वीज तापली! एसी, पंखे, कूलर सुसाट; राज्याची विजेची मागणी 22,500 मेगावॅटवर

52
electricity

सामना प्रतिनिधी, मुंबई

चाळिशी पार गेलेला तापमानाचा पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे आज वीज चांगलीच तापली. एरवी 21 हजार मेगावॅटच्या घरात अडखळणारी राज्याची विजेची मागणी आज एसी पंखे, कुलर सुसाट धावू लागल्याने 22 हजार 500 मेगावॅटवर पोहचली. अचानक वाढलेली ही मागणी पूर्ण करण्यासाठी वीजनिर्मिती कंपन्यांबरोबरच वितरण कंपन्यांनाही मोठी कसरत करावी लागली.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने सध्या कृषिपंपांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभरातून महावितरणकडे सरासरी 17-18 हजार मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली जात आहे. तर मुंबापूरीची मागणी तीन हजार मेगावॅटपर्यंत जात होती. मात्र आज वाढलेल्या उकाडय़ामुळे कृषिपंपांचा वीज वापर बंद असतानाही महावितरणकडे 19 हजार 250 मेगावॅट एवढी विजेची मागणी नोंदली आहे. चालू वर्षीची उन्हाळय़ातील उच्चांकी मागणी असून ती महावितरणने पूर्ण केली असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच आज सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबापुरीतील बहुतांश कर्यालये बंद असतानाही मुंबईची विजेची मागणी 3225 मेगावॅट एवढी नोंदली आहे. महावितरणची वाढलेली ही मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीने आतापर्यंत सर्वाधिक 9 हजार 870 मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पातून पाच हजार तर खासगी प्रकल्पातून पाच हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे. त्याचबरोबर मुंबईची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवरने 1350 मेगावॅट, अदानी 500 मेगावॅट तर पॉवर एक्स्चेंजमधून 1200 मेगावॅट वीज घेतली.

पॉवर एक्स्चेंजच्या प्रतियुनिट
विजेचा दर आठ रुपयांवर
वाढत्या तापमानामुळे देशभरातून विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून आयत्या वेळी घेतल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेचा आज आठ रुपये एवढा जास्त दर होता. एरवी एक्स्चेंजच्या विजेचा दर दीड-दोन रुपये युनिट एवढा कमी असतो.

आपली प्रतिक्रिया द्या