हजारो ग्राहकांना वीज बीले वाटलीच नाहीत, ग्राहकांची महावितरणच्या कार्यालयात गर्दी

सामना प्रतिनिधी ।  न्हावाशेवा

सतत खंडित होणारा वीज पुरवठा, अवास्तव लाईट बिले यामुळे मेटाकुटीला आलेल्या उरणच्या ग्राहकांना ऑगस्ट महिन्याचे बीलच मिळाले नाही.  हे बील मिळविण्यासाठी व भरण्यासाठी वीज ग्राहकांना  महावितरणच्या उरण कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या कार्यालयाबाहेर यासाठी वेगळे काऊंटर उघडले असून या काऊंटरवर उरण तालुक्यातील वीज ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

उरण तालुक्यातील वीज बिले वाटणारा कंत्राटदार बदलला आहे,  नविन कंत्राटदारांला घरे माहित नसल्यामुळे हजारो ग्राहकांना बीलेच वाटली नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना वीज बिले मिळाली नाहीत. त्यात वीज मंडळाकडून बीले भरण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात वीज पुरवठा कापला जाऊ नये यासाठी तालुक्यातील शेकडो लोक रोज आपला नोकरी धंदा सोडून बील भरण्यासाठी वीज मंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारत असल्याचे दिसत आहे. महावितरणच्या या कारभारामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

उरण महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंडे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता बीले वाटणारा ठेकेदार बदलल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. मात्र ग्राहकांनी हे बील भरण्यासाठी उरणला येण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मोबाईलवर आलेला बीज बीलाचा मेसेज बील भरणा केंद्रात दाखवून ते बील भरावे व त्याची पावती घ्यावी. यापुढे अशी चूक टाळण्यासाठी नवीन ठेकेदाराला बदलले असून परत जुन्या ठेकेदारालाच ठेका दिला असल्याचे सांगितले. उरण तालुक्यात 50 हजार वीज ग्राहक असून असा  3 ते 4 टक्के ग्राहकांना वीज बील मिळाले नसल्याचे त्यांनी नमूद केले.