महावितरणची वीज महागली; राज्यात पाच टक्के दरवाढ

electricity-1

सामना ऑनलाईन, मुंबई

इंधन दरवाढीमुळे आधीच त्रस्त असलेल्या जनसामान्यांना राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. आयोगाने आज महावितरण, बेस्टसह अन्य कंपन्यांच्या वीज दरवाढीबाबतच्या प्रस्तावावर निर्णय दिला. विघ्नहर्त्याच्या स्वागताची तयारी सुरू असताना महावितरणला सरासरी पाच टक्के दरवाढ करण्याची परवानगी देण्यात आली आहे, तर बेस्टचे दर सहा-आठ टक्क्यांनी कमी करत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बेस्टच्या विजेचे दर कमी झाल्याने त्यांच्या 10 लाख ग्राहकांवरील आर्थिक भार हलका होणार आहे. टाटा पॉवर आणि आदानी इलेक्ट्रिकलला एक टक्क्यापर्यंत दरवाढ दिली आहे. 1 सप्टेंबर 2018 पासून नवीन दर लागू होणार आहेत.

महावितरणने 34 हजार 646 कोटी रुपयांची म्हणजेच 23 टक्के दरवाढ मागितली होती, मात्र आयोगाने तूर्तास 20 हजार 651 कोटी रुपयांची दरवाढ मान्य केली असून सध्या त्यातील 8268 कोटी रुपये सरासरी पाच टक्के दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांकडून वसूल करण्याची परवानगी महावितरणला दिली असल्याचे राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.

उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणचा वीजदर 8.04 रु. प्रति युनिटवरून 8.20 रु. झाला आहे. टाटाचा वीज दर 9.12 रुपयांवरून वाढून 9.38 रु. झाला. बेस्टचा औद्योगिक विजेचा दर मात्र कमी झाला असून सध्याचा 8.65 रु. दर 8.06 पैसे इतका कमी करण्यात आला आहे, तर अदानीचा दर 10.07 रुपयांवरून 9.37 रु. कमी झाला आहे.

दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱया महावितरणच्या घरगुती ग्राहकांचा विजेचा दर 24 पैशांनी वाढणार आहे. त्यांना 5.07 रु. प्रति युनिट वीजपुरवठा केला जातो. तो 5.31 रु. करण्यात आला. तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांचा वीजदर 8.74 रुपयांवरून 8.95 रु. झाला.

राज्यातील मीटरवर वीज वापरणाऱया कृषिपंपांसाठी सध्या 3.35 रु. प्रति युनिट एवढा वीज दर होता तो 20 पैशांनी वाढवून 3.55 रु. करण्यात आला आहे.  वाहनांसाठीच्या चार्जिंग केंद्रासाठी प्रति युनिट सहा रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे.