटंकी केली, परंतु शिवसेनेच्या नगरसेवकांनीही जोरदार घोषणाबाजी करत त्यांची पुरती वाजवून टाकली. त्यांच्या या नौटंकीला जशास तसे उत्तर देत ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’, ‘हम से जो टकराएगा, मिट्टी मे मिल जाएगा’ अशा घोषणांनी शिवसेनेच्या नगरसेवकांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. यासंदर्भात नंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ‘शी… शी… कोणी काय घोषणा द्यायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला आज ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा अपेक्षित होत्या’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या